मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
किती रे धीर धरू मी यावरी ...

लावणी - किती रे धीर धरू मी यावरी ...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


किती रे धीर धरू मी यावरी ।

चाल उठ सख्या मंदिरी ॥ध्रु०॥

प्राणप्रिय तू एकांतिचा ।

जिवाचा जिव विश्रांतिचा ॥

लुटुन रस कस घे नवतिचा ।

डौल पहा माझ्या छातिचा ॥

उजेड पडे गोर्‍या कांतिचा ।

का पडदा पडला भ्रांतिचा ॥चाल॥

अशी रे अपराधी काय तरी ॥१॥

प्रीत पहिल्यापुन लावली ।

आशा रे गोड बोलुन दावली ॥

सवत कोण दुसरी घावली ।

नजर तिजवरती धावली ॥

न घेसी माझी सावली ।

जासि तिथे अपुल्या पावली ॥चाल॥

मागे तळमळते मी घरी ॥२॥

शरीर तुजकरिता जाळिते ।

लाड नित नवा खोपाळिते ॥

रुसुन बसल्या धुंडाळिते ।

कठिण मर्जी सांभाळिते ॥

वेळ रागाची टाळिते ।

धरुन मग बळे कवटाळिते ॥चाल॥

तुझ्या रे प्रीतीची सुंदरी ॥३॥

बोलले गंगु हैबती ।

पलंगी दोघे शोभती ॥

झडती नावाच्या नौबती ।

डफावर बिरदे लोंबती ॥

महादेव गुणिराज सोबती ।

छंद किती ऐकुन थांबती ॥चाल॥

प्रभाकर कवनी रस भरी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP