मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
भानुदासांचे अभंग

भानुदासांचे अभंग

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


१.
परदेशींची वस्तु पंढरीस आली । ते दैवें फावली पुंडलिका ॥
देतां घेतां लाभ बहुतांसि झाला । विसांवा जोडला पांडुरंग ॥
न करितां सायास वस्तुचि आयती । वैष्णवीं बहुती वेटाळिली ॥
भानुदास स्वामी कृपेचा सागरु । विठ्ठल कल्पतरु वोळला आम्हां  ॥
२.
न मागतां कांहीं न करितां सेवा । आलासि गा देवा पंढरीये ॥
तूं गा मायबाप विश्वासी तारक । तुवां पुंडलीक सुखी केला ।
चारीतां गोधनें आलासी बा पायीं । पुंडलीक कांही न बोलेचि ॥
चिन्मयाचा दीप साक्षित्वासी आला । भानुदास त्याला नाम जालें ॥
३.
अवघ्या सोडियेल्या मोटा । आजिचा दहिंकाला गोमटा ॥
घ्यारे घ्यारे दहींभात । आम्हां देतो पंडरिनाथ ॥
मुदा घेऊनियां करीं । पेंदा वांटितो शिदोरी ॥
भानुदास गीतीं गात । प्रसाद देतो पंढरिनाथ ॥
४.
गुढीयेसी सांगू आले । कंस चाणुर मर्दिले ॥
हर्षे नाचताती भोजें । जिंकियेलें यादवराजें ॥
गुढी आली वृंदावना । मथुरा दिली उग्रसेना ॥
जाला त्रिभुवनी उल्हास । लळित गाये भानुदास ॥
५.
ऐसियासी कृपा करावी त्वरित । पुरवी मनोरथ सर्व माझे ॥
काकुळती कवणा येऊं तुजवीण । दु:ख निवारण कोण करी ॥
त्रलोक्य पालन करिसी सर्व । त्याहुनी आगळें हेंचि काय ॥
तुझिया पायांचा मजला आधार । केवीं तूं निष्ठूर जाहलासी ॥
आमुचे अन्याय न धरावे चित्तीई । सर्व कृपामूर्ति पोटीं घालीं ॥
कर्म धर्म माझें उत्तम आचरण । न पाहें पावन करीं मज ॥
भानुदास म्हणे कृपेचें पोसणें । परी नारायणें सांभाळावें ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 05, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP