मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
जनार्दन स्वामींच्या ओव्या

जनार्दन स्वामींच्या ओव्या

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


१.
अनंत निर्गुण सर्वां ठायीं पूर्ण । न करी निर्वाण दासालागीं ॥
हांकेबरोबरी धांवोनी सत्वरी । भक्तालांगीं तारी गुरुनाथ ॥
सुंदर तें ध्यान वसे औदुंबरीं । व्याघ्रचर्मधारी शोभतसे ॥
काषाय अंबर दंडकमंडलु । डमरु त्रिशुलु शंखचक्र ॥
किरीट कुंडलें रुद्राक्षाच्या माळा । वैजयंती गळां हार रुळे ॥
सूर्य चंद्र नेत्र शेषफणी छत्र । पीतांबर वस्त्रपरिधान ॥
गुरुचरणीं सर्व तीर्थाची मिरासी । म्हणोनी जगासी उद्धरिती ॥
जनार्दन म्हणे न लगे ब्रम्हाज्ञान । गुरुचरणीं मन राहो सदा ॥

२.
आतां गुरुराया परिसा विज्ञापना । दासाची करुणा येऊं द्यावी ॥
नेणोनियां सोय फिरलों दिशा दाही । झाले दु:ख देहीं बहुसाल ॥
तुमची ब्रीदावळी पतितपावन । कीर्ति हे ऐकोन शरण आलों ॥
माझा मायबाप गणगोत बंधु । तूंचि कृपासिंधु गुरुराया ॥
आतां कांहीं नेणें तुमच्या पायांविणें । संसाराचें पेणें दूर केलें ।
जोडोनियां हात शिर पायांवरी । ठेविलें निधारी जनार्दनें ॥

३.
कंठी राहो नाम हा माझा नवस । पुरवावी आस गुरुराया ॥
वसोनी अंतरीं बोलवीं उत्तर । जेणें हा संसार सार होय ॥
सर्व चराचरीं द्दष्टि ऐसी करीं । दावीं रूप हरी अखंडित ॥
ऐसिया वासने स्वामी साहय होणें । काल वांयां जाणें ऐसे न हो ॥
तुजऐसा नाहीं त्रिभुवनीं उदार । कृपें देईं वर जनार्दन ॥

४.
अहो सद्रुरु अनंता । फार काय बोलूं आतां ॥
नारायणा कृपावंता । असों द्यावी माझी चिंता ॥
भलते याती हो कां जन्म । परी आवडो गुरुनाम ॥
नामें पतित तारिले । पशुपक्षी मोक्षा नेले ॥
मातंगाचे मुखीं वेद । लीलें करविला संवाद ॥
जरी करिसी अंगीकार । तरी काय माझा भार ॥
जनार्दन चिंती भावें । याचें स्मरण असों द्यावें ॥
मुळीं नाहीं गुण म्हणोनि निर्गुण । ब्रम्हा परिपूर्ण गुरुनाथ ॥
ज्याचे गुण गातां वेद मौनावला । शेष ओढवला झाला शय्या ॥
ब्रम्हादिक ज्याचे झाले आज्ञाधर । मानव पामर कोण पुढें ।
तोचि कृष्णातीरीं वसे औदुंबरीं । दासां कृपा करीं तारावया ॥
राव रंक याती वर्व न विचारी । भाविकां अंतरीं राहे सदां ॥
स्मरतां येतो ऐसें वेद बोभाईला । तया तो ब्रीदाला रक्षीतसे ॥
जया चित्तीं ठेवा कल्याण असावें । गुरुसी रिधावें शरण वेगें ॥
ऐसी वेदवाणी ऐकोनिया कानीं । जनार्दना मनीं निश्चय झाला ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 05, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP