मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर|
नमीन मंगलमूर्ती ॥ म्यां न...

दत्ताजी जाधवाचा पोवाडा - नमीन मंगलमूर्ती ॥ म्यां न...

पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.


नमीन मंगलमूर्ती ॥ म्यां नमिली सरस्वती ॥ विनवी कर जोडुनी मात ह्रदा दे मजप्रती ॥ रणशूर म्हणविती ॥ प्राण त्यजूनि त्याग करिती ॥ “मरणा हाक जीवनाअखेर संसाराच्या गती” ॥१॥

जाहाली पादशाही हुकमती ॥ वजीर विजापुरावरी जाती ॥ झगडला दत्ताजी मर्द थोर केली ख्याती ॥ गाजीवली समशेर बावीस उमराव जाणती ॥२॥

वजीर होते कोण कोण ॥ सरलष्कर दलीलखान ॥ दलीलखान दाऊदखान सरफरास कुरतुबखान ॥ रोहिले जोरावर पठाण ॥ चालले वजीर ॥ संगाते लोदी मुशापीरखान ॥ ऐका दखनचे वजीर ॥३॥

राव रंभाजी निंबाळकर ॥ भोंसल्या बाबाजींचें संगें जाधवराव वजीर ॥ जाधवराव जगज्जीवन ॥ माको बल्लाळ बिरामण ॥ रजपुताचा भार ॥ दसवंतसिंग राजा कर्ण ॥ ऐका रजपुती वजीर ॥ जेसिंग राजा ज्याचा सर ॥ भावसिंग चाले बरोबर ॥ रजपुताचे भार ॥४॥

भीडतां दलीलका लष्कर ॥ गड घेरिला पुनेधर ॥ रुद्रम्हालावर मार होतो थोरथोर ॥ पुनधरी झगडा झाला थोर ॥ झगडतां मावळला दिनकर ॥ झाली असे रात्र ॥ फिरले उमरावाचा भार ॥५॥

गड भांडता झाला जेर ॥ गडकरी केलासे विचार ॥ शिवाजी सर्जाप्रति ज्यांनी पाठविली खबर ॥ बंला आलास हुजीर ॥ सांगे गडाची खबर ॥ चढतील मोंगल माणूस ॥ जाया होईल फार ॥६॥

राजा बोले सर्दाराला ॥ म्यां मोंगलासी दावा केला ॥ लुटती सुरत शास्तीखाना केल्या हल्ला ॥ मागून दसवंतसिंग आला ॥ गड कोंडाणा भांडला ॥ भिऊ नको म्हराठया शिवाजी कौल राखण तुला ॥ राजेस बोलले मिलकर ॥ ज्याणा रजपुताला ॥७॥

राज मोंगल एक जाहाला ॥ गड मोंगलाचे हाती दिला ॥ पातशायाच झेड तोफखाना चढविला ॥ गड पातशाया खालसा केले ॥ गडावर चतुर सुभेदार ठेविले ॥ पातशाई चाकर झालो ॥ म्हणजे शिवाजी राज बोले ॥ बावीस उमराव मिळाले ॥ चवदा महाल वर्‍हाडांत दिले ॥ हुकूम पाच्छायाचा जोड दिला आगराच आला ॥८॥

बाजा नगारा बाजिले ॥ पातशाही हेजीब आले ॥ विजापुरावरी मोहीम ऐसी हजार घोडा चाले ॥ खान म्हणे चालला तेथुनी ॥ आवघा कटकबंद करूनी ॥ दिलीलखाना मोहोरे पठाण चाल केदारफणी ॥९॥

भारामागें भार खान कुरकुमभोशा गेला ॥ फौजेमोहोर फौज मोंगल मंगळवेढया गेला ॥ मंगळवेढया जाऊन सरफरासखान वेढिला ॥ मारिला कोट खासा नाहीं सांपडला ॥ तेथून कूच केले कटकाला ॥ मोंगल निलग पावला ॥ निलगे मैदानीं मोंगल रतुडेर दिला ॥ लष्करांनी मव्हपाणी ॥ वजीर करत्याती धांवणी ॥ मोंगल आले बहु दुरूनी ॥ विद्दलशाही केली खचणी ॥१०॥

उमराव पाठविले शिरपाव देउनी ॥ दाऊदखान दलेलखान बसले मजालस करूनी ॥ हाबसी बलूलखान बसला मजालस करूनी ॥ हेंदूराव केदारफणी ॥ घाटगा झुंजारराव चालिला ॥११॥

नाईकजी पांढरा कुल वजीराचा मेळा जाहाला ॥ बोले सर्जाखान दवडा केला ॥ सातशें वणजारा लुटला ॥ लुटिले काबाडवाणी बहुत नागविला ॥१२॥

हुल पडली कुल कटकाला ॥ गोट मारूनियां नेला ॥ मारिलास गोट सर्जाखान निघून गेला ॥ कागद दर्बारीच आला ॥ मर्द कबरबस्त केले ॥ घोडया घाला जीन म्हणे ॥ दत्ताजीराव बोल ॥१३॥

हुजराती म्हालदरा आला ॥ मर्दतगटी यवकेला ॥ बाहीर निघतां जैसा सुबान प्रकाशला ॥ अग्निचा गलोला दत्ताजीराव जाधव चालिला ॥ बाजा नगारा बाजीला ॥ भार निलग दाविला ॥१४॥

भारामध्ये धूर लक्षण शोभ दत्ताजीला ॥ शिकारीचा छंद ज्याला ॥ इसारत देतो शिपायाला ॥ रखमाजी पेशवा यशवंतराव मोहोर जाला ॥ रघोजी रुस्तुमराव भार कडाक्याने चालिला ॥१५॥

शिकार खेळुनि भार आमराईंत उतरला ॥ दुनदारी मौजा त्याला हुका बारदार भरिला ॥ मुकमंडण विडा पानाचा घेतला ॥ दुनदारी मोजा ज्याला ॥ हुका बारदार भरिला ॥ उडती पागार कटीतंग जीन भिडती त्यातें ज्याला ॥१६॥

गमत करितां वेळ जाहला ॥ बाजा नगारा बाजिला ॥ पंधरा हजार घोडा सर्जाखान दौड आला ॥ जाधवराई निशाण भार आमराईत वळखिला ॥ सर्जाखानी हेजीब आला ॥ काय बोले दत्ताजीला ॥१७॥

भांडतां पुरवेना निघून जावे हे वेळेला ॥ जाब जिव्हारी लागला ॥ पेशव्या रखमाजीस बोलला ॥ काटखा काढितां नामवस जाईल आपुला ॥ भाडन सर्तीनसी नाईक नटले या बोला ॥१८॥

सर्जाखानी हेजीब फिरविला ॥ निश्चय झगडयाचा मांडिला ॥ बाणांनी बंदुका वर्षाव एक जाहाला ॥ दत्ताजी अवखंद्या सांपडला ॥ घेरा रावताचा पडला ॥ एक म्हणती जीत धरा दत्ताजीला ॥१९॥

दत्तीजीराव बोले वचन ॥ आली निर्वाणीची वेळा ॥ हें इतुकें ऐकूनी यशवंतराव बोले राजाला ॥ राव रजा द्यावी मला ॥ वोढली समशेर मारीत भारावरी लोटला ॥२०॥

भैरी हातचा सुटला ॥ मारीत भारावरी लोटला ॥ मारी कर्डा हात दुखंड करी रावताला ॥ राव निशाणीसी भांडला ॥ सर्जाखान मानावला खुब किये समशेर म्हणती हिंदुजान भला ॥२१॥

मारीत पुढे येवू दिला ॥ सातापांचांनी मेळविला ॥ सन्मुख चढल्या जखमा ॥ यशवंतराव पुरा केला ॥ दत्ताजीराव बोले वचनीं ॥ यशवंतराव पडला रणीं ॥ निर्वाणीची वेळ बाजू राखाया नाही कोणी ॥२२॥

रघुरायाची करणी ॥ झगडा खेळे झोट धरणी ॥ पुरबाणाची वर बर्च्याची शिंपणी ॥ सारी सराईत मर्दाला ॥ मरणाचे भय नाही त्याला ॥ वाग धरूनि मारामारी रावुताला ॥२३॥

निःशंक भांडतो निर्वाणी ॥ वाग मोकळा सोडुनि ॥ एकवीस जखमा आल्या रावराघोजी लागुनि ॥ राघोजीने झगडा दिला ह्योतर जिवानिशी वाचला ॥ गळा घातली शिगण ॥ रुस्तुमराव पाडाव केला ॥२४॥

येसाजी पंचहत्यारा निवडला ॥ मारीत भारावरी लोटला ॥ मारी कर्डा हात दाणादाणी रावताला ॥ कर्डा संताजीनें झगडा दिला ॥ दावजी कमळजी लोटला ॥२५॥

येसाजी सूर्याजी आपले भांडतील बिन्निला ॥ येक करतील पायस्वारी येक राखतील खाशाला ॥ मनगट तोडुनी शिरीं जखमा हंसाजीला ॥ दत्ताजी चालला तेथुनी ॥ तेथ झाली खणाखणी ॥२६॥

मुंडामुंड पाडुनि येका चडीत येक दारुण ॥ ठीक दावितो तेजाला ॥ भार भरितो बर्शाला ॥ मारी आनवळता हात बर्शा हातचा उडाला ॥ कमरेच्या गुर्द्या हात केला ॥२७॥

नेमून उमराव पाडिला जाहला असे ठणका । गुर्दा हातचा उडाला ॥ दत्ताजी पायउतारा आला ॥ लंगर देऊनिया बिसला ॥२८॥

केला घनचक्कर हात दावितो खाशाला ॥ दत्ताजी होता भवदुश्चित ॥ मग रावतांनी मेळविला ॥ सन्मुख चढल्या जखमा ॥ चक्री लागली डोळ्याला ॥ दत्ताजी पडलासें ऐकिला ॥ सर्जाखान चालून आला ॥२९॥

कापलें शीरकमळ लंगर हातचा काढिला ॥ रण हुंबतसे धरणीला ॥ सर्जाखान निघून गेला ॥ दत्ताजी पडलासें ऐकिला ॥ मग लोधीनें भार केला ॥ खासा दलीलखान चवरडोलांत बैसला ॥३०॥

दिवटीच्या हिलालें खान रणामध्यें आला ॥ जाधवराई मुरदा उचलून पालखींत घातला ॥ वाजत मिरवत मुरदा डेर्‍यास आणिला ॥ आशुद्ध भरलें रुंड बहिणाई आळवी ह्रदयाला ॥३१॥

जाधवराया मागें नांव होतें दत्ताजीला ॥ बहिणाईनें आकांत केला ॥ कळंब राघोजीला आला ॥ रोदना करिता दीन उदया पातला ॥ तेव्हां बहिणाईनें शीर मागावयास बंदा पाठविला ॥३२॥

बंदा आलासे हुजूर ॥ काय सांगे त्या खानाला ॥ द्यावें शिरकमळ सर्जाखानास बोलला ॥ बंदा हुजुराती देखिला ॥ खान दापूनिया बोलला ॥ उमराव का शीर मैं भेजुंगा दरबाराला ॥३३॥

घाटका बाबाजी बोलला ॥ अशी वेळ घडती मर्दाला ॥ द्यावें शिरकमळ सर्जाखानास बोलला ॥ घाटगा बाबाजीच बोलला ॥ जाब खानाच्या मना आला ॥ तेव्हां सर्जाखान बंदा नजिक बोलविला ॥३४॥

घाडग्यांनीं बोल केला ॥ आपला स्वहितधर्म राखला ॥ शीर घेतलें मागून बंदा वाटेसी लावला ॥ शिररुंडा भेट केली ॥ मग रचलें सरण बहिणाईचें आंगी आलें सतीचें फुरण ॥३५॥

उटी घेऊन चंदनाची दिसे रुद्रा यौगिण ॥ हत्तीवर बैसुनी दिसतें स्वर्गाचें विमान ॥ फोडूनिया भांडार द्रव्य वांटती भाटाला ॥ वाजत मिरवत आली सरणाजवळी ॥३६॥

बहिणाबाईनें उडी टाकिली ॥ रामराम स्मरुनि ॥ खान माघारा फिरला ॥ आपल्या मुलखास चालिला ॥ पंधरा हजार घोडा सर्जाखान दुमाला केला ॥ काकरळ्या तळ्यापें मर्द कठक बंद केला ॥३७॥

हत्तीवर जोडल्या हातनाळा ॥ उंटावर जोडिले जंबूर ॥ बाणाच्या सवें जूत्या राजा मिर्जा मोहोर झाला ॥ पंधरा हजार सर्जा एकांगी भांडला ॥ जंबुर्‍याच्या गोळ्या सर्जाखान पुरा केला ॥३८॥

सर्जाखान पडलासें ऐकिला ॥ दलेलखान चालून आला ॥ कापलें शीरकमळ लंगर हातचा काढिला ॥ रण हुंबतसे धरणीला ॥ दलीलखान निघून गेला ॥३९॥

झगडा झाला थोर दत्ताजी जाधवराव पडिला ॥ अज्ञान यमाजी भगवंताची सेवा त्याला ॥ ह्रदयीं लक्ष लावुनी ज्यांनी बिरमाल गाईला ॥ सव्वा शेर सोन्याचा तोडर घोडा बक्षीस केला ॥४०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP