मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर|
सोडून सारा राज्यपसारा निघ...

महादजी शिंद्यांचा पोवाडा - सोडून सारा राज्यपसारा निघ...

पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.


सोडून सारा राज्यपसारा निघून गेले शीवपुरा । पाटिल - बावा येकनिष्ट म्हणून किरत वाढली दिगांतरा ॥धृ॥
रघुनाथाचे पूर्ण प्रतापी भक्त जसा काय हनुमंत । तसेंच श्रीमंताचे सेवक पाटिलबावा म्हणवीत ॥ ज्या पुरुषानें हिंदुस्थानी जाऊन केले आद्‍भूत । महाला मुलुख गडपहाड घेतला गडया करूनिया दिकत ॥ रांगडे न राठवडे राजरजवाडे गवसुन आपल्यांत पानपताच्या पल्याड फवजा गेल्या अटकेपर्यंत ॥ गोजसारखा किल्ला घेतला लवकिक सार्‍या मुलखांत । गुलाम कादर बाच्छा मारून भोगित होता दवलत ॥ महाराजानें सूड घेतला धरून आणिला जीवन्त । पुरता वळखुन हुकूम केला सत्त्वर कीजे पारिपत ॥ तीरमार करून मारिले निमकहारामी चाकरा । वाच्छायजादि खुशाल झालि म्हणे मी फेडिन उपकारा ॥ बाच्छायजादी खुशाल झाली मेला गुलास कादर । माझ्या पित्याचा सूड घेतला धन्य मराठा सरदार । रूमचे बाच्छास गेले फमनि हे घेऊन हलकार । ऐकुनया खुशवंत मानला मनास आणिला विच्यार । दस्तक वंदुन शिरी फिरून बंदगी लेहिले हाजूर । दिधले ते श्रीमन्ता अर्पण मी हुकुमाचा चाकर ॥ शिंद्यांचा भावार्थ पाहुनी बाच्छा म्हणती फार बर । त्याचे नांवे दुसरा सरंजाम धाडला सत्त्वर ॥ बाच्छाची वजिरात तुम्ही कारभार आपला सर्व करा । म्हणउन बाच्छा तक्ति स्थापिला दुष्मन मोडून केले चुरा ॥१॥

बुद्धीचे सागर करीती दिल्लीचा बंदोबस्त । बाच्छायाची दोही फिरली महाराजाची सलाबत ॥ जयपुरवाला लढाई घेऊन तोहि आणिला कवलात । श्रीमन्ताचि कुमक गेली अलीबहादर खाजगत ॥ सामोरे भेटाया आले सडी स्वारिची गणीत । लक्ष स्वार शिवाथ पायदळ गज अंबार्‍या बहूत ॥ देशोदेशिचे राजे चाकर जिवबादादा संगात । खाशाच्या अंबार्‍या दिडशें म्या सांगितल्या सकळिक ॥ श्रीमन्ताची माया जाणून येउन भेटले खुषवक्त । किती येक दिवसावर गोसाव्यावरुनी पडले द्वैत ॥ होळकरांनी त्या गोष्टीची करून दिधली समजूत । पाटलाचि मर्जी फिरली आम्हास जाणें दखनेंत ॥ दिवाणजीसि आज्ञा केली मुलुख आपला जतन करा । आम्ही जातो स्वमिदर्शना दिला कुचाचा नगारा ॥२॥

निज कार्यावर लक्ष्य ठेविले चालुन आले दखणेंत । मोगलाच्या मुलखात मुलखात खंडण्या घेऊन पाडली धाशत ॥ तुळजापुर करून लग्न लाविले येवोनिया खरडयांत । सत्त्वर गच्चि (?) कुच्चे केला भेट घ्यावया उद्युक्त ॥ आले पुण्यासी पुल्लापासी राहत राव जे समयेत । शेहरामध्ये आवइ पडलि होति घरोघरि खलबत ॥ नाना फडणिस श्रीमन्पाप येउन दावीयेले वाडयांत । केलि तयारी फऊज सारी सडी स्वारी शोभीवन्त ॥ सुयेळ सुमोहोर्त पाहाति जोतिसी ज्ञानीवन्त । परशराम आवतार बैसले अंबारीमध्ये श्रीमन्त ॥ वाजे धवशा केला तमाशा पहाया मिळती समस्त । राव आले म्हणून आयेकुन पाटिक हात बांधुन मोहोरे येत ॥ पायउतारा होऊन स्वामिचे चरणी मस्तक ठेवीत । मर्यादा पाहताच आवघे लोक जाहले विस्मीत ॥ निरअभिमाने मिठी घातलि म्हणे स्वामि करुणा करा । पूर्व जन्मिचे सुकृत म्हणुनि पाय लाधले परमपरा ॥३॥

माळ घातलि गळ्यांत उचलुन मस्तक दिधले आलिंगन । पाटिल म्हणति दर्शन होता विच्छा झाली परिपोर्ण ॥ नाना भेटुन लोक भेटले विडे वाटले मौजेन । तोफा सुटती वाद्ये वाजति आनंद पाहति सर्व जन ॥ चतुराइ नानाचि लवकर रावसाहेबासि उठऊन । भेटी नंतर उठाउठि आले माघारा परतून ॥ कितेक दिवसाउपर पाटिल तळ ढाळति ते तेथून । दुसर्‍या जागा उतरूनि तेथुन पुन्यामंदि येणे जाणें ॥ पाटिलबावा श्रीमन्ताप विचार करिती बसून । बाच्छायाने नालकि दिधली ते सेवावी आपण ॥ माझ्या नावे दुसरि जे तुह्यि द्याल तेंच मी घेईन । मान्ये केले रावसाहेबाने उदइक आहे शुभदीन ॥ दुसर्‍या जागा डेरे द्यावया दूर लष्करापासून । आज्ञेवरूनि अरास केली बंदोबस्तिनें चहूकुन ॥ साहेब येऊन बसुन नालकित ल्यालवि बाच्छावि थेट बरा । माहे मोर्तबा पुढे चालले लोक स्वारिचा हाकारा ॥ घर बसल्या ही द्यावी दवलत धन्य महादजी पाटील । भावार्थाने सेवा केली नांव धन्याचं वाढविलं ॥ नालकीत बैसून राव मिरवीत पुन्यामधि चाललं । आनन्द झाला जन लोकाला सर्व मानिती नवल ॥ शिंदे फडके अप्पा बळवंत दोहि बाजूला शोभल । आटोकाट सरदारासुद्धा वाडयामधि दाखल झाला ॥ मानकरी मुत्सद्दी नाना फडणिस सदरे बईसले । तुम्ही अपले नालकींत बैसा प्रसन्न वदने सांगितलं ॥ बैसुनया नालकींत पाटिल मिरवत लेशकरा आल । असा आनन्द शहर पुन्यामधि राहुनया कौतुक केल ॥ नित्य धन्याच्या स्वारिसंगे रमण्यामाजि शोभले । झालि छावणि श्रीमंतानि खर्चायासि पाठविले ॥ उपरान्तिक मग बसन्त आला होळि पुन्यामधि खेळले । कृष्ण गोकुळि खेळ खेळले ऐसे कौतुक दाखविलें ॥ सचीव पन्तप्रधान त्याला महासंकटी तारीले ॥ गायकवाडाचि संचणि करुनी साहेबास दिधल्या नजरा ॥ धन्याजवळ नानाच्या मत्ते गोष्टि केल्या दुर्धारा ॥४॥

मरयादा रक्षुन धन्याचे कार्ये करिती ती जपुन ॥ मर्जीकरितां बसुन राहिल आज्ञाधारक निपूण । आरोग्यकाया महाराजाचि सदा पुष्ट शक्तीवान ॥ सहजा सहजि जेवर आला म्हणून राहिले निजून । उपाय करिता अपाय होति कळले पुरे त्याचे चिन्ह ॥ प्राश्चित घेती शास्त्रयुक्त ती महामहा देती दान । घडिघडि येति श्रीमन्त नाना खबर घ्यावया जलदीनं ॥ नाडि पाहतां कठिण अवस्था डोळा उरलासे प्राण । व्याकुळ झाले शब्द न चाले वाचेसि पडले मौन ॥५॥

अन्तीसमयि स्वामीपायि लक्ष लाविले प्रेमानं ॥ श्रीमन्तानी आपलीं वस्त्रें देऊन पाटिल गौरविल ॥ कष्टी होऊन श्रीमन्त म्हणति राज्यातिल हें नीधान । डोहोडोहो शब्द ऐकुनि पाटिलनेत्र ढाळिति जीवन ॥ ते हो नाना अन्तरयामि बहुत श्रमि झाले जाण । पाटिल जाति निजधामासि कळुन आलें दुश्चिन्ह ॥ माघ शुद्ध त्रयोदसि बुधवार रात्र पहिला पाहारा प्राण सोडिला अकांत झाला अस्मानि तुटला तारा ॥ शक १७१५ प्रमादि संवत्सर वर्जले प्राणा ॥ त्या वेळे लष्करचे लोका त्राहे त्राहे भगवाना ॥ आभय देऊन समजावीति बंदोबस्त करिती नाना । केली तयारि जाउन सारि भरुनिया बार तोफखाना ॥ भागीरथीच्या उदके न्हाणुन प्रेत जाळले ततक्षणा ॥ दौलतराव बाबा गेले होते आंब्याच्या दर्शना ॥ बाबा फडक्यासंगे ठेविल्या पागा नेमुन रक्षणा । राव नाना ते आले पुन्यामधि खबरा कळल्या सर्व जना ॥ पाटीलाचे कठीण दुःख रावसाहेबासि साहेना । युक्ति युक्तिने समजावीति राज्याचे अवले नाना ॥ त्याच्यामागे कृपा करुनिया मुलापासुनि सेवा घ्वाना । पाटिल स्वर्गि खुशाल होति जन्माचे सार्थक जाणा ॥ गोविंदराव गुरुराज धन्य ते होऊन गेले मोतीदाणा । शुर मर्दाचे गाति पवाडे शेहर जुन्नर ठिकाणा ॥ बाळमति अज्ञान गातसे मल्हारि कविराज बरा । बहिरू करितो रंग सवाइ चंग वाजवि तर्‍हातर्‍हा ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP