मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर|
तासगाव अपूर्व परशुरामभाऊच...

आळत्याची लढाई - तासगाव अपूर्व परशुरामभाऊच...

पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.


तासगाव अपूर्व परशुरामभाऊचें शहर । गणपतीचा उत्साह होतो हरिस्मरण गजर ॥ध्रु०॥
भाऊसाहेबांचा नित्य नेम त्याचें दर्शन घ्यावें अगोदर । असे एक धनी श्रीमंत त्याला पेशव्यांचा आधार । पुण्यप्रताप नांव थोर आलें श्रीमंताचें पत्र । पाहिला वाचून मजकूर ॥(चाल)॥ मग आणूनिया ध्यानांत । डेरे दिले पाहून मुहूर्त ॥ वाजे नगारा नौबत । कुचावर कूच करीत ॥(चाल)॥ गेले सालप्याच्या घाटा धनी उमराव ॥ तेथें बसून मसलत केली जलदीनें यावें ॥ मुळेमुठेवर पुणें गांठावें । असें कळेल श्रीमंताला हुजूर धाडावें ॥ धाडुनियां हुजूर भाऊशी आणिलें वाडयांत । श्रीमंताच्या भेटी झाल्या बहु आनंदांत ॥ तासगाव किल्ला अजब तर्‍हा झाली रचनुका केली दक्षिणेंत । परशुरामभाऊंनीं केली चौखंडा कीर्त ॥तासगांव०॥ ॥१॥

सवाई माधवराव भाऊशीं बोले वचन । करवीर कोल्हापूर आतां तुम्ही घ्यावें जाऊन ॥ तीन लाखांची खंडणी हुंड घ्यावी उतरून । महाराजाशीं कैद करावें बसवावें ठाणें ॥ श्रीमंतांचें वचन ह्रदयीं धरिलें भाऊनें । आणलें जरतार पांघरुण ॥ वस्त्रें केली पेशव्यानें । चाले निरोप घेऊन ॥ सोडिले त्या दिवशी पुणें ॥(चाल)॥ मग निघालें लष्कर । केले कुचाचे नगारे ॥ नदी उतरून झाले पार । ढाल दिली कात्रजेवर तळ पाहून ॥ आले रहिमतपुरावर चालून । दरकुच करीत चालले कड निकडीनें ॥ आले तासगांवाशीं केलेलं देवदर्शन । घेऊनियां दर्शन मग भाऊ गेले वाडयांत ॥ पाहून आपासाहेबास भाऊंनी केली मसलत ॥तासगांव०॥ ॥२॥

भाऊसाहेब आपासाहेबाशीं काय बोले । सरंजाम कराया आपासाहेबांनी पत्र लिहिलें ॥ गांवोगांवास लिहिली पत्रें खासे मिळविले । सरंजाम करून डेरे राहुटया बाहेर दिले ॥ घेतला निरोप आपासाहेब बाहेर आले । गणपतीशीं नमन करून मग पालखीत बसले ॥ हत्ती कुंजर शृंगारिले ॥ भडक जरीपटके सोडिले । पुढें चालती कोतवाले ॥ भगवी ढाल पुढें चाले । मग निघाले सरदार तळ नेमिला कौलापुरा ॥ ढाल रोविली येऊनि मोर । गांवोगांवचे शिल्लेदार ॥ असे जमले की दहा हजार । भडक सरदार ॥ दरकुच सोडिले तव उतरले मोर । येऊनि ढाल रविली कृष्णातीर ॥ ते वसूनि आपासाहेबांनी केला विचार । तोफा लावाव्या आळत्यास नका उशीर ॥ सुभेदारासंगं तोफा दिल्या बरोबर । घेऊनियां गारदी फिरंगी गेले अळत्यावरतीं ॥ दुहेरी लाविल्या तोफा वेढा पडला सभोंवतीं ॥तासगांव०॥ ॥३॥

सकाळचा दिवस प्रहरभर आला उगवून । गांवकुसवाशी तोफा लाविल्या सुभेदार जनोबानें ॥ खर खर खर खर लिहून पत्रें जासूद धाडून । फोडूनियां लखोटे वाचिले आपासाहेबानें ॥ केलें सैन्य तयार सडी स्वारी संगें घेऊन । जरीपटक्याचा ह्त्ती बिनीवर चाले निशाण ॥ गेले अळत्यावर चालून । हल्ला नेमिला रायानें ॥ केला अळत्याचा संहार । दिस होता दोन प्रहर ॥ गेली महाराजास खबर । धनी बसले सरदेवर ॥(चाल)॥ मानकरी निळाले थोर थोर प्रिताजी चवाण । मग सरदजेराव घाटगे आले चालून बोले रत्नाकर आपाजी फौज स्वाधीन ॥ हैबतराव गायकवाड बिनी स्वाधीन । मोहरप्याला लाविले हत्ती तक्त निशाण ॥ महाराज निघाले इतके सैन्य घेऊन । आले आळत्याचे जवळ ॥ बाजीराव माने खिंडींत । दोन टोळ्या करून पुढें गेले रत्नाकरपंत ॥तासगांव०॥ ॥४॥

घनचकर मांडलें लागलें तोंड झुंजाचें । खणन खणन तलवार अशुद्धें वाहती रक्ताचें ॥ आपासाहेबांनि उठून पाहिले लोक राजाचे । हाणा हाणा बोलती मार उडाले गोळ्याचे ॥ स्वार भाले वारूवर सळ सोडिले फिरंगीचे ॥(चाल)॥ हैबतराव गायकवाड ओढला हत्ती निषाणाचा । वेढा पडला फौजेचा ॥ क्रोध चढला झुंजायाचा । गुंडाळा केला दहापांचांचा ॥ धडा मग केला जिवाचा ॥(चाल)॥
आपासाहेब सरदार । फिरफिरून मारी तलवार ॥ असे दहापांच केले ठार । आले सरजेराव हंबीर ॥ आपासाहेब धरावा धीर । मग जाऊन धरले कर ॥ आणा पालखी चला लवकर घेऊन आपासाहेब आंत बसविला सर्जेंरावानें ॥ महाराज बसले होते पाहिले त्यानें । झाली दृष्टभेट ॥ दिले बादली पोषाख नवीं पांघरुणं । मंदिल मोत्यांचा तुरा दिला राजानें ॥ तीन पदरी मोहनमाळ जडित कोंदण । दोद गांवें बक्षिस दिलीं हातीं निशाणें ॥ आपा साहेबाशीं घालवा महाराजा बोले त्वरित । घालवीत चालले संगें सवों राउत ॥तासगांव०॥ ॥५॥

इतकी खबर ऐकून मग भाऊ झाले वित्रास । कोलापुरची माती आणून मिळवीन कृष्णेस ॥ गांवोगांवांशीं लिहिलीं पत्रें मिळविले खासे । सरंजाम करून तळ नेमला कुपाडयास ॥ आकलीवर उतरले ढाल दिली कृष्णातिरास । खरखरखरखर लिहूर पत्रें धाडिलें मिरजेस ॥ धनी बाळासाहेब बैसले होते सदरेस । वाचून पाहिलें जीन ठेविलें वारूस ॥ चिंतामणरायानें हुकूम केला फौजेस । अंबारींत बसून रावा मग आले अकलीस ॥(चाल)॥ फार सांगितलें भाऊस जाऊं कोल्हापुरास । आतां नाहीं पुरयास ॥ याच प्रसंगीं घेईन यश । मान नाहीं केला शब्दास ॥ कागद लिहिले बावास । पत्र पाहतां या अकलीस ॥ केले कुचहुकूम ढालीस । गेले इचलकरंजीस । तिथेंच तळ पडला चार दिवस ॥(चाल)॥ तिथें जमाव सारा झाला । तळ उचगांवचा नेमला ॥ ढाल दिली पंचगंगेला । त्या टेमलाईच्या माळाला ॥ केली पेंढार्‍यानें हल्ला । कोणी खाईना उसाला ॥ दिले मोर्चें चौं बाजूंला सोमवारी नेमिली हल्ला भाऊ साहेबानं । मोर्चांत बसविले लोक खासे निवडून ॥ आले माहाराजांचे लोक बाहेर निघून । केली मोर्चावरती हल्ला पडले येऊन ॥ शेंपन्नास केले जखमी गेले परतून । म्हणे भाऊ साहेब आतां तुम्ही असा बंदोबस्त ॥ नका करूं गडबड कोल्हापुर घेईन क्षणांत ॥तासंगाव०॥ ॥६॥

मंगळवारचे दिवशीं भाऊनीं केली ताकीद । गांव कुसुवासी तोफा लाविल्या केली हिकमत ॥ महाराजाचे लोक ते एकशूर नामांकित । स्वार झाले वारूवर आले जितीच्या वढयावरत ॥ भाऊसाहेबांनीं कमर बांधिली पट्टा हातांत ॥(चाल)॥ घेतला पट्टा हातात । गेले जितीच्या वढयावरत ॥ झुंज मांडलें पटांगणात । सूर्य झळकला गगनांत ॥ केली फिरंग्यानेंमात । घातले मोडून गांवांत ॥ गांव मग आणिला वेजीत । लागली सल्ल्याची मसलत ॥(चाल)॥ घ्या खंडणी म्हणून बोलले मग लखोटे लिहिले । जासुदा हातीं धाडिले । लोक रदबदलीशीं आले ॥ तीन लाखांवर ठरविले । लोक ओलीशीं घेतले । भाऊ माघारे परतले । मिरजेचे गुक्काम केले ॥ भाऊ तासगांवाशीं आले । गणपतीचें दर्शन केलें लोक नगरींचे खुशाल झाले ॥ कडीं तोडे बक्षिसा दिले । मंद्रुपचे देशमुख आले ॥(चाल)॥ गजदंत हत्ती दिला राव देसायाशीं । चौखंडामधें कीत सांगायाशीं । केला भाऊचा पोवाडा मिरजदेशीं ॥ गांव कोल्हापूर ठिकाणा जागा रहिवाशी । कवि जिवाजी पांचाळ आणा ध्यानाशीं ॥ गुरुरायाची कृपा आम्हाला प्रसन्न नागनाथ । डफावर पांच निशाणें त्रिशूळ झळकत ॥तासगांव०॥ ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP