मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
सुखाचे संगती परपुरुष तुम्...

लावणी - सुखाचे संगती परपुरुष तुम्...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


सुखाचे संगती परपुरुष तुम्हीरे बेमान ।

बहार भोगुनिया शेवटी व्हाल दुस्मान ॥ध्रु०॥

असुन मी ऐवढी सगळ्यांचि रे सासुरवासी ।

प्रीत चालवली कळल्याविण अणिक जीवासी ।

न होता दर्शन नित रहात होतो उपवासी ।

आठव कर सख्या काही भिउन चाल देवासी ॥

लागला पुरता तुजपाई डाग दैवासी ।

किति करू चिंता पलंगावर सौख्य सुवासी ॥चाल॥

जेव्हा तेव्हा केल पतीपरिस तुझा रे सन्मान ।

बुडाले दिसते कलयुगी सकळ इमान ॥१॥

प्राणप्रियकरणी तुज वाचुन चैन पडेना ।

सुरुपवंती कोणती स्त्री आवडेना ॥

वाचिता लिहिता अर्थातरी चित्त जडेना ।

पुराणी भजनी कीर्तनी लयलक्ष गडेना ॥

जवर जीव शरीरी तवर तर गोष्ट घडेना ।

रत्‍न तुज ऐसे धुंडिल्यास सापडेना ॥चाल॥

कसुन किती पहासी खरे सुहास्य वदने मान ।

सत्य पाहुन या आले युधिष्ठिरास विमान ॥२॥

पुरुष तुम्ही कपटी काय तुम्हास उंच पदार्थ ।

नाहक भरी पडले धड प्रपंच ना परमार्थ ।

धुरंधर एव्हढा संपन्न पराक्रमी पार्थ ।

सुभद्रासदनी राहिला सर्व खचितार्थ ।

वनांतरी तपला तप विश्वामित्र यथार्थ ।

अखेर रंभेचा पहा तयाने केला स्वार्थ ॥चाल॥

अशी रीत तुमची, भोगिता व्यर्थ अभिमान ।

दावुन भावार्थ केसाने कापलीस मान ॥३॥

॥ चाल ॥ सुखशयनी मम प्रियकर प्राणविसावे ।

अविट ममतेत विट विकल्प कधि ग नसावे ॥

कल्पवर आपले सुखरुप देही प्राण असावे ।

आनंदे सदनी सोन्याचे दिवस दिसावे ॥

म्हणे गुणी गंगु हैबती हे शब्द ठसावे ।

सदोदित ह्रदयी रिझवावे भाव बसावे ॥चाल॥

महादेव गाती राखुन इष्काचे गुमान ।

प्रभाकर कविची कविता अमृता समान ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP