मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
४८१ ते ४९०

करूणापर अभंग - ४८१ ते ४९०

संत बहेणाबाईचे अभंग

४८१.
भला म्हणोनिया टाकिला विश्वास । भेटी ही सायास न देसी गा ॥१॥
धरीन पदरी अकस्मात तुज । जाईल हे लाज जनामध्ये ॥२॥
बहेणि म्हणे तुज ठिकाणी लाविले । भेटी देई बोले आर्त जीवी ॥३॥

४८२.
उदंड रडती तुजे नावे देवा । बुडविले सर्वा प्राणियांसी ॥१॥
रिणबोड हरी जाणतसो मुळी । तरी तुज निराळी होतो का रे ॥२॥
भेटीचे कारणे करिते नवस । तैसी नव्हे कास घातली म्या ॥३॥
बहेणि म्हणे भेट न सांगे जनासी । माझेचि मजसी देई देवा ॥४॥

४८३.
ठेवणे मागती वडिलांचे लोक । म्हणउनी भीक मागतोसी ॥१॥
सोंगसंपादणी आहे मज ठाऊकी । तुझी म्या पारखी असे केली ॥२॥
ठेवण्याचा लोभ धरूनी अंतरी । अंबऋषीवारी गर्भ दहा ॥३॥
लहण्याची आस धरूनि ध्रुवाला । नेऊनी गोविला अढळपदी ॥४॥
बहेणि म्हणे एका देऊनिया सिद्धि । अंतरीची बुद्धी कुडी खरी ॥५॥

४८४.
मागता मागता जन्म गेले तेरा । आता क्षण धीरा नव्हे चित्ता ॥१॥
दे माझे ठेवणे आण म्या घातली । नको फार बोली करू आता ॥२॥
देईन मी जीव तुझे पायी आजी । करावी मजविजी होय तैसी ॥३॥
असोनिया नेदी हेचि दुःख वाटे । देई न कपाटे महाद्वारी ॥४॥
कोंडीन तुमचा कारभार देवा । होईल हा ठेवा अनर्थासी ॥५॥
बहेणि म्हणे आता करीन भंडाई । पांडुरंगा पायी आण माझी ॥६॥

४८५.
मागता मागता ज्ञानदेव क्लेश । पावला बावीस जन्म जाले ॥१॥
परी तुझे मन ‘ देईन ’ न म्हणे । बहुता बळे तेणे उगवले ॥२॥
चौदा शते जाली बंदी चांगदेवा । तेव्हा त्वा केशवा फेडी केली ॥३॥
बहेणि म्हणे माझे जन्म गेले तेरा । परी फजितखोरा न देसी तू ॥४॥

४८६.
नामदेवा खेचरा घातला हवाला । परि रोख त्याला न देसी तू ॥१॥
ऐसा तू विठ्ठला जालासी रे शठ । करूनि बोभाट देसी जना ॥२॥
असंख्यात किती सांगावे कष्टती । न देसी श्रीपति ज्याचे त्यासी ॥३॥
बहेणी म्हणे देवा तू होसी समर्थ । आम्ही की अनाथ जीव होऊ ॥४॥

४८७.
न बोलसी बोल फुकाचा तू एक । पहासी कवतुक काय डोळा ॥१॥
जाईन मी आता घालूनिया धुळी । कासयासी कळी वाढविसी ॥२॥
नाही तरी म्हण आपुलिया तोंडे । किती तुजपुढे बोल बोलू ॥३॥
बहेणि म्हणे चाल करू चौघाचार । बैसोनी वेव्हार निवडिती ते ॥४॥

४८८.
सर्व आम्ही तुज सारखी समान । एका देसी धन भाग त्याचा ॥१॥
त्यासी दिल्हा तैसा देई माझा मज । मग कोण तुज बोल ठेवी ॥२॥
जाले जरी श्रेष्ठ माने थोर लेखू । वाटा सर्वा एकू सारिखाची ॥३॥
बहेणि म्हणे एका भावा दिल्हा वाटा । मी काय धाकटी सांग मज ॥४॥

४८९.
घेतले आपुला विश्वास देउनी । द्यावे ऐसे मनी न ये तुझ्या ॥१॥
ठिकाण आम्हासी न दिसे सर्वथा । पाहता पाहता जन्म गेले ॥२॥
ठेवणे पुरिले कोणतिये भुई । आम्हा देश तोही सापडेना ॥३॥
बहेणि म्हणे बहु पाहिले म्या फार । अविश्वासे दूर अंतरले ॥४॥

४९०.
न देसी ते माझे भांडवल हरि । येक तरी करी पांडुरंगा ॥१॥
आण वाहूनिया देई मज क्रिया । सोडीना मी पाया मनातूनी ॥२॥
विश्वासघातकी ऐसे मज वाटे । फासे करी विटेवरी उभा ॥३॥
बहेणि म्हणे पाचामध्ये घेई आण । मग मी जाईन कळेल तेथे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP