मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
स्वरुप रूप सवाई , गेली फा...

लावणी - स्वरुप रूप सवाई , गेली फा...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


स्वरुप रूप सवाई, गेली फार आवाई, जशी स्वच्छ हवई सुटली ।

चाले काही मागे पाही, उभी राही ठाई ठाई, अमोल नार नटली ॥धृ०॥

वय बारा तेरात, आली ऐन भरात, नाही शहरत अशी दुसरी ।

चहुकुण, किती करतात खुण, कुणी हातरूण घरी पसरी ॥

हिकडे येइल, की तिकडे नेइल, काय धेइल कळा कुसरी ।

धावा धावा, जाहो शोध लावा लावा, डाव धाव पहा पहा धरा वसरी ॥

जेव्हा मारी डावी हुल, तेव्हा तेव्हा करी चकभुल, पुरुषाचे फुल घसरी ।

डुलत खुलत चाले, झुलत झुलत बोले, शब्द जसे मिसरी ॥चा०॥

लोकास आली गिरकी ॥ घडोघडि शरीर थरकी ॥

टाकि पाउले काय तुरकी ॥

तेवढ्यातच नथ मुरकी ॥

बिसनीची नजर तरकी ॥ बेदर्दि दुरुन गुरकी ॥चा०॥

अशी आहे मोठी नट, न धरी कोण मनगट, आली चांगट कुठली ।

वेडे झाले जन, इणे मोहुन मन, धनपतींची मति खुटली ॥चाले काही०॥१॥

हिच्या भ्रताराचे धनभाग्य, व्यर्थ वैराग्य, असी सौभाग्यवती वरली ।

काय केले त्याने तप, गप नव्हे महा जप, जपुन पणी धरली ॥

त्याचेच हे फल, झाले सुफळ, सखी पोफळ फळी भरली ।

लांबलचक वेणी, विणुन त्रिवेणी, घर घेणी अवतरली ॥

बुचड्याचा आधी झोक, त्यामधी ठेवी कोक नो, झोके भर पुरली ।

सकुमार नार, फार गुले अनार, शाल दुशाल पांघरली ॥चा०॥

राखडी केतक कुहरी ॥ बोर नक्षिदार लहरी ॥

केवड्याची घडण शहरी ॥

मुख चंद्रकोर गहरी ॥

देती चंद्रसूर्य बहारी ॥

सारी शान केवळ लाहरी ॥चा०॥

उचलुन धरी निरी, तसुतसुवर चिरी, खरिखुरी परी नटली ।

अशि असोन करि कोकिळ किजबिज आकासची वीज तुटली ॥ चाले काही०॥२॥

शिरी केश कुरळ, मधि मधि भांग सरळ, मुखी दंत विरळ सगळे ।

गोरे गोरे गाल, ओठ अतिशय लाल, डोळे जलाल दोन्ही आगळे ॥

भूषण भरित कान, भवय कमान, मान पाहुन पळती पिंगळे ।

नाकाची टोच, जशी मोराची चोच, बोच भलिग भली मुंगळे ॥

भरदार छाती रुंद, त्यावर कुच बुंद, अरुंद ना पघळे ।

गळ्यात गळसर, मोतियांचे सर, हाती हातसर जवे वेगळे ॥चा०॥

तोडे गोठ गोल गजरे ॥ गुंफिले करुन रजरे ॥ बोले सैली सवे गुजरे ॥

दावी बाच्छाई धजरे ॥ पुढे मागे शिपाई हुजरे ॥

मुखरणि करती मुजरे ॥चा०॥

पोर्‍याजवळ वोपी तबक ॥

आपुण मधी सुबक ॥

भभक उठली ॥

दिपतात नारी नर, सुनर सिनर, जुनरची रयत हटली ॥चाले काही०॥३॥

पातळ नितळ, तनु सीतळ पितळ, नव्हे सोन्या परिचमके ।

कंचुकिची तक तक, पदराचि झकझक, ऐकदाच लक झमके ॥

साखळ्यांची खुळखुळ, तोरड्यांची घुळरुळ, मंजुळ छुछुमके ।

जोडव्यांची सणसण, मासोळ्यांची झणणण, दणणण पाय धमके ॥

मोठ्या आनंदात, मदनाच्या फुदात, खुब छंदात ठुमके ।

लवलव इची हाले, नयनाचे हाणी भाले, चाले करीत गमके ॥चा०॥

गंगु हैबती कवी म्हणती ॥

इची पद्मिणीत गणती ॥

लोक उगीच गुण गुणती ॥

मनी विकल्प का आणती ॥

करी सहज चपलपणती ॥

देहे स्वभावाची खुणती ॥चा०॥

महादेव गुणी मणी, सुगर शिरोमणी, आणिबाणी आज लुटली ।

प्रभाकर गाई बुट, अपरूप अनसुट, सारी जुट लुट पुटली ॥चाले काही०॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP