मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
ध्यान तुझे दिनरजनी । चोळि...

लावणी - ध्यान तुझे दिनरजनी । चोळि...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


ध्यान तुझे दिनरजनी । चोळि आंगामधे तंग दाटली छडीदार ती गजनी ॥ध्रु०॥

श्रृंगार करूनया नटली । चपल हौसेने उभी माडीवर नेत्र सांग उरी फुटली ॥

चपला गगनी तुटली ।

तनमन लागुन प्राण वेधले चंद्रजोत जसी सुटली ॥

गोष्ट सुचेना कुठली । तिंदा पाहाता धनी पुरेना मम वृत्ति ते हरली ॥चाल॥

कर वचनाचा मान । तुझा बादली सर्व सामान ॥

हसूनिया बोल करी वरमान । कशाला कोण आता दरम्यान ॥

कळेन काय तुझा अनमान ।

रुपासी होइल शेवट घाण ॥

वचन हे सत्य आण प्रमाण ।

मारिला जडुन जिव्हारी बाण ॥चाल॥

लाल नेसली सुजनी ॥१॥

नको करू गडे गुरमी ।

भारंभार घे सुवर्ण काया कशास धर्मा धर्मी ॥

शब्द भेदला वर्मी । उडीव अशामधे कळेना आहे जे लिहिले कर्मी ॥

झुरतो भरमाभरमी । दुरवर देइ दृष्ट भराची निघुन जाइल गुरमी ॥चाल॥

अशा पाहिल्या फार । पद्मिणी फिरती दारोदार ॥

लागतो काय अशाने खार ।

खुषीचा सौदा जिन्नस वार ॥

चांद्णे दोहो दिवसांचे गार ।

पडतसे सर्वेच अंधःकार ॥

पहा पहा क्षणभंगुर संसार ।

घालीतो घिरट्या होउन घार ॥चाल॥

कसे लाविले भजनी ॥२॥

मर्जी तुजवर बसली । म्हणुन आम्ही गडे गोष्ट बोललो असली अथवा नसली ॥

तूच काय एक असली । एकंदर मुद्रा ऐट खुले हिरे जडित नसे तुज पसली ॥

भर ज्वानी मुसमुसली । म्हणून आम्ही गडे नोक लाविली चाल तुझी बरी दिसली ॥चाल॥

नको करू अभिमान । जाहले तप्त पंचही प्राण ॥

व्यर्थ का उगेच घेसी रान । सांग तू कोठे आहे देहभान ॥

करी गे शरीर आम्हासी दान । नसे मग काही किंचित वाण ॥

कशाला अडुन धाडसी पान । समजले मानभावी ते ध्यान ॥चाल॥

कितिक विकसी वजनी ॥३॥

इच्छा मनची पुरवी । शरीर कामी तप्त होतसे शांत करुन या जिरवी ॥

मंजुळ वाक्ये मुरवी । द्रव्यावरता जीव ठेउनिया नको चालु गडे गर्वी ॥

स्नेह सागर भरवी । विकल्प सोडुन कल्प करावा भ्रांत कशी ते नुरवी ॥चाल॥

मनी तुझी हे दरक । तुला इष्काची नाही पारख ॥ कथिल चांदिचे सारखे वरख ।

मोजसी समान कैसा तरक ॥ विडे पाठवुन केले गरक । म्हणे प्रभाकर लौकर उरक ॥

गळ्यामधे हात घालुन मुरक । नसेल जर मानस परती सरक ॥चाल॥

भ्रांत फिटेना अजुनी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP