मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर|
बुधीहाळ किला बाका ॥ दुरुन...

कर्नाटक स्वारी १७२६ - बुधीहाळ किला बाका ॥ दुरुन...

पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.


बुधीहाळ किला बाका ॥ दुरुन टाकी तोफाचे गोळे ॥ जसा अग्रीचा दिसतो लोळ ॥ श्रीमंताचे पुण्य प्रबळ ॥ सोडी तकटी निशान ॥ जातां जातां बसे वलगण ॥ चिनकहाळ्ळी माहाबळ्ळी जेर केली मौजेने ॥ किल्ला घेतला तमाशानें ॥ भोवती जेर करोनी कशी घेतली विशाळ ॥ अवघा प्राक्तनाचा खेळ !॥१॥

तेथून पुढ नंदिगड घेतलें बाळापूर ॥ नागमंगळ जागा थोर मुळबागळ ॥ किल्ला बाका घटकेंत केला जेर ॥ शहा दिला बेंगरुळावर ॥ बहिरवदुर्ग आणि मांगडी पाहातां फिरती डोळे ॥ भोंवती झाडी अतिप्रबळ ॥२॥

देवराय - दुर्ग भोंवते किल्ले घेतले प्रतापान ॥ पुढुनी जंगल महा - दारुण ॥ हालाकरितां बहुत पडिले लोक तमाशानें ॥ खराबी फार केली किल्ल्यानें ॥ मारून गोळ्या झोळिस लोळ्या लाविल्या तुंबळ ॥ शेवटी जेर केलें स्थळ ॥३॥

नळ - वाटेने पोटें फुगती. प्राण उरतो डोळा ॥ म्हणती कसे आले कपाळा ? ॥ हागवणेनं व्याकुळ झाले वाहे बुळ बुळा ॥ भारी कर्नाटक उन्हाळा ! ॥ जेव्हा घरची आठवण होती तेव्हा रडे मुळमुळा ! ॥ कशी आठवती मुलेबाळे ! ( कसे आठवती मुलांबाळा ) ॥४॥
आजपासुन कर्नाटकची नको चाकरी, हारी ! ॥ शेत करुनि राहू घरीं ॥ रेती खातां पाणि लागतें सुख नाहीं शरींरी ॥ मोठि माहागाइ पडली भारी ! ॥ बाबु सवाई रामापाई कवि मत - वाला खेळ ॥ जबुन हे कर्नाटकाचें जळ ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP