मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर|
केले दंग समशेरजंग इंगरेजा...

डामाजी नाईकाचा पोवाडा - केले दंग समशेरजंग इंगरेजा...

पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.


केले दंग समशेरजंग इंगरेजाला । सागरी राहिले छत्र बुडाला किल्ला ॥धृ॥
घडीवेळ उत्तमा पाहून केली मांडण । धन्य धन्य कारागीर चतुर शाहाण । सरसुभा विसाजीपंत धनी होत जाणा । केलें तयार समशेरजंग वसई ठिकाणा । सांचांत ओतून काढिला जसा नगिना । शोभे वरि बोरदासारिखा अचंबर दाना । तिनकाठया उडवी ध्वज । झाझांत सवाई झाज । नांव समशेर जंग साजे । जैसा सैनामधि हत्ती गर्जे । इहिदे सबईनच्या सालांत गेले गोव्यांला । ते दिवशी समशेरजंग आले विजयदुर्गाला ॥केले दंग०॥ ॥१॥

सुभा झाला धुलपरायाला आरमाराचा । नारायणपाल महादेवपाल दत्तपालाचा । फत्तेजंग समशेरजंग जोडा दोघाचा । अवघ्यामध्ये समशेरजंग बिनीचा । थोर थोर मांडिल्यावर मोठये गोळ्याचा । निवडून सिपाई चढविला भरवशाचा । दारुचा तरास पाण्यांत । फिरंग्याशीं धाक गोव्यांत । सारी पाडाव केली सपाट । कैकांशी पडली धास्त । सवाई समशेर नांव... दामाजी नाईक सरदार तोचि बिनीचा ॥केले दंग०॥ ॥२॥

सन खमस साल येंदाचे फार कठिण । ठाण्याचा किल्ला घेतला इंग्रजानें ॥ पत्र आले धुळपरायासी यावे बेगुन । निघाले बंदरांतून आरमार घेऊन । दरकुच रेवदंडयावर गेले चालुन । कांही दिवस कर्मिले घ्या ऐकुन । बार बार हिंडु लागले । नांवाचे जानराव धुल्ले । चारमास झुजे मारिले असे माही सुध । पाडवा बुधवाराला । गोपाळगडचे बार्‍यावर इंगरेज पाहिला ॥केले दंग०॥ ॥३॥

सारे पाल जवळ बसून मन्सोबा केला । महादेवपाल नारायणपाल समशेरजंगाला । तुह्यि कोठे एक बाजून घालावा घाला । आम्ही येतावो आतून मदत तुम्हाला । पुढे होऊन समशेर दमानी पडला । न कळे कर्त्यांची कर्णी वारा राहिला । सारे पाल राहिले दूर । ना ऐक भांडयाचा मार । इंग्रेजास मदत ईश्वर । दोन जाजें त्याचि जबर । एकला पाहून समशेर । मारामार करूं लागला गोळ्यावर गोळा । नाही ऐके समशेरजंग खूब भांडला ॥केले दंग०॥ ॥४॥

इंग्रेज पुसे हटकून कोण सर्दार । दामाजी नाइक म्हणे मीच बादुर । कपितान मनी उमजला धनी यावर । म्हणून झडून पडला समशेरावर । दोहीकडे दोनीं जाजे करिती मार । खुब झुजला समशेरजंग तीन पाहार । कांहि केल्या आटोपेना । दंग जाला इंगरेज मना । ‘घ्या घ्यारे कौल भेटांनां’ । ‘लोक म्हणती न येऊ शरणा । करूं पेशव्यांची नामना । सती होऊन बसलों सरणा । ये येरे टोपीवाल्या अडावणीला । आह्यी पेशव्यांचे शिपाइ निमख दाउं तुजला’ ॥केले दंग०॥ ॥५॥

इंगरेजास आला राग झाला सरमिंदा । भरभरून भांडी मारि दोंहिं बोरजा । दांडीचे गोळ फार करितो चेंदा । रेजगिरी सांखळी मारुन उडविला पडदा । मारली थोरली कांठी गावी परबाणसुद्धां । तक्ता फोडून केला जुदाजुदा । लोक भांडले भार शर्तिन । जति हिंदु मुसनमान । दामाजी नाइक धन्य । केलें हलाल धन्याचे अन्न । पाल नेइल वैरी म्हणून । दिल्ही आपल्या हाती अग्र । सवाई समशेर जळू लागला ॥ दामाजी नाईक शर्त करून मेला ॥केले दंग०॥ ॥६॥

किति उडाले दारून जळाले फार । काही उडया टाकुन गेले तक्त्यावर । गेलि वस्त्रें नि पांघुरणें आणिक हातेरे । कसा गिलजा धात (?) पडला एकच कहर । या पेशव्याचे राज्यांत फार अमर । (पर) कोणि जळुन नाही मेला असा सर्दार । झुज झाले मिरया ठिकाणी । काहि गेले रत्नागिरीवरुनि । खुब केले त्या सुभेदारांनी । एकेक शेला दिला पाहुनी । कांही नेले इंग्रेजांनी । आले जखमी लोक खबर कळली लहान थोराला । कसा कहर राज्यावर पडला मोठा गलबला ॥केला दंग०॥ ॥७॥

मोठया पहाटेस दिवस उगवला न‍ राव आले । इंग्रेज पळून गेला असे कळले । आइकोन वर्तमान कष्टी झाले । गेलीं फत्येजंगाची बाजू देवा काय केले । वर्तमान ऐकून तेथून निघाले । गेले विजयदुर्गाचे बंदरामध्ये पोचले । सारे पाल गोदी घालून खाली उतरले । जे रणी राहिले खेत जिवाशी मुकले । किती हेटकारी झाले ठार । घ्या रुपये ढालाभर । राज पेशव्यांचे अंबर । बातनी विजयदुरुगावर । गुरु आत्मागिरि फकीर । दामाजी आमचा मैतर । ख्यालगातो जीर खान खानदेशाला । हालीं वस्ती तळा घोसाळा ठाउक सर्वाला ॥केले दंग०॥ ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP