मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
का प्राणसख्या तू पातळ केल...

लावणी - का प्राणसख्या तू पातळ केल...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


का प्राणसख्या तू पातळ केलिस माया ।

सांग गुणीराया ॥ध्रु०॥

मी चतुर नार चांगुलपणाची खाण ।

त्यात आले नहाण ॥

जी शपथ दिल्ही मुळी तीच माझी रांबाण ।

जीवलगा जाण ॥

खुर्बान तुझ्यावर पांचीप्राण ।

चुड्यांची आण ॥चाल॥

खंत वाटते अंतर्यामी ॥

घरात सुंदर सभाग्य स्वामी ॥

ते टाकुनिया रतल्ये कामी ॥चाली॥

भरी भरुन झिजऊन अमोलिक काया ।

झाले आटवाया ॥१॥

ह्या मागे एकांती नेउन मसी बोलावे ।

मर्जीनेच चुचकारुन हळुच घोळावे ।

पलंगी लोळावे ॥

उभे राहा असे ऐकता वचन पाळावे ।

येउन आवळावे ॥चाल॥

पदर काढुनी पुढे बसविसी ॥

मस्करी करुनि किती हसवीसी ॥

विनोदवाक्यावरून रुसवीशी ॥चाल॥

फिरुन समजाउन नेसी पलंगी ।

बहार उडवाया ॥२॥

कधी जवळ बसून घातलास शीतळ वारा । अरे सकुमार ॥

श्रमलास फार मजसाठी करुन येरझारा । गळींच्या हारा ॥

धरिलास कधी वळचणीस सख्या थारा ।

त्यजुन घरदारा ॥चाल॥

दुःख जेव्हा ते मनी आठवीत्ये ॥

तेव्हाच तुजला मूळ पाठवीत्ये ॥

निजल्या असल्या बळे उठवीत्ये ॥चाल॥

दृष्टीस पडल्यावरी लागत्ये पाया । धरून वर छाया ॥३॥

ईश्वरा सखा दे त्रिकाळज्ञानी जैसा ।

नको देऊ म्हैसा ॥

जो कड चालवील पुरुष पती तो तैसा ।

लोक म्हणू कैसा ॥

पुरे एक जीविचा जीवलग प्राण ऐसा ।

काय करू पैसा ॥चाल॥

गंगु हैबती म्हणे धन्य तू ।

सकळ स्त्रियांमध्ये राजमान्य तू ॥

महादेवाचे फेड दैन्य तू ॥चाल॥

प्रभाकराचे कवन सुरस ऐकाया ।

अंगीकाराया ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP