मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर|
पंढरीराया करा दया हालीव स...

खडकीची व अष्टीची लढाई - पंढरीराया करा दया हालीव स...

पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.


पंढरीराया करा दया हालीव सूत्र निर्धारीं । चला करूं पंढरीची वारी ॥ध्रुपद॥
शके सलाशें एकुणचाळीसांत श्रीमंत आले आषाढीला । अंत लागेना फौजेला ॥ चौफेर दिले दलबादल डेरे गोविंदपुर्‍यासमोर । गोखले आणि विंचुरकर ॥ लोक सरसा अरब खासा श्रीमंताचे बरोबर । उतरले पद्म तळ्यावर ॥ फिरंग गोरा पठाण तेरा गोपाळपुरचे ओढयावर । रास्ते पटवर्धन मोहरें ॥ सैन्य जमलें बहू रमले आनंद झाला महाद्वारीं । चला करूं पंढरीची वारी ॥१॥

बेदशास्त्र संतचार कल्पना घेती साधुजन । आज पंढरी दिसती शून्य ॥ गंगाधरशास्त्री पुण्यपवित्र जात होता रस्त्याने । केवळ विष्णु भगवान ॥ पुढे मागें लोक संगें मशाला जळती जोडयानें । शास्त्री हो चाले सोवळ्यानें । कोणी मसलत केली गफलत ठाईं ठाईं बसले जपून । घांव घेतली कर्मानें ॥ तस्करानें जलदी करून हात मिलविला जाऊन । मशाला पडल्या गळून ॥ पडला वार झाला ठार प्राण वरचेवरी ॥जला करूं०॥ ॥२॥

झाली गर्दीं नाकेबंदी कोणी पुसेना कोणाला । लोक वागेना रस्त्याला ॥ मशालजीनें जलदी करून खबर पोंचविली सेनेला । शास्त्रीबोवा ठार झाला ॥ लोकबळ मायाजाळ घळघळ रडती बावाला । कसा वैर्‍यानें घात केला ॥ मानकरी होते पदरी पाणी आणितो डोळ्यांला । आमचा पोशिंदा गेला ॥ कारकून पडले शून्य हुजर्‍या स्फुंदत स्फुंदत द्वारीं । कसा कोपला श्रीहरी ॥चला करूं०॥ ॥३॥

किल्लेदार मर्दशूर ताकीद केली सेनेला । आरबी बाजा फडफडला ॥ कारकून बसुनशान मनसूब रायानें केला । पत्र पाठवा फिरंग्याला ॥ घटका रात्री गंगाधर शास्त्री जात होता देवाला । मधी खपविला रस्त्याला । त्या वेळे झाला काळ उशीर नाही घटकेचा झाला । प्रेत जळत तीराला ॥ फिरंग्याला क्रोध आला मुत्सदी कोणी मारला । हाती कलम घेऊन पडला ॥ रात्रसमयी पत्र लिहिले लखोटा कुंपणीला गेला । अवघा वर्तमान लिहिला ॥ कुंपीने पत्र पाहनू प्रभूशी जप्ती करी भारी ॥चला करूं०॥ ॥४॥

सेनेंत झाला बेत घाबरें झाले लष्कर । जीन ठेविलें घोडयावर ॥ दर मजली फौज शिणली घाट उतरून गेले पार । दाखल झाले पुण्यावर ॥ कुच केले निघुन गेले मुक्काम केला वेळापुरावर । गस्त फिरंग्याची तुरुकस्वार ॥ चौफेर लाला गोल वाजवी तंबुर बासरी ॥चला करूं०॥ ॥५॥

शुक्रवारी प्रहर रात्रीं मनसूबा करती आवघेजण । द्यावी चवथाई लिहून ॥ गोखल्याला क्रोध आला लैन काढीन कापून । टोपी झाडाला लावीन ॥ नानाभाऊ दिल्लीस जाऊं जरीपटका सोडीन । बसवूं दिल्लीचे ठाणें ॥ दिल्लीवर सवा प्रहर भाऊनें झेंडे लाविले । बादशाही तक्त फोडीलें ॥ रणी पडले नाव केले वंश क्षेत्र्याचा अभिमान । लढाई घेऊम जातीनें ॥ तह ठरला लढाईला कंबर बांधीली गोखल्याने । खवळला व्याघ्र पंचानन ॥ स्वार झाला निघुन गेला फिरंगी गारपिरावरी ॥ श्रीमंत आले नागझरी ॥चल करूं०॥ ॥६॥

आदितवारी पहिले प्रहरीं घालमेल झाली सैनेची । तयारी दारूगोळ्याची ॥ सुरु तोफा सिपाई बाका पाठीमागे वामनराव पंची । सिस्त मोठी गोलंदाजाची ॥ गोसावी नंग पिऊन भांग हातीं घेउन समसेर कमची खबर आम्ही घेतों फिरंग्याची ॥ लोक उमदी आरब सद्दी फौज आली पाटणकराची । हवा काय दिसती अंबारीची ॥ निपाणकर पुणेश्वर फत्ते तलवर गोखल्याची । बिकट लढाई कानडयाची ॥ फितूर होता ठाव नवता चोर बातमी फिरंग्याची । तयारी झाली लैनेची ॥ पुढे लैन मधी सैन्य बाजूनें दाटी तोफेची । पिछाडी तुरुक स्वाराची । साहेब गोरा तीनशें बारा काढिलीं कुलुमें मेण्याचीं । दरद नाहीं त्याला मरणाची ॥ दारु प्याला निसंग झाला हातामधी झमके तरवारी ॥ जसे कांहीं पांडव क्षत्री ॥चला करूं०॥ ॥७॥

तोफ सुटली लैन उठली कडाका पहिला आरबाचा । देवडी मार कानडयाचा ॥ गोसाव्याने लगट करून मार बसवी तिरकमटयाचा । पाडिला खासा लैनीचा ॥ आलपिष्टान जलदी करून बुरुज बांधिला फिरंग्याचा । दुहेरी मार तोफांचा । केली हल्ला मधीं शिरला सोडवी गळा कानडयाचा । बंद कापिला गोसाव्याचा ॥ सात हजार गारदी ठार अंत लागेना आरबाचा । लोक फार पडला गोखल्याचा ॥ गोखल्यानें उलट करून वार टाकिला गोर्‍यावरी । रीघ निघेना उपाय चालेना फिरली स्वारी ॥चला करूं०॥ ॥८॥

रण घुमलें कतल झालें पूर अशुद्धाचा वाहिला । स्वर्गी घंटा वाजला ॥ बाराभाई शिंदेशाई मार्ग त्यांनी काशीचा धरला । फिरंगी पाठी लागला ॥ दरमजलीं फौज शिणली दाखला पंढरीस आला । मुक्काम त्याने आष्टीचा केला ॥ अष्टीवर लढाई फार मानकरी थोर पडला । गोखल्याचा अंतकाल झाला ॥ श्रीमंत भयाभित पळुनी घाटपार झाला । पवाडा कटिबंध केला ॥ रत्नू केरू नाथबहिरू आखाडा महशूराने केला । चंद्रभागेच्या तीराला ॥ छंद झाला बसुन केला हणमंताचे पारावरी ॥चला करूं०॥ ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP