मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
कोण मुशापर उभा येउन रंगित...

लावणी - कोण मुशापर उभा येउन रंगित...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


कोण मुशापर उभा येउन रंगित माडीखाली ग ।

गेले भाळुन तुम्ही पुसा सख्यांनो वृत्ति चंचळ झाली ग ॥ध्रु०॥

कोण स्त्री या प्रसवली असल्या गुणवान सुपुत्रा ग ।

धन्य तिचे बाई भाग्य वाटते पाहुन या चित्रा ग ॥

रंग झळकतो दुरुन जणू सोन्याचा पत्रा ग ।

उंबर कवळी कोंब पराई वय सोळा सत्रा ग ॥

कुठिल तुम्ही रहाणार पुसा जाउन कोमळगात्रा ग ।

या घरात घेउन सुखाची आज कर्मिन रात्रा ग ॥चाल॥

जर्द्या घोड्यावर जरिचा जीन, सडका भवती हो ।

मजुर करती लोक दुरस्ता रस्त्यामधी लवती हो ॥

आदर मान बैठका करुन ठाई ठाई आधी ठिवती हो ॥चाल॥

नवी नवती भोगील कधी येउन रंगित महाली ग ॥

गरज मी होउन फिरते तुमच्या भवताली ग ॥१॥

अहो मुशाफिर म्हणति सख्या कर जोडुन गुणमूर्ती हो ।

कामातुर पहा धनीन आमुची झाली तुम्हावरती हो ॥

आहे घरची श्रीमंत नाही करणार जिवापरती हो ।

वक्त गुजरल्या शिरी वाचविल स्नेही शर्थाशर्थी हो ॥

आल्या घडीस देउन मान भोगा तुरतातुरती हो ।

सहजाची आरती करा जिव लावुन आज पुरती हो ॥चाल॥

उठा राजमंदिरी चला आम्ही पदर पसरितो तिंदा ।

फते चार मुलकात डंका चालेल तुमचा यंदा ॥

अकल्पित संपदा मिळाल्या करू नये दुसरा धंदा ॥चाल॥

वाट पहात सुंदरा एक पायावर उभी राहिली हो ॥

बाहेर पडता नये तिला ती आहे पडद्याआतली हो ॥२॥

म्हणे मुशाफर प्राणसख्यांणो हा आग्रह लटका ग ।

सहज स्त्रियांचा शब्द गोड केवळ अमृतघुटका ग ॥

घर घेया जाइना लागल्या विषयाचा चटका ग ।

आम्ही तर सासुरवासी कशी येइल कोण घटका ग ॥

शिरी घेउन परदेश निघालो घर त्यागुन कटका ग ।

परिचय नसता का ग मारिता पदराचा झटका ग ॥चाल॥

हसुन लाविता खोटी ममता वरवर द्रव्यापुरती ।

प्रीत करुन या सिद्धिसनेतिल ऐशा नाहित गरती ॥

टाकुन आपुला पुरुष दुसर्‍यासंगे मौजा करती ॥चाल॥

अशा स्त्रियांच्या रीति वृथा नित पुरुष झड घालि ग ॥

फार भिउन वागतो पडुना दुसरिच्या ख्यालि ग ॥३॥

उतरा घोड्यावरून चला चौकात प्राणसख्या हो ।

ख्यालिखुशालिमधे मंदिरी कर्मा गुणिराया हो ॥

नजर होता उभयता एक मग सहज आली माया हो ।

धरून हस्तकी नेउन केली तिणे अर्पण काया हो ॥

नित्य असे द्या दर्शन मजला रसरंग भोगाया हो ।

आता कधी पाहीन तुम्ही गेल्यावर या पाया हो ॥चाल॥

गंगु हैबती म्हणे धन्य तुम्ही सृष्टीवर प्राणी ग ।

तो नृपवर श्रीमंत शोभशी तू त्यांची राणी ग ॥

महादेव गुणिराज कवीची रसवंती वाणी ग ॥चाल॥

प्रभाकराचे छंद बूंद अक्षर साध्या चालि हो ॥

प्रेमसुखाची निद्रा सखीला धुन ऐकुन आलि हो ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP