मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर|
दुक्षिणचा दिवा मालऽऽऽवला ...

नारायणरावाचा वध - दुक्षिणचा दिवा मालऽऽऽवला ...

पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.


दुक्षिणचा दिवा मालऽऽऽवला ! हिरा हारऽऽपला ॥ कसा गुपित घाला केला रावसाहेबाला ॥धृ.॥
एकछत्रि करुनि गेले राज्य माधवराव । थरथरांचि कांपत होते त्यासि उमराव ॥ बसविले हस्तनापूरिं तखत बाच्छाव । दादासि मोकळे केले राज्य करावं ॥ तुटलि आयुष्याचि दोरी नाहीं उपाव । मरत्या समयास बोलिवले नारायणराव ॥(चाल)॥“ दादासि मिळुनि असावं ॥ द्वैत मनीं नसावं । अशा वेळानं कंठाव । ओटीत नारायणराव तुमच्या हो घातला” ॥ अशा बहु प्रकारें निरवले हो दादाला ॥दक्षिणचा०॥ ॥१॥

मग गेले हो सातार्‍यासी, राजापाशीं । शिक्के रोखे वस्त्रें दिलीं हो नारायणरायाशीं ॥ आले वाजवित चौघदे शहर पुण्याशीं ॥ कुच करून लौकर गेले हो नाशकाशीं । दुसर्‍याची बुद्धि ऐकिली निमित्याशी ॥ मग येऊन जप्ती फार केली दादासी ॥(चाल)॥ देती गस्तीवर गस्ती । थोर केली बंदोबस्ती ॥ पुल बांधुनि करूं मग वस्ती । नळाशि काम लाविलें. हुकूम झाला ॥ पुढें कोट बांधणार होते । शहर पुण्याला ॥दक्षिणचा०॥ ॥२॥

शुद्ध भाद्रपद तेरस, दिवस सोमवार । त्या दिवशीं दिवस चढला दोन प्रहर ॥ मग सुमरशिंग गारदी होऊन तैय्यार । संगें महमद साहेब इमानी सरदार ॥ हजिरी देतों म्हणोनि लाविली कटार ॥ मग शिरले वाडयामंदी उपसुन तलवार ॥(चाल)॥ झाली गर्दी एकच हल्ला । राव निजला जागा झाला । उठुनिया उभा ठेला ॥ राव फिरुनि अवघा वाडा भयभित झाला । थरथरांच कापत राव दादापैं गेला ॥दक्षिणचा०॥ ॥३॥

आतां हिकून पळाले राव, सुमरशिंग माग । बरोबर गारदी घेऊनि केला लाग । शोढ करित पुढें चालले, लावला थांग । म्हणे इकुनि पळाला; सुमरशिंगाप्रत सांग, राव हात जोडी दादाला, ‘सोदा राग’ । म्हणे आतां वाचवां. जीवदान माग ॥(चाल)॥ डोइ घातली पोटांत । आलि माया ह्रदयांत ॥ “नका करूं बालकाचा घात ।” दादा ठेविं वर हात “वाचवां याल” ॥दक्षिणचा०॥ ॥४॥

बोले सुमरशिंग गारदी, तुम्ही वांचवितां । पुढें आमुचिं मनुष्यें घाण्यांत पिळीतां ॥ तुम्ही मुळीं आपुल्या प्राणासि कां दवडतां । तुळाजि खिसमतदार झाला बोलता । दादानिं काढला हात झाला सरता ॥ निःशंक हात मारिला किं खांद्यावरता ॥(चाल)॥ झाला पुरा एकच घायीं । दादाची फिरली द्वाही ॥ चौघडा वाजे ठायीं ठायीं । तेथ उपाय नाहीं कांहीं ॥ दोधन्यें एकच ठायीं, - माराव कोणाला । होयाचें होऊन गेलें शब्द दैवाला ॥दक्षिणचा०॥ ॥५॥

गंगाबाई करी रोदन, “हारपलें रत्न ! गाईनें वत्स गिळिला ! देवा धन्य ! टाकून घोडे पाळख्या द्र्व्य धन । नाहीं हौस पुरली गेले नारायणा !” राव नेले अधें राति लावलें अग्र । खंडिभर लांकडें आठ मण चंदन ॥(चाल)॥ कामा आला खिसमतदार । चापाजी टिळेकर ॥ शुद्ध इमानी चाकर । धड पडले अंगावर ॥ नारुजी नाईक ठार - पुरा झाला । जखमा लागल्या ईशराम पंताला ॥दक्षिणचा०॥ ॥६॥

आतां भोळे राज्य दादाचें ! केवळ काशी । बोले तुकुम देही आउख चिंता दादासी ॥ वस्त्रें आणावया पाठविलें अमृतरायासी । बोले सुदामा ब्राह्यण प्रसन्न शिव दादासी ॥(चाल) दादाचीं तपें तीं भारी । शिवसांभ विघ्न नीवारी । बाहेर निघाली स्वारी । दरारा पडला भारी - सर्व दुनियेला ॥ बोले लहिरी मुकुंदा दादाचा बोलबाला ॥दक्षिणचा०॥ ॥७॥

( हा पोवाडा मूळ असून ऐतिहासिक माहितीशी तंतोतंत जुळता आहे. कालांतराने एकाचे एकाचे अकरा कसे होतात हें या व मागच्या पोवाडयांच्या तुलनेनें आपोआपच सिद्ध होईल. हा पोवाडा खुनानंतर लवकरच झालेला दिसतो. )


N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP