मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर|
द्वापारीं श्रीमाधवविलास भ...

रंगाचा पोवाडा - द्वापारीं श्रीमाधवविलास भ...

पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.


द्वापारीं श्रीमाधवविलास भागवतीं प्रत्यय पहावा । तसे कलीमध्ये रंग खेळले श्रीमंत आणि पाटीलबावा ॥ध्रु०॥
पुण्यासारखे दुजे शहर या दक्षिणेंत कोठे नाहीं । धर्मराज श्रीमंत धन्याची त्रैलोक्यामध्यें अवाई ॥ धन्य रणवीर पाटीलबावा पराक्रमी जाणती शाई । नवखंडामध्ये कीर्ति गाजती धनी रावसाहेब सवाईं ॥ यशवंत अति श्रेष्ठ तपोबळी साजती ब्रह्य बादछाई । दिल्लीपतीनें माहिमरात दिली नालकी लवलाही ॥(चाल)॥ स्वामीप्रताप अद्‍भुत वर्णु कुठवरी । सारे हिंदुस्थान पाटीलबावाचे करीं । घेविलें असून स्वस्थानीं परात्परी । मी वर्णू कुठवरी हा प्रादुर्भाव स्नेहाचा ऐकावा ॥द्वापारीं०॥ ॥१॥

शके सतराशें पंधरा चैत्र नाम प्रमादी संवत्सरी । अत्यादरें हा रंग खेळले उभयपक्षी हर्ष अंतरी ॥ बंब भरून रंगाचे ठेविले ठाई ठाई शहराभीतरी । गुलालाचे हौदे भरुनियां खुप कसले हस्तीवरी ॥ तक्तराव्यावर पात्रा नाचती परोपरी । रंग भरून पिचकार्‍या घेतल्या सर्वांनी अगपले करीं ॥(चाल)॥ एक एकावरी चालले रंग टाकीत । नानांनी बंब रंगाचे ठेविले जिथें ॥ त्या ठाई येता श्रीमंत स्वारी अवचित । सर्व भिजविले तेथे हा कुठवर घोष कितीचा वर्णावा ॥द्वापारीं०॥ ॥२॥

सर्व मुत्सदी मानकरी यांच्या हौद्यांचे जमावानिशीं । हस्ती सेवकांसुद्धां सकळही लाल रंग रसी ॥ रविवार पेठेमध्ये पाहा तात्यांचे दरवाज्याशी । दोन बंब रंगाचे भरून ठेविले होते अति सायाशी ॥ निट बुधवार पेठेतून श्रीमंत स्वारी गेली त्या ठायाशी । खुप गर्दी रंगाची केली तात्यांनी अति उल्हासिं ॥(चाल)॥ ते दिवशी सफेत असा कोण नाही राहिला । रंगाविरहित नाही दृष्टीने पाहिला ॥ लौकिल रंग हा पृथ्वीवर पसरला । पुत्रपौत्राशी सांगायाशी जाहला ॥ हा रंग सुबदावा ॥द्वापारीं०॥ ॥३॥

नानापरी गोकुळी क्रिडले श्रीमाधवजी कुंजवनी । तें साक्षात्‍ दृष्टी पाहिले पुणे नगर पुण्यस्थानीं ॥ नाना परीचे हरिचे विलास शास्त्री ऐकिल्या श्रवणीं ॥ पुरे ग्राम गोकुळ क्रिडले त्यांत कृष्णत श्रीमंत धनी ॥ आधिक देह आमचे आम्हाला भासतसे आपले ध्यानी । स्वामीपद अवलोकून दैवी उल्हासी हेत नित्यानी ॥(चाल)॥ होनाजी बाळा पदरचा आहे किंकर । विज्ञप्ती श्रुत करितो जोडून कर ॥ अक्षई असावी कृपा सेवकावर । धनी बक्षीस देणार ॥ रामा अंदु वांछी स्वामी सेवा ॥द्वापारीं०॥ ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP