मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
संशोधनातून नवीन मिळालेले अप्रकाशित अभंग

संशोधनातून नवीन मिळालेले अप्रकाशित अभंग

संत बहेणाबाईचे अभंग

अ ) प्रा. म. रा. जोशी यांचे खाजगी संग्रहातून मिळालेले
६९४.
अवचित लोखंड हाणी दुश्चितपणे । तया ऐसे आन पाप नाही ॥१॥
ऐसे ते जाणावे मतीचे चांडाळ । प्रचीतीचे बळ न दिसे तया ॥२॥
निद्रितावधी अग्नी लावी घरा । पातेजोनि बरा विष घाली ॥३॥
बहिणी म्हणे ऐसे विश्वासघातकी । वास त्या नरकीं सर्वकाळ ॥४॥

६९५.
संतासी सुखदुःख सारिखेचि भासे । तो संत निःशेषे जाणिजेसु ॥१॥
येराची अवघी जाण चित्रकथा । जोवरी नाही चित्ता अनुताप ॥२॥
वादनिंदाभेद जो राहे गिळोनी । तो एक संतजन मिरवे देखा ॥३॥
कामक्रोधहिंसा नये ज्याच्या चित्ता । तो संत तत्त्वता एक होय ॥४॥
आशा मनसा तृष्णा कल्पना विघरे । तो संत साचारे जाणा तुम्ही ॥५॥
बहिणी म्हणे जीवे जिता ना मेलासा । संतत्वाची दशा जाणिजे ते ॥६॥

६९६.
नलगे संपादनी द्यावा परिहार । अंतरी अंतर जाणवते ॥१॥
घराची ते वोज दाखवी आंगण । कळे ते आपण क्रिया तैसी ॥२॥
न लगे ते झाकावे न लगे ते लोपावे । कळते अवघे अंतरसाक्षी ॥३॥
बहिणी म्हणे सीत पहावे चेपोनी । अवघे घोटोनी काय काज ॥४॥

६९७.
घनाचे घायी निवडे जो हिरा । तेव्हा मोल खरा पावेल बापा ॥१॥
येर ते फलकते जाती फुटोनिया । करणीचे वाया फुकट जाई ॥२॥
मोहरा तोचि एक न जळे सूतसंगे । दुखता पोट वेगे बरे करी ॥३॥
बहिणी म्हणे परिस कळे तोचि जना । लोहाचे कांचना करी जेव्हा ॥४॥

६९८.
तोचि एक शूर जाणे घावडाव । रक्षोनिया जीव ( न ) फिरे मागे ॥१॥
तोचि एक बळी विवेकबुद्धीचा । जाणे अनुभवाचा अंगसंग ॥२॥
पाउलापाउली सारी भूमी मागे । न करी स्वामीसंगे वंचकता ॥३॥
राखोनी आपणासी तारी दुजियासी । बहिणी म्हणे त्यासी मोल नाही ॥४॥

ब ) समर्थ वाग्देवतामंदिर, धुळे - बाडातून मिळालेले
६९९.
रांड तेचि खरी मुखी नाही हरी । ते जाणावी निर्धारी जन्मरांड ॥१॥
जया पुरूषाचिये मुखी नाही हरी । जाणावा ता खर जन्मा आला ॥२॥
टिळे टोपी माळा नराचा आकार । जाळावा विचार ज्ञानेविण ॥३॥
बहिणी म्हणे जया नाही आत्मज्ञान । जाणावे ते श्वान जन्मा आले ॥४॥

७००.
संकल्पापासोनी हिरोनी घेतले । मन हारपले विकारेसी ॥१॥
सुख ते सांगता सुखदुःख पळे । कोनाचिया बळे बोल बोलो ॥२॥
इंद्रियांची श्रांति पावली हा बोल । बोलता नवल ऐसे झाले ॥३॥
बहिणी म्हणे भेटी अक्षराची चित्ता । होताचि पूर्णता हारपली ॥४॥

७०१.
तूप असे क्षीराआत । साकर उसाच्या रसात ॥१॥
परी पाहिजे हो ज्ञन । वस्तुप्राप्तीचे कारण ॥२॥
सोनयाचे होती नग । पट सूताचे अनेक ॥३॥
अहो काष्टामाजी अग्नी । तिळामाजी तेल जाण ॥४॥
बहिणी म्हणे देही देव । ज्ञानेविण सर्व वाव ॥५॥

७०२.
येकादसी व्रत व्रतामाजी श्रेष्ठ । गाईत्री वरिष्ठ जपामाजी ॥१॥
येणेची जीवीसी होईल ते मुक्ती । ठेवावी विरक्ति मनामाजी ॥२॥
सद्गुरूची सेवा आणि अन्नदान । भूतदया पूर्ण माने जया ॥३॥
बहिणी म्हणे नाम जपावे सर्वदा । येणे परमपदा पावसील ॥४॥

क ) महाराजा सरफोजी - सरस्वती महाल, तंजोर ग्रंथालयातून मिळालेला.
७०३.
शुभ्र सिंधु वरती वरेला लडीयावरी दाविती शोभा ॥ कर्ण विराजित शोभत सुंदर अद्भुत तेज उणे रविबिंबा ॥ दुष्ट प्रसीध नसे मन स्वस्ति कथा करी व्यस्त पाहात रभा ॥ सांगत सर्व आपूर्व जनि हारि कथा परी व्यर्थ शुभा ॥ टाळ मृदंगाविणे धृपदे मग मेळविती धन मानप्रतिष्ठा ॥ हींडती देशविदेश विशेषत नाम विकुनि ते दाविती निष्ठा ॥ मंत्रउपासन सांगती साधन नाटक ते ठक मान्ये कनिष्ठा ॥ बहिणी म्हणे असे संत नव्हेति रे सांगतसे निजसज्जन ईष्टा ॥
( शिऊर हस्तलिखित वा प्रकाशित गाथ्यांमध्ये नसलेली. भारत इतिहास संशोधन मंडळ, पुणे इतिवृत्तातून मिळालेली. )

बहिणाबाईची संतनामावळी
७०४.
संतनारायण प्रतक्ष जाणा : साधकासि जीवदान : जयाचे स्मरणें जाति सर्व दोश वैकुंठ तें भुवण : परंपरा हेचि कुळदेव आम्हा बोलति वेद आपण : शुक वामदेव व्यास वसीष्ट निरंतर करूं त्यांचे स्मरण रे या ॥१॥
संत आम्हा देव संत आम्हा देव संतचरण भाव जडला : सदा नाम त्याचे उच्चारू वाचें हाचि करूं जप भला : नित्य स्नानसंध्या करू देवार्चन परम धर्म भक्त (T) ला : गाउं नाचो नित्य करूं हरीकथा आम्हासि तो सुखसोहळारे या ॥धृ०॥
सिद्ध रूषी मुनि शैव वैष्णव योगी मानुभाव जाणा : गण गंधर्व क्षये किन्नर शडदर्शणाच्या खुणा : जे जे भक्त कोन्ही होऊनि गेले न करवे त्याचि गणणा : ॥ उच्चारिता वाचे वाढला ग्रंथ सकळा माझें लोटांगणरे या ॥२॥
व्यास ऋषि आणि वैष्णव भक्त अट्यासी सहस्र मुनि : सुरनर पंन्नग भक्त अनेग मिळाले जे चक्रपाणी ॥ तया संतासंता नमन माझे चौयुगामाजी जे ज्ञानि ॥ भावभक्ति मनें वाचा काया हे ठेवियेली त्याचे चरणिरे या ॥३॥
मुद्गल विष्णुदास आच्युताश्रम पाठकनामा रोहिदास : मत्छद्र गोरेख सालया रसाळ चौभाशा सिद्धमुद्धेश : मृत्युंजय आणि रेणुकानंदन विठावर बळसीद्ध नागेश : मुकुंदराज आणि श्रीधर आवधूत सदा करूं नामी घोशरे या ॥४॥
जनजसवंत एका जनार्दन भानुदास मिराबाई ॥ जयदेव जाल्हण परमानंद जोगा नित्यानंदभक्त पाहि । कान्हया हरिदास भोजलिंग पोशा तुळसीदास नरसाबाई । कुर्मदास अंत देव भक्तजन आठवति माझा हृदई रे या ॥५॥
निवृत्ति सोपान ज्ञानदेव जाण मुक्ताई वटेश्वर : काकोमडका बाळाजनका घोंका । चोखामेळा खेचर : परसा भागवत जनमैत्र नागा हरमा परम पवित्र : बहिरोपिसा आणि कान्होपाठक उच्चारू हे निरंतर या ॥६॥
कबीर कान्हपात्र गोराकुंभार सांवता नरहरि सोनार : नामा माहदा विठा नारा नामसेटी परम भक्त साचार : जनी राजाई माता गोनाई हे जातिचि सिंपे साचार : सदा माझे देही आठवति हे न पडे तयाचा विसररे या ॥७॥
नरसा मेथा आणि बाबा उदगीरीकर व्यंकटेश निंबाजी भक्त : रामदास रामभक्त रंगावा दताबा स्मरावा नित्य : सुबारण्य आणि निंबाजी हरीदास कृष्णाजी हृदयीं स्मरत । ऐसे या कलयुगी आवतरले योगी त्याचे पाई दृढ चितरे या ॥८॥
कृष्णदास आणि केशवानंद सिवकल्याण या मूर्ति : शंकर गोसावि देखीयेले डोळ दासावा कल्याण कीर्ति : सीवाजी गोसावी माझा मी धाकला ज्याचा तो ध्यातसो चिति : यैसे निजभक्त हृदई माझा वाहतसे नेणो किति ॥९॥
देवदास देवदत्त देवाजी देमयादत गोसावि : बापुजिबाबा वल्ली आखुबाबा आठवति माजा जीवि : सांगीतले संत गुप्त ही असति त्यासी न ( म ) स्कार भावी : आता कोण उद्धरल्या स्त्रिया त्याचि नामे परिसावी॥१०॥
लक्षुमि आथ सत्यभामा आदि नारी सहस्त्राही सोळा : अहिल्या द्रौपदी सीता मंडोदरी तारा या बा उद्धरल्या : पार्वति सावित्री आरूंधति या पाविनल्या घननिळा : चुडाळ या देवाहुति पतिव्रता उद्धरल्या या सकळारे या ॥११॥
वेधव्य वाटुनी दीधल सजीण घरोघरी वाण पाहीलती व तुका सेख मेहमद बनरवडी नानक यसारमा बलभदास जयराम भक्तसुद्र रामीरामदास ॥अ॥ याही वेगळे आसति शुष्टीवरी गुप्त अथवा उदास संतनामावळी बहीणीचा जप तरता न लगती सायास ॥१२॥

संत बहेणाबाईचे अभंग समाप्त

N/A

References : N/A
Last Updated : March 06, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP