मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
हाय हाय करु काय झाली आग अ...

लावणी - हाय हाय करु काय झाली आग अ...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


हाय हाय करु काय झाली आग अंगाची रे ।

उडिव मजा उट रतिसुख संगाची रे ॥ध्रु०॥

बहुत श्रमाने मोहममता जडली रे ।

म्हणुन सुसंगत तुझी माझि घडली रे ॥

आता कुणाची पडसावली पडली रे ।

कोण मनातुन प्रियकर आवडली रे ॥

स्वस्थपणे कोण एकांती सापडली रे ।

नाहक सख्या आग मजवर पाखडली रे ॥चाल॥

काय कधी तरी अशी सेवेस चुकले रे ।

विषय सुखाच्या कशी रसास मुकले रे ॥

तुझ्या वियोगे शरिराने सुकले रे ॥चाल॥

नव्हे नार मी वाइट ढंगाची रे ।

जाती घडी पहा एक एक रंगाची ॥१॥

फिदा सदा मन तुझे निजण्यावरते रे ।

ह्यासाठी परोपरी कसे आर्जव करते रे ॥

स्मरुन जिव्हाळा किती मरणी मरते रे ।

प्रहर प्रहर नित पलंगावर ठरते रे ॥

दृष्टि न पडता क्षणात घाबरते रे ।

भेट होता गळी मिठी मारुन धरते रे ॥चाल॥

ज्या दिशी नागा त्या दिशी तळमळते रे ।

स्वप्न अवस्थेमधी तिंदा गळते रे ॥

जागेपणी मग मनचे मनी जळते रे ॥चाल॥

रव रव रव करी सार्‍या सर्वांगाची रे ।

चोळी तडकली उरात भिंगाची रे ॥२॥

कामे करून मी-ना जरतर तरते रे ।

सगुण गुणांणा नातर अंतरते रे ॥

विषय अधी मग स्वकर्म नंतर ते रे ।

इतर काशांचे काय आवंतर ते रे ॥

दिव्य स्वरुप जे कसुन तंतर ते रे ।

जलदी आता कर पदरच हंतरते रे ॥चाल॥

सैल सो तरी मज मुठीत धरु दे रे ।

अशानेच मन समाधान करु दे रे ॥

मदन रगा ह्या त्वरित गती जिरुंदे रे ॥चाल॥

शपत तुला त्या जेजुरलिंगाची रे ।

किती कळ सोसू अजुन अनंगाची रे ॥३॥

सर्व सुखाहुन मोठे मैथुनसुख रे ।

आणिक दिसेना या एव्हढे दुःख रे ॥

कमरबस्त लागुदे मुखास मुख रे ।

क्षुधित कधी नये दवडू विन्मुख रे ॥

त्यात चालला आजवर सलूख रे ।

उगीच फिरशि का बारा मुलूख रे ॥चाल॥

गंगु हैबती भले शाहिर वरदी रे ।

गैर साल गुणी महादेव मरदी रे ॥

पुरा प्रभाकर कवनामधी दरदी रे ॥चाल॥

झोड उठे बीन मृदंद चंगाची रे ।

इच्छा करती गीत प्रसंगाची रे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP