मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर|
त्रिंबकराव दाभाडे

त्रिंबकराव दाभाडे

पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.

डभईची - लढाई

केलें नमन गणेशाला । दुसरें नमन भोवानीला ॥ श्रोत्यांनीं सावधान । कडाखा सेनापतीनें केला ॥ध्रु०॥
खंडेराव सांगेन, धुरु । ज्याचा राज्यामधिं बोलू ॥ गाजीवली तरवारा । शरला जाणे दाणेदारु ॥१॥

खंडेराव दाभाडयाचे वंशीं । एक सेनापति जन्मला ॥ खासखेल सयन । यशवंतराव बाजू सांग ज्या मर्दाला ॥ सवाई बाबूराव नामोस राज्यामधिं केला । प्रधान पंत बाजीराव ठाण घातलें पायाला ॥२॥

रचला कळीचा । आरब जमाव तळेगावीं झाला । विचार ज्यात्ये स्वारीनें केला । सैनापति बोलाविला ॥३॥

त्रिंबकराव दाभाडे तुम्ही बाजीरायावर चला । दीन दीन भेस्तरवार पाहिला ॥ नगारा सैनापतीनें केला । सरदाराच्या फौजा । डेरे इंदुलीवर दिला ॥४॥

ती दिसाचे मोकाम । हत्या घडली त्या रायाला ॥ हात्या घडली त्या रायाला । घातलें वडालाचें सराद ॥ सरदाराच्या फौजा डेरा कौदुसावर दिसा । शाहूराजा सदरे बैसला ॥ बसवंतराव बोलाविला । जाती उमाबाई तेथ संग्राम होईल भला ॥५॥

पंधरा हजार घोडा पेशवा नये सातार्‍याला । जोडा तळेगांव आला ॥ विनंती सांग उमावाला ।“ नको जाऊं तुम्ही हुकूम म्हाराजाचा झाला ”॥६॥

दीन । मोकाम धराबीचा झाला ॥ छत्रपतीच्या फौजा हणमंतपारीं उतरल्या । सरदाराच्या फौजा डेरा समंगनेरीं दिला ॥७॥

समंगनेवरी तुरुज तजखान भेटला ॥ विचार सैनापतीनें केला । सुशिंग भोंसला पाठविला । कोंकण खेडयाचे बारीनें धाडा हाडता उतरला । गईबखान पठाण आडवा दाभाडयाच्या आला ॥८॥

मावळला दिनमान मोकाम गीर नदीवर झाला । जोडा नबाबाचा आला ॥ सैनापतीनें वाचूनी पाहिला । ”घोडयावर बैसुनी त्रिंबकराव भेटायाला चला” ॥९॥

“ कसा करावा विचार” राव पुसे जाउबाला । खासखेल सैन यश्वंत बाबुराव घेतला ॥ जावजी दाभाडे, निंबाळकर अमृतराव चालला ॥१०॥

नबाब किलीजखान सैनापतीला भेटला । मान त्या सैनापतीचा केला ॥ वस्त्रे चढविली रायाला । दिले चार घोडे मोंगल हत्ती नजर केला ॥ “झुज पडले बाजीरायाचे काही ऐक कुमक द्यावी मला” । पठाणाची फौज कुमर भादूर जोर आला ॥११॥

हा क्या मानसिंग चिमाजी दामोदर चालिला । मावळला दिनमान मोकाम तारबाजवर झाला ॥ लष्कर चाल पेणोपेणीं घाटा हाडत उतरले ॥१२॥

खबर कळली पोवाराला । रावा उदाजी आनंदला ॥ पोवारमल्ल पाटील भेटला । पिलाजी गायकवाड भेटी झाल्या सरदाराला ॥१३॥

हें येवढें ऐकुनी वेढा मांडवीस घातला । कोट दुमदुम भेरी वाजती ॥ नाला तुदु बाका सोडुनी देती । कितीक होती घायाळ मुर्दे दलामध्ये येती ॥१४॥

विचार सैनापतीने केला । जोडा मल्लोजी धाडिला । मल्ल पाटील पोवार । तुम्ही चवकीवरी चला । सेनापतीची फौज बलोजी हरपाळ चालिला ॥१५॥

तडाड मल्ल पाटलानें केला । मारीत चौकीवर गेला ॥ तुडविली चौकी संग्रास रज्पुताचा झाला । कितीक तोडील घाईघाई । कितीक पाटील धरणीठाईं ॥१६॥

घोडया राउता दाटणा पाहीं पाहीं त्या मुर्कुडया झाल्या ॥ तीरा गोळ्यांचे ठणक होती ॥ रज्पुत निशाणसी भांडती ॥ उडया पाण्यात घालती । घालती मरणाभ्यानं ॥१७॥

मल्लोजीनें झगडा दिला । संग्राम रज्पुताचा झाला । दुर्जेशिंग वचकला । वचकला मांडवीमध्ये ॥ मोर्चा लाविला कोटाला । कोट बहुत जेर झाला । सैनापतीचा मोरचा आल्ली बुर्जाखालीं गेला ॥१८॥

कसा करावा विचार । दुर्जेसिंग वचकला । मंगलवारे दिनीं ज्यांनीं किल्ला खाली केला ॥ क्षीणमध्यें नवला वर्तला । रानोमाळ संहार रजपुतांचा झाला । सेनापतीचें निशाण आधीं चढविलें कोठाला । देवजी ताजपीरराव ठाण्यावर ठेविला ॥ किल्ला मांडवीचा घेतला । ठाणें दिलें पिलाजीला ॥१९॥

सरदाराच्या फौजा डेरा फुलवाडीवरी दिला । सरदाराच्या फौजा डेरा खाडीवरी दिला ॥ शिमगा सैनापतीनें केला । कर्णोळ मांडवीचे घांटी । राव नर्मदा उतरला ॥ सरदाराच्या फौजा डेरा त्येच्या तळ्यावरी दिला । अवसचे दिवशीं तारा डेर्‍यावरी पडला । पाडव्याचे दिवशी राव आले ड्बईला । जोडा बाजीरायाचा आला ॥२०॥

सैनापतीनें वाचुनी पाहिला । घोडयावर बैसुनी सैनापती झुजायाला ॥ दोन दिवस भार केला । राव पर्तुन डेर्‍या आला । खुंटलें होतें निमित्त फुढें । कर्णें भगवानाला ॥२१॥

भेस्त्रवारें दिनीं झगडा ज्या मर्दांनीं दिला ॥ बाजीराव कचेरीला बैसला । चिमाजी आपा बोलाविला । जाधवराव पिलाजी खबर सांगे पेशव्याला ॥२२॥

भिकाजीराव चालून आला । राणोजी शिंदा पाया हाडता उतरला । ठोक या भावे शिंग बोलाला । प्रधानपंत बिन्नी द्यावी मला ॥ हें एवढें ऐकुनी कोप नारायजीला आला ॥२३॥

ढमढेर्‍याचें बैठ नांवें माझीया वडलाला । नामोस दिलीमध्यें केला दिलें सोन्याचें कडें ॥ आनंद नारायजी नावाजीला । मावळला दिनमान मोकाम खाडीवरील झाला ॥२४॥

सुदीन भेस्तरवार पाहिला । नगारा सेनापतीने केला ॥ सिनगारिला हत्ती । हत्तीवर हौदा ठेविला आंगीं घातले डगलें, वक्तार चढविलें आंगाला ॥२५॥

राव हौद्यांत्त बैसला । शिरीं जिरटोप घातला ॥ शिरीं बांधिलें मंदील तुरा मोत्याचा लाविला । खासके सैन यशवंतराव बाबुराव घेतला ॥२६॥

पिलाजी गायकवाड हाती तोंडावर दिधला ॥ कडीकोट फौजेचा मिळाला । गगनीं धुरळा लागला । दणाणली मेदिनी चंद्रसूर्य झांकोळला । आले रणभूमीला ॥ विचार सरदारानीं केला ॥२७॥

त्रिकाळ दोपारणी दोघी मिळाल्या वैरिणी । चाळीस हजार घोडा मर्द दिली उठाळणी ॥ लष्करानीं मलपानी वजीर करत्यात धांवणीं । जर फौजेला मिळतें पाणी ॥ मोठी होती खणाखणी ॥२८॥

दाभाडा सैनापती सैनापती तरवार थोर करी निर्णाणी ॥ आंगीकार जाधरायांनी केला । जाब बाजीरायाला दिला । उजवी बाजू चिमाजीला ॥२९॥

भार बाजीरायाला आला । मार करोलांनीं दिला । उदाजी आनंदराज पाहिला । साठया होनानी आणुण भला । मर्द घोडा उचलिला । भार बाजरियाचा आला ॥३०॥

मार करोलांनीं दिला उरीं बैसली गोळी साठया होनाजी पडला ॥ पोवार मल्ल पाटील भला । मर्द हत्ती चालविला । करी तिंरदाजी, वागूं नेदी राउताला ॥३१॥

जगताप त्रिंबकराव भला । तया मर्दानें झगडा दिला ॥ टाकली वारू हाडती उडी ॥ जगताप पाय उतारा आला । भार बाजीरायाचा
आला । मार करोलांनीं दिला । ब्रह्मांडीं बैसली गोळी । पोवार मल्ल पाटील पडिला ॥३२॥

आब शिपायांनीं केला । हत्ती माघारा मुडींला । नास्का सीपायाचा झाला । इतक्या उपरी झगडा जाउबांनीं दिला ॥ अमृतरायाच्या लोकांनी ॥ बिकट केली खणाखणी ॥३३॥

झगडा झाला थोर संताजी म्होयता पडला रणीं ॥ रणीरण खुर्दळ मांडला । उदाजी बेलदार पडला । म्हाडीक तुलामाजीराया फुढें पुरा झाला । आंका बैसला भाली सयाजी गायकवाड पडला ॥३४॥

जाउबा लष्टकरी चांगला । हात फिरंग घातला ॥ तिसरा गोळ्याचा ठणक, गोळी ॥ लागली फिरंगला । गोरेखान पठाण भला मारीत ढिगांत लोटला ॥ जेणें केल्या घोडयाच्या पंया । गोरेखान पठाण पडला ॥३५॥

बडेखान पठाण भला मर्द सतींनसी भांडला ॥ जखमी झाला चूर क्षेत्री म्हणावें तयाला ॥ रणीं निवडलें रणशूर । भांडतो सैनापतीचा भार ॥ घड पाडिली दुगड, शिपाई घायाळ झाला फारा । गाड वासुल्या नजरि गोजी मारमारी सिपायाला ॥३६॥

खंडेराव मल्हारराव तया मर्दांनीं झगडा दिला ॥ ब्राह्मण बापू पंडित भला ॥ भाला लागला मर्दाला ॥ सैनापतीचे दिवाण । जखम झाली तयाला ॥ भार बाजीरायाचा आला । त्रिंबकराव कुर्द सैन झाला ॥३७॥

आली वीरश्री हात कमान घातला ॥ सर्जा त्रिंबकराव भला । विदीत फौजेत चालिला ॥ किती पाडील घायाळ गणती नाहीं सांगायाला ॥ त्रिंबकराव नानाचा लष्करी । पंचमुख व्याघ्र जैसा पिंजारी । हारोळी देउनी खासा तीर जोडी उरी ॥ द्वापार युगामध्यें एक अर्जुन होऊन गेला ॥३८॥

कलयुगामध्ये एक अर्जुन म्हणावा रायाला ॥ दारुदखान पठाण होऊन गेला । हत्तीच्या हौद्यांत भांडला । सांगाया झाली सीपत झगडा दाभाडयाने दिला ॥ चिमठया रायाचा सोलला । सांवा बोटांच्या राहिल्या ॥३९॥

भार बाजीरायाचा आला । मारठोक यांनीं दिला । ब्रह्मांडी बैसली गोळी सेनापती पुरा जाहला । इतुक्या उपरी भणाण फौजेचा झाला ॥ त्रिंबकराव संग्रामी पडला । बाजीराव दिलगीर झाला ॥४०॥

उचलुनी मुर्दा रायें पालखींत घातला । ह्त्ती दाभाडयाचा फौजे म्होरे चालविला ॥ थोर थोर सरदार मिळाले पाह्यला । ल्हान पराई होऊनी शूरानें करडा हात केला । बाबन उमराव मिळाले ॥ ऐसा कवण नाही भांडला ॥४१॥

मुर्दा डेर्‍या आणला । येसू पाटील गहिंवरला । सैनापती गेला आता दादा म्हणावें कोणाला । आनंदी करीतसे आत्येसा । माझ्या भणीच्या को वंश ॥४२॥

कसें केलें जगदेशा जगदेशा नारायणा ॥ असे तिघे बंधू करिती रोदना ॥ होतें सैनापतीचें मंडण । बोल मलारदास गाईन शूरांचे प्रेमानें ॥४३॥

करी जुगदान जुगीं उद्धरण ॥ मी व्हाल सरदार पाहाला ॥ आग्र दिधली रायाला । केलें दानपून पालखी दिली ब्राह्मणाला ॥ आस्त्री गिरजाबाई बोलली । “ आज हरपला माझा चुडा । नाही फिटली आसोसी दे आउक दिला थोडा ”॥४४॥

जोडा सातार्‍याला आला ॥ राव कृष्णाजी दाभाडयाला ॥ बहुतां प्रकारीं संबोखिला ॥ जोडा तळेगावीं आला । विनंति सांग उमवाला ॥४५॥

“ तुमची गुजराथ तुम्हांला । पायागड तुमच्या हवाला । येसू पाटील बाबूराव हायेत तुमचे सैनेला ’॥ जाब कानीं ऐकिला उमावा बैसली सदरेला । मलारदास बोलाविला ॥४६॥

मलारदास कवीश्वर भला । ज्यानें बिरमाल गाईला ॥ सवाई बाबुराय ज्यानें घोडा बक्षिसी केला ॥ येंसू पाटलाने ज्याने ज्याने हत्ती नजर केला । माता उमावान लेकाचा शिर्ताज दीधला । शूरा संग्रामाचा ज्याने बिरमाल गाईला । हेतूनशाई दाभाडयाची र ॥ शाई दाभाडयाची र । थोर मर्द ख्याती ज्याची र मर्द ख्याती ज्याची र ॥४७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP