मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
स्वता खपुन आज चार दिवस रं...

लावणी - स्वता खपुन आज चार दिवस रं...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


स्वता खपुन आज चार दिवस रंगमहाल सजविला ।

चौगदी शिंपून सुगंधे चौखणी भिजिवला ॥धृ०॥

चैत्रमास अधी शुद्धतिथी अमृतकर पुरता

सकळ कळामंडीत पौर्णिमा विराजतो वरता ॥

शुभ्र करुन शृंगार पुढे तिष्ठते समर्था ।

विलास भोगा छपरपलंगी का अंतर करता ॥

आनंद करती सर्व घरी दिस जाणुन सरत ।

उद्यांपसुन अंधार चंद्रमा तो उतरता ॥चाल॥

वसंत ऋतुचा बहार एकांती पलंगावर भोगा ॥

आण स्मरुन मनी बेत उतरला आज मर्जीजोगा ।

लगट करून शेल्या मी धरते तिनतिंदा सोगा ॥चाल॥

अरास करुनी तयारिने हा प्राण झिजिवला ॥१॥

चौथा मजला उंचशिरा करी बहार आकासी ।

चै कटिचे आरसे बदामी बसविले नकासी ॥

सभोवती कारंज्यामधी कमोदिनी विकासी ।

पवन घेउन मकरंद उतरतो नाही पार सुखासी ॥

बैठकिची फाणसे पुढे झळकती प्रकाशी ।

हस्तिदंती मंचकी बसुन मुख लाविन मुखासी ॥चाल॥

कलाबतूचे घोस झालरिस मधि गुंफुन मोते ॥

सफेत सारे तळी रुजामे रम्य स्थळ भवते ॥

क्षणक्षणा मुकचंद विलोकुन सौख्यामधि पोहते ॥चाल॥

रक्षुन मर्जी प्राण तुझा परोपरी रिजविला ॥२॥

काठ किनारी बूट जरी आधी परिटघडीचे ।

पातळ नखरेदार मुलायम फुल चै कडिचे ॥

पोहच्या पेट्या हार गळी पदक मधी लडिचे ।

बाजुबंद दंडावर मोती हले हलकडिचे ॥

चंद्र सूर्य वरी नाग मधी घडीत राखडिचे ।

चपलेपरि चपलाते जवाहिर खुब जडाव जडिचे ॥चाल॥

कर्णफुले तळपता उजेड दोहो गालावर पडती ॥

अपाप सुटली गाठ नजर कर कुचाग्र तडतडती ॥

सकुमार तुझे हस्त केव्हा या वक्षस्थळी भिडती ॥चाल॥

विवेक करुनी अनंग हा बळे बळे विझिवला ॥३॥

मुखात मुख घालून सख्या तव अंकी बसते ।

मीच विनोदेकरुन मघापुन मिठि मारुन हसते ॥

हस्तमुखे बोलसी परंतु चिन्ह नवे दिसते ।

वरवर मज कुरवाळुन पहासी तोंडाकडे नुसते ॥

उगीच कसे राहवते तरी गळ घालुन पुसते ।

न होय मुळी वासना नवल परी मन माझे खचते ॥चाल॥

श्रीमंत तुम्ही नवनव्या तुम्हाला नित भार्या मिळती ॥

घरोघरच्या कामिनी फिरस्ते पती म्हणुन किती जळती ॥

गंगु हैबतिचे छंद विचक्षण ऐकुन कवी पळती ॥चाल॥

महादेव कवी म्हणे प्रभाकर रंगमहाल उजविला ।

नेउन एकांती प्राण सख्याला पलंगी बशिवला ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP