मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर|
शिपाई चाकरी गेले नागपुराल...

नागपूरकर चिमणाबापू भोसल्याचा पोवाडा - शिपाई चाकरी गेले नागपुराल...

पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.


शिपाई चाकरी गेले नागपुराला । तेली वाणी उदमी दाली बांधू लागला ॥ध्रुपद॥
राजांनी मनसुबा केला बंगाल्यावर । पहिले मोहतुर दिले खासे डेर । बोलावुन मानकरी कचेरी भर । झाली चिमणाबापूची ताकिद जलदी फार ॥ राव माने मानकरी घाटगे पाटणकर । यादव निंबाळकर ज्यातक जाधव ढमढेर । ननवरे पठाण सार । झाली हुजुरात तयार । अगड धों धों बाजे चवघडा बाहेर निघाला । राव बांड निशाण हाय उजव्या बाजुला ॥शिपाई०॥ ॥१॥

वनीं येळवाच्या जाळ्या वन दारुण । कइकांनी आबधाकें दिले प्राण सोडून । कइकांसीं आलें हिवजाळ धास्तिन । गेली फौज सोमल वाडयावर चालुन ॥ मग सोडलीं निशाणें । हल्ला उठला चहुंकडून । मग सुटती तोफा बाण । झाली लष्करांत सडघाण । भेसूर दिसे रण । जरीपटका गेला चालुन । राव मान्याची लगी हाय उजव्या बाजुला । गेले मारीत खंदकापाशी मोरच्या दिला ॥शिपाई०॥ ॥२॥

तेली वाणी उदमी नाइक पडले भरी । कर्जाची घेतली घोडी आले चाकरी । गेले वर्‍हाडात फिरून माहुरावरी । दरकूच आले कवडूच्या तळ्यावरी ॥ मनसुबी थोपली सारी । बोलावून मानकरी । सांगितले बरवेपरी । आली बंगाल्याची चाकरी । ओलांडून गेले बारी । गेले चवकेबारीवरी । अशी फौज मिळून गेले नकटेबारिला । एक म्हणती उगाच आलों पस्तावा झाला ॥शिपाई०॥ ॥३॥

गेले लष्कर झाडीमधी पडलें जाऊन । मधिं पडली फट बुणगे गेले चुकून । तीन रोज लष्कर गेलें गडबडुन । धाडून सांडणी मिळाली फौज येऊन ॥ तेल्या वाण्या उदम्यान । घोडें आणलें अर्धलिन । गेलें एकाएकीं मरून । दिलें जिन - खोगीर टाकून । काय जावें देशाकारण । कधीं तोंड दाविना म्हण । गेलें लष्कर कटकावर जागा पाहीला । तेथें जंबुमाळ्याचा लालबाग देखिला ॥शिपाई०॥ ॥४॥

एक आंबराइमधिं उतरले लष्कर । किल्ल्याहून गोळ्यांचा मार निघेना धीर । शिंपी साळी पिंजारी पळती भिऊन माघार । तेली वाणी उदमी होती पाठमोर ॥ एकजात शिपाई रणशूर । मारिवले खंडकावर । दाहा रोज सोसला मार । शिपायाचे ढालबखतर । गोळ्या फोडुन होती पार । गडबडले सोमलपुर । गडबडला किल्लेदार कवलासी आला । दिली खंडणी राजाला । तिथून शह उठविला ॥शिपाई०॥ ॥५॥

एक उडव्या मुलखामधिं गेलें लष्कर । सहा महिने छावणी झाली कटकावर । तिथे बाराभाटिचा किल्ला ऐका थोर । त्या खंडकामधिं सुसरी महाकुंजांर ॥ नादान मुलुख फार । नाही पैसा तांब्याची तार । कवडयांची चाल फार । खायाशी भात - खापर । नेस लंगोटी वर धोतर । अंगीं कळकट बोतर । झाल्या खुशाल रांडा पाहुन भल्या लोकाला । अवघ्या लष्करामधिं उडव्या मुलुख उठला ॥शिपाई०॥ ॥६॥

गेली फौज चालून ढाक्या नाल्यावर । तिथें सोडलीं निशाणें झाले तयार । झाली पहिली हल्ला लोक पडले फार । आली हल्ला फिरून माधारी जयजयकार ॥ भले मर्द शिपाई रणशुर । धावले खंडकावर । लोक जखमी झाले फार । कईकाचीं बुडालीं घर । रणकंदन अनिवार । लढण्याची हौस फार । गडबडला किल्लेदार लागले झाडी तोडायला । देइना खंडणी तसाच पळून गेला ॥शिपाई०॥ ॥७॥

पुरीवर लष्कर गेले महिनाभर । एक श्रावणमास महिनापवितर । तिथे जगन्नाथ एक देव तीर्थ थोर । त्याचें दर्शन घेतां पापें होतीं दूर ॥ देवांचें शिवालय थोर । लागेना अंत ना पार । राम लक्षुमण अवतार । रिद्धी सिद्धीचे घर । एक मडकें विस्तवावर । दहा मडके होतीं तयार । वाणीं कुणबी ब्राह्मण बसले जेवायला । एके जागीं जोविती, अवघा गोपाळकाला ॥शिपाई०॥ ॥८॥

एक बालेसरावर उतरले लष्कर । तेथे उत्तार पेठ आहे दरयाचे किनार । गजकर्ण दुःख रोग उठले अंगावर । चारी प्रहर वर्षतो काहार निघेना धिर ॥ आला पाऊस सुटला वार । गारांनी बसविला मार । गेले उडून राव्हटया डेर । उंट तट मेलीं फार । देवाची करणी फिरंगी आला । राजाची फत्ते तलवार यश पावला ॥शिपाई०॥ ॥९॥

भगवंत दिले वरदान आले फिरून । एक बंगाल्याची चाकरी झाली कठीण । जो दानपुण्य करील तोचि निधान । रणशूरा दानशूराला देव प्रसन्न ॥ कर दया धर्मनिधान । देव काढील विघ्नांतुन । कवि सुलतान म्हण त्याच वेळापुर ठिकाण । भानु हयबती सांगेल खुण । बाळा अवघ्यामधी अज्ञान । नागपुरी पवाडा केला बसुन गायाला । चार साहेबजादे बसले ऐकायाला ॥शिपाई०॥ ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP