मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
अनंतरूपी लय लक्ष जसे तुको...

लावणी - अनंतरूपी लय लक्ष जसे तुको...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


अनंतरूपी लय लक्ष जसे तुकोबाचे रंगले ।

तसे तुझे ध्यान मलारे लागले ॥ध्रु०॥

जेव्हा तेव्हा तुजसाठी सख्या जिव माझा कळकळी ।

फुटे शरिरात मदनउकळी ॥

त्यजुन रुपरंगाची असी पाकळी ।

भोगिता येर फुलांची कळी ॥

असे जर कळते स्नेहाअधी तर राह्ते मोकळी ।

आता नाही सुटत प्राण आकळी ॥चाल॥

म्हणवुन घालिते गळ । घरी असुन सर्व मंगळ ॥

भासती सकळ इंगळ ॥चाल॥

नसुन अमंगळ कुरुप कुठे का मन वैतागले ॥१॥

उगीच अकाळी बहुत उठे मलिन मेघ डंबर ।

शोधिता वर पोकळ अंबर ॥

चुकी नसता गांजिल्यामुळे खरे बसली कंबर ।

त्यात बहरत ऐन उंबर ॥

खाते पिते नेसते नवा भरजरी पीतांबर ।

स्वच्छ शय्येवर धौतांबर ॥चाल॥

हे वरवर सारे सोहोळे ।

करू काय कनक कोहोळे ॥

होती विषयाचे डोहोळे ॥चाल॥

येति उमाळे घडोघडी सौख्य स्मरुन मागले ॥२॥

विवाह झाला ज्यासवे तयास दुर ठेउनी ।

अनंदे गुज पुसते येउनी ॥

न्याहाळूनी पहाता उराकडे लगबग मग जेउनी ।

छपर पलंगी आवडिने नेउनी ॥

गाठ सोडुनी कंचुकिची करी तांबुल देउनी ।

मिठी मारुन बसत घेउनी ॥चाल॥

चारी प्रहर रात्र या सुखे ।

कर्मिता सुशोभित मुखे ॥

जाते विसरुन अवघड दुःखे ॥चाल॥

कितिक कौतुके मिजाजिने आर्जविते चांगले ॥३॥

फुलाप्रमाणे संगसमयी तव काया तोलते ।

हसुन आसनात मधुर बोलते ॥

निजनिजल्याने घर्म पुसुन वेलदोडे करी सोलत्ये ।

शिरा पानाच्या मी नखाळत्ये ॥

निकड कार्य करणे आल्या दुसर्‍यावर कोलत्ये ।

संतोषे रतिरसांत डोलत्ये ॥चाल॥

करी कवन गंगु हैबती ।

पुढे अर्थ यमक राबती ॥

ऐकून चतुर थांबती ॥चाल॥

महादेवाच्या पाहुन गती रिपुमंडळ पांगले ।

प्रभाकर म्हणे ह्रदय डागले ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP