मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर|
श्रीमंत पेशवे प्रधान बहु ...

पुण्याचा पोवाडा - श्रीमंत पेशवे प्रधान बहु ...

पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.


श्रीमंत पेशवे प्रधान बहु प्रीतीचे । अष्ट प्रधानांमध्ये उतरले मर्जीत महाराजाचे ॥ बसविलें त्यांनी पुणें शहर टुमदारीचें । जागोजाग बांधले दाट नळ पाण्याचे ॥ ठायिं ठायिं शोभती हौद एक फर्म्याचे । धनी कृपावंत प्रभु कल्याण करी रयतेचें ॥ लंकाच पुण्यामध्यें लेश न दारिद्राचें । शहरांत घरोघर सावकार गबर घरचे ॥ सरदार एकाहून एक श्रीमंताचे । लढणार शिपाई किती सांगूं मी वाचे ॥ हत्ती घोडे रथ अंबारी तवे पालख्यांचे । सरकार वाडयाभौतालीं झुलती बाहारीचे ॥ जागोजाग वस्ती भरदार, गर्दी बाजार, कमती नसे कांहीं । पुणें शहर अमोलिक रचना दुसरी नाहीं ॥ ब्राह्मणी राज्य जोरदार घोडयावर स्वार होते शिपाई जबर सद्दी कैकांनीं पाहिली शत्रु ठेविले नाहीं ॥ध्रु०॥ ॥१॥

उत्तम पुण्याच्या भोंवती शोभती बागा । शहरांत हजारो स्वार घोडयांच्या पागा ॥ भले भले घनंतर वाडे हवेल्या जागा । आळोआळीं झळकती एकसारख्या रांगा ॥ वर्णितां गोड वाटतें किती तरि सांगा । शहरांत सुखी अवघे क्वचितची भीकमागा ॥ तेही गेले कोठें धर्मास करिनारे जागा । शिंद्याचा ज्यान बत्तीस फ्रेंचना लुंगा ॥ गाईकवाड सरदार येती प्रसंगा ॥ धावती रणांगणी मानकर्‍यांच्या चुंगा ॥ सिरकेला कोणता काळ कोरण्यास भुंगा ॥ सहजांत जिरविती सर्व तयाचा मुंगा ॥ गोखले बापू तलवार बहादर लढाईत जाई । शत्रूची फौज जरजर करितसे लवलाही ॥ब्रह्मणी राज्य०॥ ॥२॥

साक्षांत विष्णु अवतार पेशवे कूळ । संपूर्ण माहिचे भूप कांपती चाक दरारा प्रभळ ॥ सगोपंत देवराव विठ्ठल नाना काळ । शहाण्यांत साडेतीन शहाणे बुद्धिचे सबल ॥ सेवेंत सर्वदा श्रीमंताच्या जवळ । होळकर भोसले शिदें मानकरी सकळ ॥ तलवार बहादर करीत शत्रूची राळ । स्वारीच्या भोंवतीं सर्वदां श्रीमंताच्या जवळ । होळकर भोसले शिंदे मानकरी सकळ ॥ तलवार बहादर करीत शत्रूची राळ । स्वारीच्या भोंवतीं पटवर्धन मंडळ ॥ युद्धांत रणांगणीं जसा आगीचा लोळ । बहुनामी पल्लेदार तोफांचा कल्लोळ ॥ जेजाल जंबुरे बाण करी वळवळ । सरदार सभोंवतीं दाट पसरती तळ ॥ घोरपडे रास्ते सरदार पुरंधरे स्वार पानसे पाहीं । फडणीस नानाची जबर भूमंडळीं राही ॥ब्रह्मणी राज्य०॥ ॥३॥

पर्वतावरती पर्वतीस्थान वरती चौघाडा । पाहेर्‍या तळापर्यंत जावें धडधडा ॥ अनुष्ठान पंचपक्वान्न पडेना खाडा । पुजारी पुजीती उमामहेश्वर जोडा । पीतवर्ण सोन्याच्या मूर्ति नव्हे बा वाडा ॥ पाहार्‍यास शिपाई उभे पेठवूनि तोडा । रमणाही ब्राह्मणासाठीं बांधिला केवढा ॥ श्रावणमासीं खर्च तो कोटयावधी तोड । पुढें तळें त्यामध्यें लहान बेटाचा तुकडा ॥ गणपती त्यांत पलिकडेस आंबील ओढा । ग्रामांत तुळशीबागेंत बेतही जाडा ॥ बुधवार पेठ बेलगाव नजीकची वाडा । जागोजाग मौज अनिवार नसे अंतपार वर्णू तरी काई ॥ कविराय म्हणे धन्यधन्य पेशवाई ॥ब्रह्मणी राज्य०॥ ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP