मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
मज मैनेच्या प्राणसख्या रे...

लावणी - मज मैनेच्या प्राणसख्या रे...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


मज मैनेच्या प्राणसख्या रे गुणीराया ।

किति होतिल नव्या अखेर तुझी मी सुगराया ॥ध्रु०॥

तुझी प्राणपती । घडोघडी सय किरे होती ।

धिर धरवेना या छपरपलंगी राती ॥

नित्य दिस जाती । वैर्‍यापरी गुणशांती ।

नको रागे भ्रू ये फेडी जिवाची भ्रांती ॥

दम धरू किती राहुन लहरा येती ।

हा मदन विखारी सर्प छळी एकांती ॥चाल॥

तू धन्वंतरी प्रियकरा ॥

दाहा शमीव हौसपाखरा ॥

मज गिरजेच्या शंकरा ॥चाल॥

विश्रांतिच्या मंदिरा विड्या घ्याव्या ॥१॥

अरे तुजखाली सुखात वर्षे गेली ।

नाही समोर कधी निकराची भाषणे झाली ॥

ही लुट लाली । ऐन भरामधी आली ।

श्रृंगार करुन किति फिरू तुझ्य रे भवताली ॥

गळी हात घाली चाल आता रंगमहाली ।

कर सनाथ अंगे निजुन परांची न्यहाली ॥चाल॥

काय केले तुला मी कमी ॥

जन्माची दिल्ही कि रे हमी ॥

मग उगीच करता श्रमी ॥चाल॥

प्रीतिच्या पाळुन रीति तडीस न्याव्या ॥२॥

चंद्रा ऐसी । आलि दिसून प्रीत तैसी ।

दोन दिवस बहार भोगुन जासी गुणराशी ॥

घरी मजपाशी का रे प्रतर्णा करसी ।

खरे सांग सख्या कुठे वचन देउन फसलासी ॥

सासुरवासी । नाही कुणाची दासी ।

हर केव्हा प्रसंगी पडेन आल्या समयासी ॥चाल॥

तू श्रीमंत घरचा खरा ॥ नित लावुन फुलांचा तुरा ॥

झरुक्यात बैस चातुरा ॥चाल॥

पाहिन मी डोळेभरुन रसलाव्या ॥३॥

अरे मजवाणी । नसेल दुःखी कोणी ।

किति शहर पुण्यामधी सुखात निजती प्राणी ॥

नाही सौख्य पर्णी । ही कर्माची कहाणी ।

अरे प्राणसख्या नको रुसुन बसू निर्वाणी ॥

मी नवी तरणी । रडत पडे अंथरुणी ।

धर समजाउन ह्रदयासी एकांती राणी ॥चाल॥

म्हणे गंगु हैबती उठा ॥ रंगबहार एकांती लुटा ॥

धर सुंदर करी पोपटा ॥चाल॥

गुणी महादेवाच्या गोष्टी जीवी धराव्या ।

गुणी राज करी नवे छंद प्रभाकरराव्या ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP