मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
बहार हा झाला रात्री मोतिय...

लावणी - बहार हा झाला रात्री मोतिय...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


बहार हा झाला रात्री मोतिया फूलला ॥धृ०॥

द्राक्षीचे मंडप बाई छाया अती दाट ग ॥

पाचव्या मजल्या वरती सफेतीचा थाट ग ॥

पडदे चिकाचे भवते मधी चोर वाट ग ॥चाल॥

कांचेची कारंजी कंदील शोभती ॥

घोस फुलांचे वरुनी सुगंधिक लोंबती ॥

खुशालित मजला स्वामी घेउन बैसती ॥

तेव्हा असे वाटे अधी म्या ईश्वर पूजिला ॥१॥

झुळ झुळ वारा वहातो चांद्णे थंड ग ॥

झगमग तारे करती आकाशी उदंड ग ॥

पहाता आनंद वाटे मनाला अखंड ग ॥चाल॥

लावुन रुपेरी हलके हिंदुळे बांधिले ॥

खांब सुरूचे सूत्रे नकासून साधिले ॥

तर्‍हेतर्‍हेचे रंग छताप्रती दीधले ॥

इंद्रभुवन भसे पाहुन या मजला ॥२॥

प्रियकर हौशी माझा केवळ वसंत ग ॥

डोईस बस्ती फेटा दुपटा बसंत ग ॥

आपुल्या गुणे मी झाले तयाला पसंत ग ॥चाल॥

वर खाली पाहुनी मर्जीने वागते ॥

विलासात चारी प्रहर सख्यासवे जागते ॥

अलाबला घेउन तिंदा चरणांसी लागते ॥

दुसरे सुचेना काही असा जीव रीझला ॥३॥

काय सुख सांगू सखये विलासी भ्रतार ग ॥

घिरट्या सभोवत्या करते होउन मी घार ग ॥

चतुर सखा मी त्याची प्रियकर नार ग ॥चाल॥

असा असो जन्मोजन्मी आवडता स्वामी ग ॥

रत नसो परक्या ठाई परस्त्रीच्या कामी ग ॥

म्हणे गंगु हैबती नांद सुधामी ग ॥

महादेव गुणी गाता, प्रभाकर गुणी गाता अनंद सभेला, रंग सभेला ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP