मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर|
सकी आद करवीर तकत थोरजागा...

पट्ट्णकुडी व कोल्हापुरची लढाई - सकी आद करवीर तकत थोरजागा...

पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.


सकी
आद करवीर तकत थोरजागा, शिवबा राजाचा । दक्षिणेमंदि धनी नांदतो त्रिभुवनीं डंका त्याचा ॥ बोले खेमूबाळ दया हाय करवीर काशीचा ॥

पोवाडा
शूरमर्दाची लढाई झाली चढाई गर्दी राजाची तलवार ॥ परशरामभाऊ मोडला पट्टाणकुडीवर ॥ध्रु०॥

आपासाब भाऊचा पुत्र करून मसलत स्वारी करावी दखणेवर । सांपडला आळत्यावर लढाई झाली जोरावर ॥ करविरास घेऊन आले जबरदस्त केले भ्याला आपासाब सरदार । क्रिया घेऊन सोडून दिले धनी महाराज वग्र ॥ सांगलीस गेला सांगे बापाला असें झालें अळत्यावर । आलें इसिम भाऊला बांधला दाली राजावर ॥ श्रीमंत बाजीराव लिहून अनभाव धाडला भाऊसाहेबाला पत्र । घेऊन गेला दलभार उतरला जाऊन पुण्यावर ॥ रास्त्याला जमाने क्रिया केले फार । झाला मोकळा भाऊसाहेब आला भाईर ॥ इमान भाक देऊन स्वारी केला गडावर । नाना फडणीस लिहून अंतूस धाडला करविरास पत्र ॥ म्हराजाचें सैन बडविला दैन सांगलीवर ॥शूर०॥ ॥१॥

आला सातारी महाराज घेऊन फौज, पाठी लागले दुरवर ॥ भाऊसाहेब उतरला करनाटकासमोर ॥ नाहीं पेशव्यास मानला, गैर बुद्ध केला ॥ उठविला चहूंकडे दलभार ॥ महाराजाचा मुलुख बडविला तुंगभद्रेपातूर । कांही आला सर करीत, ठाणे घालीत उतरला येवून चिकोडीवर ॥ उठले पेंढारी दखणचे वळूं लागले गुर ॥ श्रीमंत म्हाराज घेऊन फौज असे फिरे बातमीवर । ठांई ठांई नित लढाई होई आठोपार ॥ दोन लाख लष्कर भाऊसाहेबाचे दलभार । बुणुगबाजार लष्कर उतरे तीन कोसावर ॥ आरब लोक हबशी ऐका शिपाय सनदी न्यार । जरीपटक्याचा धनी अघाडी आपा कीं लिपाणकर ॥ नाहीं दरकार भाऊला भ्ररांत केला येऊन, घडलें होणार । मुहुर्त पाहून डेरे दिला पट्टणकुडीवर ॥शूर०॥ ॥२॥

आले क्रोध महाराजाला तयारी केला स्वारी करावी भाऊवर ॥ मानकर्‍यासी पत्र धाडला जमले शार्दूळ वीर ॥ आले सत्तावीस गडकरी झाले तयारी पंत विशाळ बावडेकर । यादव जाधव भोंसले खाणवटकर ॥ आले नारोजीबा घोरपडे वाजे चौघडे सैनापति कापशीकर । चतुरशिंग राजा रन्तागिरी हिंमत बाहादूर ॥ आला राजबा तात्या खर लिंबाळकर । सरनोपत दादा सरदार ॥ गोविंदराव कोकर्‍या चिटणीस फडणीस फलटणकर । आले दौलतराव इश्वासराव दिनकरराव चवाण हैबतराव वग्र ॥ शामजी घाटगा मानसिंग बावा पाटणकर । आला आबासाहेब बागल खानवटकर ॥ भले रेखोजी बाणाईक हुजर । बाबुराव भोंसले सुभानबा बोडक्या दिलदार ॥ भलेभले सरदार खासबारदार शिपाय बाहादूर रणनवरे । धुडगांवकर नलवडे शेंडूरकर मामा वग्र ॥ जनबा काका भला जाहीर सैनेला, रघुनाथ मान्या हंबीर । मानोजी भाऊ जगदाळे बेडकीहाळकर बाबा रणवीर ॥ इटया पटयाचे झोंक कानडे लोक, बाळासाहेब, तोरगलकर । रणबाजा राऊत कडाकी नागवी हत्यार ॥ आपासाहेब घाडगे तयाची कमान जोरावर ॥ पांचशे फौज सवाशे पेंढार अग्रीसार ॥ आंडगर बंडगर झेंडया धनगर सहदेव सरदार । पांढर्‍या कैदम लोकांडया आणखी सपकर ॥ बापूसाहेब सर्जेराव गरजतें नांव दलामधिं त्याची तलवार । जरीपटक्याचा धनी सवाई खंबीर कागलकर ॥शूर०॥ ॥३॥

असे बाराशें उमराव जमले राव निघाले बांधून कंबार । चालले दलबार जसे काय राम लंकेवर ॥ दिसे फौजेचे भार देव अवतार उतारले हमद्या वाडयावर । दिसे पांढरें फेक चौहूंकडे भाऊचें लष्कर ॥ करूं लागले मसलत बसून डेर्‍यांत मिळून महाराज मानकरी सार । नव्हती भाऊची बळीख धराय करीत मजकूर ॥ धनी महाराज बोलले विडे मांडले ठेवले पैजेनें म्होरा कोण धरील भाऊला भदरगड किल्ला देईन खर । सजेंराव बापूसाहेब विडा उचलला पर ॥ तिनदा गेला सपा घालाया भाऊसाहेबावर । फिरले माघारी फौजा कोण पाय घेईना म्होर ॥ आला राजाला क्रोध महाराज बोले हिनवून फार । कळली तुमची किंमत लढाईची हिंमत, खावून बुडविला जागीर ॥ घ्या हातामधि कांकण घालून चला जाऊं माघार ॥शूर०॥ ॥४॥

एवढें ऐकूनशिनया गले क्रोध चढले केले मंगळवार मजकूर । झाले नगारा तयार तोफा भाऊसाहेबावर ॥ जसे अग्रीचे कोट चालले थट धरून दोही बाजूनें फर । आले चढाई करून तंवदी डोंगर समोर ॥ भुल पडली भाऊसाहेबाला हुकूम नाहीं झाला बिनआधारी लष्कर । सोकटयाच्या खेळामंदी गुंतला वग्र ॥ असे राजाचे उमराव घातले घाव, रगडले अवचित डेर्‍यावर । तेव्हां भाऊला उमज पडला गडबडलें लष्कर ॥ मग स्वार झाला भाऊसाहेब चडला घोडयावर । श्यामजी घाटगे बापूसाहेब कागलकर ॥ केली दोघांनीं लगट जाऊन धरले घोडयावर । राजापाशीं घेऊन आले डेर्‍यासुमार ॥ धनी महाराज बोलला “नको दृष्टीला जीव मारा नेहून दूर” । दवलतराव विश्वासराव तोडून केले चूर ॥शूर०॥ ॥५॥

असे लढाई झाली पर खवळले ईर । झमाझमा झमकली तरवार ॥ बकर्‍यावाणी मुडदे पडले भले भले सरदार । झाला पांढर्‍या ठार छाती मंदि पार मरला भाला निपाणकर ॥ जरीपटक्यासहित उडला नाहीं गावला बहादूर । नाहीं समयाला कोणी पळाला धनी आपासाब भाऊचा पुत्र ॥ नाहीं कवणाचे खबर कवणाला, झाले गळाठा सार । दोन लाख भाऊचा दल हात जोडले गाई परमान चारा धर ॥ शिपाई खासे राहिले निस टाकून हत्यार । सांपडला भाऊचा खजिना लुटाव केले सार । हुट सांबार कोणी पुसेना झालें दळिंदर दूर । निघालें महाराज खुशाली झाले मानकरी सार ॥ उतरले जाऊन ठिकाणा हामद्यावाडयावर । त्याचा मान त्याला राजानें दिला, केला बापूसाहेब प्यार ॥ गडाबद्दल पांच गांव दिलें वाळवें खर ॥शूर०॥६॥

आला यशवंत महाराज घेऊन फौज डंका वाजे बिन्नी ह्योर । अंबाबाईला दर्शन केलें यशासूर करविर ॥ भल्यानें जाऊं नये तक्तावरी दखणचे शिरीं शिवशक्तीचें आदघर । मीपण करून भाऊ बुडाला नाहीं चढला हत्यार ॥ त्याच्या मागनें क्षेतर भाऊचा पुतुर आपासाहेब केला राजाला । तीन महिने वेढा घातला कंपूचें लष्कर ॥ नाहीं मुंगीला रिघाव तोफा भोंवत्या भोर -। जसे मेघाची फळी, मांडली गर्दी दखणेवर ॥ धनी महाराज पार झाले पन्हाळ गडावर । बुणगे बाजार लढूं लागले बंदुकीबारदार ॥ आपासाहेब भला पैज बोलला आतां घेतों कोलापूर । पंचगंगेला माती मिळवितों दांत खाई करकर ॥शूर०॥ ॥७॥

गड उतरून आले खाल, घेतले चाल रगडलें घोडीं कंपूवर । दौलतराव विश्वासराव रणभैरी भादूर ॥ पाठी लागली फौज, मारली झुज गर्दी झाली दोघांवर । लागल्या जखमा दौलतराव झाला जेर ॥ काय शिरलें दलामधिं वाघ, हातामधिं सांग, विश्वासराव रणनवर । पडली फौजेची मिठी तयाला जित धरले हो पर ॥ सांग आमुच्या भाऊला कोण तोडला पुसे आपासाहेब सरदार । बोले विश्वासराव आम्ही मारलों तलवार ॥ कापले राव गळा विश्वासराव झाला ठार । महाराजाला वर्दी लागली पन्हाळगडावर ॥ खबर ऐकतां प्राण सोडला दौलतराव थोर । धनी महाराज दुक्षी झाले काय वदले हंबीर ॥ आला हैबतराव धांवून पालकीतनें मुडदे न्हेला गडावर । सायासानें आगीन दिले माहाराज मानकरी सार ॥शूर०॥ ॥८॥

कोलापूर जायाचे मजकुर आले चढाई केले वेढले कंपूचें लष्कर । नाहीं कवणाचे कटाव दखनेला पडले अगोचर ॥ जरीपटके गादीचे धनी सर्जेराव गुणी तयांनीं केला मनसोबा खर । हिंदुस्थानामधिं पावणे शिंदे होळकर खंबीर ॥ दिला राजानें तोडा सातशे घोडा गेला बापूसाहेब वग्र । दो दिसांमधिं आलें कंपूला शिंद्याचें पत्र ॥ आपासाब वाचुनी पाहिला. मनामधिं भ्याला दिसालें धरायचें मजकूर । रातोरात पळून गेला सोडून कोलापूर ॥ करविरामधिं धनी महाराज आले सत्वर । हिरा लावले तुरा अवघे मानकरी सार ॥ येस घेऊन आला बापूसाहेब कागलकर । होती गैबीची दया विघ्न कांपती थरथर ॥ बेडकीहाळ किल्ला आखाडा भला शिवबा राजाचें जहागीर । खेमू ओमू केला पवाडा बाळक हाई नेणार ॥शुरमर्दाची०॥ ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP