मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
कुठे रात्र कर्मिली आज सगु...

लावणी - कुठे रात्र कर्मिली आज सगु...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


कुठे रात्र कर्मिली आज सगुणसागरा ।

उभे राहुन एकांती वृत्तांत सांगा सारा ॥ध्रु०॥

दरबारचे नाव अरे प्राणसख्या सांगुनी ।

गेला छपरपलंगी रात्री मला त्यागुनी ॥

कुठे चिराबंद रुपवंती नार भोगुनी ।

आला नेत्र पुशित प्रियकरा घरा मागुनी ॥

बरे समाधान मज करिता आलिंगुनी ।

वैर्‍याची लोटली रात्र वृथाजागुनी ॥चाल॥

आता हसुन बसुन वरवर मुख कुरवाळीता ।

आला दिवस असा का जिव माझा जाळिता ।

कोरडेच कुच करी धरुन कवटाळिता ॥चाल॥

विश्रांत वेळ टाळिता अशि काय तर्‍हा ।

मसी नाडबंद राहुन जाशी परभारा ॥१॥

आवडिने एकाती कडेवर मज घेउनी ।

नित नग्न पलंगी करित होता नेउनी ॥

तांबूल मुखांतिल प्रसन्न मने देउनी ।

गुजगोष्टी करा की हो खुशीत मग येउनि ॥

घडो घडी स्तनावर कोमल कर ठेउनी ।

सौख्याचे सार शरिराचे सर्व सेउनी ॥चाल॥

आता दुरुन दुरुन पडद्याने शब्द बोलता ।

झिजविला देह किरे पहा पहा तुज खालता ।

रात्रींच्या कुठे कुठे तरि घिरट्या घालिता ॥चाल॥

आडवाट धरुन चालता हो प्राणेश्वरा ।

काळजी कांच शरिरांस हाच सकुमारा ॥२॥

काय काय आठवू हर्ष तुझ्यारे संगतिचा ।

नाही शब्द कधी रे बोललास वरकांतिचा ॥

अत्यंत तू माझा प्रियकर एकांतीचा ।

वाखाणू कोठवर गुण सगुणशांतिचा ॥

बोल तुझे सुघड तू पोपट विश्रांतिचा ।

भाससी अमोलिक थेत हेट प्रांतिचा ॥चाल॥

मरमरून जात तुजवरुन ह्रदयरंजना ।

हौसेच्या नगा कंदर्प अग्न भंजना ।

जिरशील कसारे मम लोचनिच्या अंजना ॥चाल॥

सजणा दृष्ट किरे होईल शाम सुंदरा ।

नको नटुनथटुन जाऊ नित्य उठुन परदारा ॥३॥

इछीले ते तू मज मनापासुन पुरविले ।

संगतिचे सौख्य सर्वात सदा मिरविले ॥

घेऊन मांडिवर पंचामृती भरविले ।

बैसल्या रुसुन समजाउनी मन मुरविले ॥

सोन्याचे दिवस दाखवून दुःख हरविले ।

अलिकडेच कोण्या सवतिने विपट करविले ॥चाल॥

असो कळेल तिथे तुम्ही खुशाल मौजा करा ॥

पुरे दृष्टी भरुन पाहिल्या तुला रे प्रियकरा ॥

करी कवन गंगु हैबती शुद्ध शर्करा ॥चाल॥

महादेव गुणी गुणिराज गुणीजन पुरा ।

कल्पना घेउन करी छंद प्रभाकर तारा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP