मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर|

खडर्याची लढाई - २

पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.


तलवार पुण्यावर धरून, मोंगल आला चढाई करून ॥ध्रु०॥

होणारासारिखें निजामअल्लीला पुढें आठवलें । एकांतीं अष्टउमराव मरुर बैसूनी खलबत मिटविलें ॥ ठायीं ठायीं सुभ्यांशीं पत्रें लिहुन सांडणीस्वार पिटविले । औदांची पुण्यावर मोहीम, निजामअल्लीने जहान उठविले ॥(चाल)॥ ठायिंठायीं जमाव बंदीचे ॥ चाललें कलम फौजेचें ॥ राऊत पायदळाचे शेरे झटति लोक लोकांचे ॥(चाल)॥ धरिला पुण्याचा सुमार रे । बेदर सोडुनियां मोहरे ॥ मुहूर्तानें ठोकिले डेरे । तोफा ओढिल्याबाहेर ॥(चाल)॥ मुख्य शहर दक्षिणेवरती मोहीस झाली । बांधोनियां पुण्यावर कंनर चढती दाली ॥ हिंदुपद घेईन म्हणतो निजामअल्ली ॥(चाल)॥ कुचावर कुच रे कुचावर कूच पाहिना फिरून । तलवार० ॥१॥

येणार पुण्यावर मोंगल ही बातमी अगोदर होती । डांकिनें डांक पत्रें नानाशीं येऊन पोहोंचती ॥ ब्राह्मणी राज्य कैदवार एकापेक्षां एक मसलती । वाडयांत सुभ्यांची खलबत, श्रीमंतांची चढती रती ॥(चाल)॥ रात्रीचा मनसुबा केला । वर्तमान दिलें अवघ्याला । करखाने ज्याचे त्याला । जरि पटका हरिपंताला । नेमणूक हुजरातीची । मराठी नेकनोकेची ॥ तलवार विश्वासाची । त्या परशुरामभाऊची ॥(चाल)॥ पानसे, पुरंदरे, रास्ते आणिक ढमढेरे । जागा पाहून मैदान पुण्याबाहेर ॥ दिले गारपिरावर दलबादल डेरे ॥(चाल पहिली)॥ निघाले बाहेर रे, निघाले बाहेर कधिंना फिरून । तलवार० ॥२॥

राव रंभा, कायेत, पांढरे, डफळे मानकरी । जाधव, चवाण, घोरपडे, घाटगे, लग्या भडकती जरी ॥ रणनवरे. गायकवाड, बाणकरी । हे सुभे मोंगलाकडचे उभे आपुलाल्या बाजूंवरी ॥(चाल)॥ इतमाम ज्याचा त्याला । मराठे मुसलमानांला ॥ चालती कोरबंदीला । दाटती मांड मांडीला ॥ मारती तीस हजार ॥ चाले पठाणांची तलवार । लष्कर सोडुनियां मोहोरे ॥ चालिले लुटित पेंढार ॥(चाल)॥ गारदी, आरब, सिद्दि, शिक पायदळ । बाणाच्या उंटावर कैच्या दारूगोळे ॥ दर तोफेसंगें हत्ती, छकडयांची माळ । घासत पडली रे, घासत पडली देशावरून ॥ तलवार० ॥३॥

बावन पागा हुजरात छबीना डेर्‍याभोवता उभा । शिंद्यांच्या सातशे तोफा, बरोबर कंपू सवता सुभा ॥ आल्या नागपुराहून फौजा भोंसल्याच्या बाणांची तबां । पेंढार बासडेवाला होळकर शत्रूला दबदबा ॥(चाल)॥ उमराव बलावुनी अवघे । हुद्दे ज्याच्या त्याच्या मागें ॥ पायदळ तोफांसंगें । टाकिलें पिछाडिस बुणगे ॥ बिनि दौलतराव शिंद्याला रे । कुच करोनि मोहोर गेला ॥ सिनेवरता तळ दिला । मग तिथें जिवबादादा आला ॥(चाल)॥ तिन लाख मिळाली जहान पेशवेशाई । प्रतिनिधीबरोबर माधवराव सवाई । ही कृपा शाहूराजाची ब्रह्मबाच्छाई ॥(चाल पहिली)॥ लढाई मारूं रे लढाई मारूं एकदां ठरून । तलवार० ॥४॥

होते वकिल मोंगलाकडिल पत्र पाठविलें तपशिल लिहून । नानाचा अवघा खेळ बरोबर श्रीमंताला घेऊन ॥ तिन लाख सैन्य हिंदूंचे उतरले सीनेवर तळ देऊन । हे शाण्णव कुळिंचे भूपाळ, भगवा झेंडा घेऊन ॥(चाल)॥ नानानें हुकूम केला । तोफांचा बांधा किल्ला ॥ म्हणे परशुरामपंतांला । सांभाळा श्रीमंताला ॥ एकदां झुंज मारावें रे । मोंगल मागें सारावे ॥ गादिचें नांव राखावें । अवघ्यांनी यश हें घ्यावें ॥(चाल)॥ श्रीमंतांची पहिली चढती स्वारी । चाकरी हुजुर बक्षिसी करा तलवारी ॥ तारील या समयांतून विठ्ठल हरी ॥(चाल पहिली)॥ प्रसंग वाईट रे, प्रसंग वाईट जाईल हरून । तलवार० ॥५॥

केलें कुच निजामअल्लीनें पुढे खडर्यावर चालून आला । दिल्या ढाला मैदानांत पराडयाच्या बाजुला ॥ झाले मोंगल तयार, तोंड लागलें प्रहर दिवसाला । आपा बळवंत, बाबा फडके, जखमा परशुरामभाऊला ॥(चाल)॥ पठाणांनी गर्दी केली । मग चढला निजामअल्ली । सांडणी बातमी आली । लष्करांत गलबल झाली । नानांनीं हुकुम केला । त्या दौलतराव शिंद्याला । भोंसला नागपुरवाला । मग होळकर तयार झाला ॥(चाल)॥ बावन पागा हुजरात खासगीवाले । डंक्यावर टिपरी पडतां हुशार झाले । पेंढार घांट रोखून उभे भोवताले ॥(चाल पाहिली)॥ उठा नानाच्या रे, उठा नानाच्या हुकमावरून । तलवार० ॥६॥

झाला हुकूम तोफखान्याला, किल्ली जिवबादादाचे हातीं । कंपुची झडती लईन गोळे जणुं गारा वर्षती ॥ भोंसला शर्थ बाणांची केली । गर्दी; लावुन बती । टाकिली फौज भाजून मोंगल येतो काकुळती ॥(चाल)॥ नानाचा हुकूम झाला । तोफांवर घोडे घाला । चहूंकडून उठला हल्ला । एकदाच हरहर केला । गर्दी पाहून घाबरा झाला । मग नबाब मागें सरला । खडर्याचा सुमार धरला । जाऊन किल्ल्यांत शिरला ॥(चाल)॥ बेजार मार मारून मोंगल केले । पेंढार पल्ला देइना उभे भोंवताले । घेती लुटून मारती घपाघप भाले । लागले पाठीं रे पाठीं । तोफा भरून तलवार० ॥७॥

दौलत केली खराब मोंगल खडर्यामधिं घातला । सभोंवताल्या  लाविल्या तोफा जिवबादादा आणिक भोंसला । कंपूचा पहारा खडा, भवता पेंढार्‍यानें शह दिला । नानाशी धाडलीं पत्रें जीवंत धरितों निजामअल्लीला ॥(चाल)॥ केली गर्दी मराठयांनी । बुडवितात मुसलमानी । जासूद पिटिले नानांनीं । नका देऊं तिळमात्र कोंडापाणी ॥ पत्रामधिं नाना बोले । जें व्हायाचें तें झालें । शत्रूला कैद केलें । हें यश आम्हांशी आलें ॥(चाल)॥ जय अपजय परस्वाधीन बसला घसरा । हा मोंगल अजिंक्य वीर प्रतापी खरा । दक्षिणेंत केवळ असामी नाहीं दुसरा ॥(चाल पहिली)॥ आब राखावा रे आब राखावा, कीं जाईला मरून । तलवार० ॥८॥

कडबा दाणा बंद कोंडिलें पाणी कहर वर्षला । झाले मोंगल बेजार, मरूं लागले, आले कौलाला ॥ दरम्यान मसूर घेऊन करा भरपाई, सोडा आम्हांला नानाला धाडिलें पत्र घ्यावी खंडणी होऊं दे सल्ला ॥(चाल)॥ याप्रमाणें करार झाला । मग दिवाण हवालीं केला ॥ आले घेऊन मुक्कामाला ॥ सोडिला निजामअल्लीला ॥(चाल)॥ फौजेचा उठविला वेढा । सोडून खडर्याचा वाडा ॥ आले बाहेर सुटला घोडा । मग पळता हा जीव थोडा ॥(चाल)॥ हिंदुंनी उतरला चिरा घेतली ढाली । धरली बेदरची वाट, रेवडी झाली ॥ हरकुचानें कुच करूनें पळतो निजामअल्ली ॥(चाल पहिली)॥ ताब हिदुंनीं रे, ताब हिंदुंनीं घेतला हिरून ॥ तलवार पुण्यावर० ॥९॥

आलें यश रावसाहेबाला लौकिक नानाचा चहूंकडे । दक्षिणेंत झाले महशूर जरब नानाचा डंखा झडे ॥ आले जेर करूनी मोंगल निशाण जरिपटका चाले पुढें । कालू कर्णे बाजे होती नौबत हत्तीवर चौघडे ॥(चाल)॥ शत्रूवर बोलबाला । आले करून शहर पुण्याला । यश आलें तलवारीला । चालती भिऊन गादीला ॥ ज्यांनी ज्यांनीं समशेर केली । बक्षिसी तयांला झाली । खुप लुटला निजाम अल्ली । कैकांची दरिद्रे हरलीं ॥(चाल)॥ गेली रंगबाजित नोकित गातो शोकी । कवि आपा यशवंताची धरितो बाकी । कवि हसेन कलगीवाल्यावर लावी नोकी ॥ शिरीं शिरताज रे शिरीं शिरताज गातो भरून ॥ तलवार० ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP