मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
कृष्ण केवळ हा मम प्राण वि...

लावणी - कृष्ण केवळ हा मम प्राण वि...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


कृष्ण केवळ हा मम प्राण विसावा पाही ।

किती सुख सांगू या मुखानं त्याचे बाई ॥धृ०॥

पुण्य पूर्विचे उदयास अकल्पित आले ।

म्हणुन मी कांता पहा अशा प्रभूची झाले ॥

भासति माझ्या भाग्याचे शिकंदर ताले ।

सौख्य भोगुनया मम पंच प्राण निवाले ॥

किति आर्जविती सेवक उभे भवताले ।

विनंत्या करिती पसरून जरीचे शेले ॥चाल॥

भरली भांडारे द्रव्यास निंवता नाही ।

दृष्टिने पहाता नित समाधान मन होई ॥१॥

केलि मजसाठी रंगीत हवेली खासी ।

छते आरशांची बशिवली रंग गुलाबासी ॥

खांब चौगदी सरुदार मधिल मजल्यासी ।

रेशमी दोर्‍या शोभतात झोपाळ्यासी ॥

रूजामे खाली मऊ साफ स्वच्छता त्यासी ।

सभा इंद्राची आणिली याच ठाय सी ॥चाल॥

हवाशिर उडति कारंजी ठाई ठाई ।

छड्या निट गेल्या गुलछबू फुलल्या जाई ॥२॥

फाणसे झाडे फिरंगाणी काम बिलोरी ।

लाऊन मेणबत्या भवताल्या हारोहारी ॥

पडदे किनखाबी मशरुचे भारी भारी ।

रोगणी भिंती लखलखाट वर तय्यारी ॥

बोलती पक्षी मंजुळ बाई पुढल्या द्वारी ।

येश सख्याचे वर्णितील प्रजाजन सारी ॥चाल॥

काय देउ उपमा तुळणेस दिसेना काही ।

ओवाळुन काया टाकावी वाटे लवलाही ॥३॥

कडी जडिताची मुद्रिका हिर्‍याच्या बोटी ।

सृष्टि मोलाची हाती अमोलिक झळके पेटी ॥

हार पाचुचे मोत्यांच्या माळा कंठी ।

केशरी गंध कस्तुरी टिळक लल्लाटी ॥

चौकडा कानी शिरपेच तुरा पागोटी ।

चंद्र पुनवेचा आला उतरून माझे साठी ॥चाल॥

पुण्यशीळ राजा पृथ्वीवर ज्याची द्वाही ।

शोधिल्या थोडा जरि दिशा धुंडिल्या दाही ॥४॥

देशो देशिचे द्विज कीर्ति ऐकुनी येती ।

तृप्त होउनया नित आशिर्वाद ते देती ॥

तपस्वी साधू सद्‌गुण सख्याचे गाती ।

कितिक रूपवंत्या मुख पाहुन बलाया घेती ।

गंगु हैबती कविराज कवीची ख्याती ।

महादेव गुणी ते जिवलग जिवाचे साती ॥चाल॥

ईश्वरा माझ्या सदोदित बर्‍यावर राही ।

नकोरे तुट पाडू म्हणे प्रभाकर सहसाही ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP