मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर|
करविर किल्ला बहु रंगेला प...

कंपूचा पोवाडा - करविर किल्ला बहु रंगेला प...

पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.


करविर किल्ला बहु रंगेला पंचगंगेच्या हाय तीरीं । महा तीर्थांची महिमा सांगतो गाजति तीर्थ भारी ॥
गणपतीचें स्मरण करितां परसन हो दत्तात्तरी । काशीविश्वेश्वरनाथ बसले ते रथावरी ॥ अंबाबाई नांदे सवाई त्रिशूळ घेऊन करी । दैत्यावर करते फेरी ॥ बाबुजमाला किल्लांत झुले रंकनाथ आणि भयरी । आई कळंब्याची लक्षुमी आणि कंत्यानी धांवा करी ॥ फिरंगाबाय आणि महांकाली दोघी बसल्या शेजारी । आईतवारांत यमाबाय तिथें मग नांदे एकवीरी ॥ टेंबलाबाय आणि घुंतनी धाव धावण्या धारकरी । सावेजणी बहिणी मिळूनी शिंद्याचे कोटकरी ॥ गलीमाचा गोळा चालला जातो यो वरच्यावरी । निशाण पांढरें बुरजावरी ॥ गैबीचा मारा भारी । मंगळवारामधिं । लिजामअल्ली घोडपिराची खडी स्वारी ॥करविर०॥ ॥१॥

रावणेश्वर तीर्थ थोर किल्ला आहे पाण्यावरी । काय सांगूं हवागिरी ॥ रंकाळें आणि पद्माळें दोनी तळीं तीं बरोबरी । शिधाळें पेटाळें टाकाळें नागराळें राहिलें दुरी ॥ कोटतीर्थावर गलीम आला उभी राहिली येवून स्वारी । जितीस जाया रिघाव नाहीं आलों बा म्हणती पेंढारी ॥ वरुण तीर्थाचें पाणी पितांना कंटाळा हो आला भारी । संध्या मठापाठीं आंगोळ करून जाऊन बसले क्षणभरी ॥ मग बसव्याचें दर्शन घेतां जातो तो पाण्यावरी । रंकाळ्याचें पाणी पितांना कंटाळा आला हो भारी ॥करविर०॥ ॥२॥

अवघीं तीर्थें करूनशानें मग आलों केसापुरी । उजवी घालून हो नगरी खंडेराव हैबती बसले तेबि नांदे तळघरीं । विठोबा बुरुजावरी ॥ थळवेताळ आणि पांढर घर आंगीचें भवसरी । गरीबाचीं माणसें भारी ॥ जिकडे हल्ला तिकडे टोला दारें हैत चौफेरी । क्षण एक नाहीं उशीरी ॥ घोडे राउत एकदां निघाले दोनी करिती बरोबरी ॥ पाहून हो कांपे वैरी ॥ लष्करामधिं धाक पडला शाई झाली घाबरी । पुण्यास हो गेल्या खबरी ॥करविर०॥ ॥३॥

एक वर्सानें आंगोळ करावी तिथली महिमा हाय भारी । उत्तरेश्वराचे दर्शन घेतां जाऊन पाहिली मछिद्री ॥ चिटकोबाची खडी पायरी बसला तो माळावरी । शिंगणापुरी हटकीश्वरी तो बा नांदे जळचरीं । पार्‍यावडापाशीं संगम निघाला महिमा आहे भारी । एक वर्सानें आंगोळ करावी तिथली महिमा हाय भारी ॥ वरिंग्यांत ईश्वरनाथ बसले ते नंदीवरी । आई पार्वती महाशक्ती किल्ल्याची चिंता करी ॥ वीर हणमंत दोई तोंडया तो रघुवीरी । कैकाळाचें धाक नाहीं अवघीं विघ्नें नीवारी ॥ महा करी ॥ वीर हणमंत दोई तोंडया तो रघुवीरी । कैकाळाचें धाक नाहीं अवघीं विघ्नें नीवारी ॥ महा तीर्थाची महिमा सांगतो गाजति तीर्थ भारी ॥करविर०॥ ॥४॥

धनी केदार दखनेवर तेनी लाविली नदर । करतो किल्ल्याची फिकीर ॥ तिरीथ अंगारा हमेश येतो धाडिलेही चौघे स्वार । एक इळाची येरझार ॥ दाणोखिंडीचा आला म्हसोबा अष्टकोट देव सार । ठाईंठाईं चवक्या पार ॥ छपन्न कोटी चवडाबाई तेलंग आणि मोहूर । हालावले हो मुळघर ॥ ते कृपाळ क्षेत्रीपाळ होऊनशान तयार । काळभैरी सार्‍या म्होर ॥ बाजे डंका सवाई ठोका गस्त हिंडे चौफेरी । अंबाबाईंची सरदारी ॥करविर०॥ ॥५॥

तवां कंपूनें कटाव केला मोरचे आले म्होरे म्होरे । बनपुरीपाशीं डेरे ॥ शुक्रवारामधिं येऊन शिरले पेठ धरली शनवार । तोफा वोढिल्या बाहेर ॥ फत्या बुरजाला मार लाविला ढांसळती त्याचे चिर । भिताड केलें बरोबर ॥ बारा तास बत्तीस घडया खिणी एक नाहीं उशीर । होतो गोळ्याचा भडिमार ॥ तवां आपाला म्हाराजाची ताकीद येती वरवर । असावें खबरदार ॥ खुब जुर्नीने किल्ला राखावा हें पूर्वेंचे आदधर । पन्हाळ्याचा आघार ॥ दारूगोळीला गणता नाहीं कुमक येती वरवर । लोक भोंवतेनें चौफेर ॥करविर०॥ ॥६॥

शुक्रवारमधिं तोफा लाविल्या नेहून हो चावडी म्होर । झाला धुराचा भंकार ॥ डोईवरनें बाण चालेना तेव्हां दिसेना काय म्होर । लोक म्हणती तटावयानें आतली गोळी क्षिणभर ॥ राहिला किल्ला झाला थंडगार । आडा हो जमले सार ॥ रत्नाकर आपा होते गंगेच्या वेशी म्होर । नामी नामी सरदार ॥ काय बघतां दादानों विघ्नें आलीं व्हा म्होर । चाल द्यावी सैनेवर । राजमंडळीचें माणूस सारें पूर्वीचें वतनदार । वेशीला बांधून हो शीर ॥करविर०॥ ॥७॥

शिंपण्या दिवशी हल्ला नेमिली कंपु झाले तयार । हालावलें हो सैन सार ॥ तवां भाऊचा लेक म्हणतो पेंढार्‍यासी व्हार म्होर । भोंवतेनें वेढा शाहार । कुरुंदवाडकर दादासाहेब चिंतामणराव मिरजकर । तेनी धरला सवता घोर ॥ दोन शिडया हो म्होरे आल्या निशाण हो त्येचावर । संगे कंपूचा सरदार ॥ दोही तोंडानें हल्ला चालली बाजा वाजति व्हलेर । आले खंडकाच्या शेजार ॥करविर०॥ ॥८॥

शिडीवर लोक आले कुणी नाहीं गेले माघार । ते पडले खंदकावर ॥ साडेचारशें माणूस ठार झालें हो जाग्यावरी । अशी लष्करांत हो खबरी ॥ तवां भाऊचा लेक म्हणतो बुडालें देवा घर । फौजेचा तुटला घर ॥ निपाणकर आपा पुढलें सांगित होता होणार । हल्ला नका करूं किल्ल्यावर ॥ रेवणकर बाजीबा चालून गेला बुरुजावर । तोफ वोढिली त्यानें म्होर ॥ तोफेचे तोंडी दिली रजेगिरी म्हणे पेटव लौकर ॥ मारले कंपू फार फिरली हल्ला धर तुटला पळूं लागली माघारी । कैग टांगडया वर करी ॥करविर०॥ ॥९॥

महाराजाचे लोक नेमाचे शिपाय हो सरदार । येक उठला महावीर ॥ खंडेराव भोंसले शिपाई हो सरदार मानोळकर । किल्ल्यांत हो सावध फार ॥ विजापूर वेशीला मुंजापादाजी हिंमतबहादूर । निघाली हो त्याची समशेर ॥ खानवीलकर दादा, त्याच्या संगें तोरगलकर । निवडली सवती धार ॥ बेडकीहाळकर बाबा, होऊन आले तयार । बाजा वाजती व्हलेर ॥करविर०॥ ॥१०॥

तवां आपानें ताकीद केली शहरांमधिं घरोघर । होऊन यावें तयार ॥ साकोळीला सुरंग लागग्ला कोणी वेळेचा त्यो थर । आंत ओढलें तळें सार ॥ ढोरेंगुरें पाणी प्यालीं अवघीं सारीं जनावरं । नगरी झाली थंडगार ॥ दाणापाणी खावुनशानें सावध झाली हो नगरी । वैर्‍यावर ठोका मारी ॥करविर०॥ ॥११॥

मनकर्णिचा चिखल काढुनि उपसावी बेगी हीर । पाणी करावें तयार ॥ बाबूजमाल झर्‍यांत गेलों तिथें दादा दाटण फार । धड जाईना घागर ॥ गोखल्यानें तळें फोडिलें नांव केलें केवढें थोर । गडबडले तेव्हां शाहार ॥ कैक जणाला पाणी लागलें मासोळी मागे खारी । खावेना डाळभाकरी ॥करविर०॥ ॥१२॥

पन्हाळ्याचे लोक फांकडे दखनपाणी हाय खर । माणूस हो मारील फार ॥ कैक जणाला पाणी लागलें मासोळी मागे खारी । खाईना डाळभाकरी ॥ बारा रुपयाला बकरें झालें एक एक करते हुरहुरी । मालवणगडचे लोक सारी ॥करविर०॥ ॥१३॥

केदाराची दया पुरती रत्नाकर आपावर । आला सपनामधिं लौकर ॥ काहो निजला तुम्ही भ्रमांत सावध व्हावें लौकर । हाडबडून जागा झाला कुठे दिसेना काय म्होर ॥ तसच उठला लौकर । गोखल्यांनीं हल्ला चढविली आली म्हणती खंडकावर । उन्हाचा पहिला भार । पेढेंखान सावध होता म्हंकाळ्या बुरुजावर ॥ म्हणे देवा झालें बर । केली कीर्त न कळे अंत धन धन देवा मुरारी ॥ तारिलेंस लाखादारी ॥करविर०॥ ॥१४॥

एक बटीक काव करोनी जात होती धुणें घेउनी । न कळे देवाची करणी ॥ चौकीवाल्यांनी तिला अडविली मधिंच झाले धनी ॥ पुढें जाऊं देईना कोणी ॥ हिकडे आण ग आंमधि आहे तें काय बघुं दे गांड मनीं । मग बोलिले दबावुनी ॥ उघडून पाहतां आंत कागद झाल्याली हो करणी । वाचून हो पाहातो धनी ॥ ह्या रांडेचें नाक कापा द्या मुलखावर सोडुनी । सांग होते ग कोण कोणी ॥ फितवापांजरा कांही चालेना गलिम हो चिंता करी । येऊन पडला विचारी ॥ म्हणे सुलताना साहेब चरणा विनती करतों वरवरी । दया असावी मजवरी ॥ कर जोडुनी करतों विनंती मस्तक हो चरणावरी । हात ठेवावा तुम्हीं शिरीं ॥करविर०॥ ॥१५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP