मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
आलो दक्षिणेकडून जावया ...

लावणी - आलो दक्षिणेकडून जावया ...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


आलो दक्षिणेकडून जावया उत्तरेस घर त्यजून ।

पाहुन तुझा मुखचंद्र विसरलो मार्ग न चाले अजून ॥धृ०॥

घेउन मुशाफरवेष निघालो स्वदेश सोडुन जरी ।

मजलो मजली भेटवितो हरी तरुण स्त्रिया साजरी ॥

जसे हौशि आम्ही तशि तू हौशिण रूप रेखिव गोजरी ।

सड पातळ सकुमार थेट दिसतेस मदनमंजरी ॥

भवयकमाना ओढुन मारसी नेत्र-बाण जंजिरी ॥

देह निचेत पडे एक जसा गंगात्मज शरपंजरी ॥चा०॥

जीवी सोसुन त्या वेदना, साजणीग ॥

लागलो तुझ्या साधना ॥ काय ठेवुन तारुण्यधना ॥चा०॥

तपोधना कर दान आराधुन पाय तयाचे पुजून ॥

पाहुन तुझा मुख चंद्र० ॥१॥

काहो घरोब्या वाचुन करिता हसून संभाषणे ।

नवल मला वाटते कर्णी ऐकुन शब्द भूषणे ॥

समयोचित बोलून चित्त दुसर्‍याचे आकर्षणे ।

सबळ ग्रहांचा गुण कठिण मन रक्षुन संतोषणे ॥

कार्याअंती न्यहाल व्हाल नाहितर ठेवाल दूषणे ।

नाही कमी मम पतीस केले अजून मदनशोषणे ॥चा०॥

पुरे करा पैठणी आदर, वरवरी हो ॥

काय ठेऊन खोटी नदर, मजवरी हो ॥

उघडून सांगते सदर, ह्यावरी हो ॥चा०॥

बिन बट्ट्याची मी नार माझे मन सर्वांशी मोकळे ।

शहराबाहेर सहज निघाले नागपंचमीमुळे ॥

दृष्टीस पडाची नव्हे परंतू पुजावया वारुळे ॥

नवल मला वाटते० ॥२॥

शब्द करुन जाई निघुन त्वरितगती येउन सौदामिनी ।

तसे वदन दाखवुन नको जाऊ, नट चंचळ कामिनी ॥

कधी इकडे येणार वकीलिस पाठविले स्वामिनी ।

ऋणानुबंधे पडलि गाठ म्हणुन अवचित गजगामिनी ॥

हेत मनातिल हाच घडिव गडे संग्रह एक यामिनी ।

बरी बोलू शिकलिस पूर्ण व्युत्पन्न जसा जैमिनी ॥चा०॥

आम्ही पंचि मुशाफर सुगर ॥ जगलो कधि कांते बिगर ॥

भासते हे निर्दय नगर ॥ स्त्रिया पुरुष लेकरे अगर ॥चा०॥

नाहि कोणी कोणाला भजून ॥ पाहुन तुझा मुखचंद्र० ॥३॥

पतिव्रता मी चतुर पती घरी बिरबला सारिखा ।

कळू लागल्या पसुन अजुन नाही ठाउक कुणी पारखा ॥

मनापसुन कल्याण चिंतिता बसुन सौख्य कारका ।

विघ्न आल्या मग कधी पडेल संकट त्रिभुवन तारका ॥

पुण्यशीळ हे नगर प्रभूचे जणु दुसरी द्वारका ।

सदा सुफळ तरू दाट केळी नारळि पोफळी खारका ॥चा०॥

आम्ही अशा नगरच्या स्त्रिया, मुखरणी हो ॥

करू वक्त गुजरल्या क्रिया करणी हो ॥

किती द्रव्या पुरत्या प्रिया जारणी हो ॥चा०॥

स्वधर्मिणी ज्या गृहिणी तयांचे रूप लक्षण वेगळे ॥

नवल मला वाटते० ॥४॥

पती आड किती करिती कर्म हा व्यवहारच सृष्टिचा ।

क्वचित न घेती दोष स्त्रिया पर पुरुषांचे दृष्टिचा ॥

हानि मृत्यु यश लाभलेख जर टळेल परमेष्ठिचा ।

भूभार सांडिल तळी श्रमुन पाताळी कूर्म पृष्ठिचा ॥

कामज्वर जिव रोग औषधी तरु तू धातु पुष्टिचा ।

बहुता दिशी जाहला सहज संगम कपिला षष्ठिचा ॥चा०॥

तारुण्य नदीचा पुर ॥ काय भर कसुन भरपुर ॥

मुळी क्षणिक कायापुर ॥चा०॥

नाशिवंत जाणून चतुर चतुरावर जाती रिझून ॥

पाहुन तुझा मुखचंद्र० ॥५॥

बरे वाइट एक शरीर एकांती दाखविले प्रियकरा ।

काय दाउन दुसर्‍यास वाटतो ह्रदयांतरी खरखरा ॥

समुद्र शोषुन तडिस काढिल कशी टिटविण लेकरा ।

अमरपुरीचे असाध्य अमृत गरुडाविण पांखरा ॥

अधीर होउन मजसाठी बुडविता रोजगार आज खरा ।

धिर न धरवे जरी तरि तुम्ही विचार दुसरा करा ॥चा०॥

मी सत्यवती सुंदरा पुतळी हो ॥

आहे स्त्रियात गुण मंदिरा भूतळी हो ॥

साक्षात जशि इंदिरा सुस्थळी हो ॥चा०॥

कमल प्रफुल्लित तळ्यात तैसे हास्य वदन कोवळे ॥

नवल मला वाटते० ॥६॥

द्वापारात द्रौपदी जरि होती पांचांची नोवरी ।

भोग भोगि त्या सवे तरी तिची इच्छा कर्णावरि ॥

शंकरारास जो मदन छळीतो काय कांता आवरी ।

कसे घडेल तरि गडे त्यात तू नट चंचल बावरी ॥

पंच वधू मधी श्रेष्ठ अहिल्या सत्व धीर द्विजवरी ।

सूर्यग्रहण पर्वणी दिशी बसली सुरेश अंकावरी ॥चा०॥

पहा असा स्त्रियांचा आचार ॥

घडतात किती व्यभिचार ॥

कर मनात पुरता विचार ॥चा०॥

चारि प्रहर चल भोगु भोग आरशांचे मंचकी निजुन ॥

पाहुन तुझा मुखचंद्र० ॥७॥

पर स्त्रीच्या पायी विराट सदनी कीचक संहारिला ।

शिळाश्वेतु बांधून दशानन भरताग्रजे मारिला ॥

पहा पहा एवढा ग्रंथ व्यास वाल्मिकांनी विस्तारिला ।

श्रवण करुन ते अखेर जर भजतातच व्यभिचारिला ॥

व्हा सावध तुम्हि तरी नका होऊ लंपट परनारिला ।

सुखात भोगा घरी राज मंदिरी सुंदर लहरिला ॥चा०॥

करी गंगु हैबती कवन बोधुनि हो ॥

अक्षरी मोत्यांची ववण साधुनी हो ॥

महादेव गुणी ठेवति ठिवण शोधुनि हो ॥चा०॥

प्रभाकरांचे करणे शुद्ध करी निर्मळ बुद्धि वसो ।

तर्‍हे तर्‍हेचे इष्क अमोल्क जिन जिनसाची फसो ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP