मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
पाळणा ( जोगी )

पाळणा ( जोगी )

संत बहेणाबाईचे अभंग

५८८.
निज रे निज तान्ह्या बाळा । निज रे जीवींच्या जिव्हाळा । निज रे निज कान्हा वेल्हाळा । निज रे निज त्रैलोक्यपाळा ॥धृ०॥
करी धरूनी दोरू । देती स्नेह - झोलू । हलवी हळूहळू । यशोदा वेल्हाळा ॥१॥
जो जो जो जो मरी त्याते । “ हा हा हा हा आला येथे । जोगी ”, सांगे बालकाते । यशोदा वेल्हाळा ॥२॥
निजासी ‘ नीज ’ म्हणे । कोण ते स्वरूप नेणे । मायेच्या भुललेपणे । निजवी गोपाळा ॥३॥
हळूहळू पै कर मुखे । हलवी तेणे सुखे । रूदना करी तो देखे । गोविंद सावळा ॥४॥
म्हणे माता, “ अवधारी । जोगी आला बाहेरी । त्रिशूळ डमरू करी । दिसतो विशाळा ॥५॥
विभूतीचे विलेपन । मस्तकी जटा जाण । मेधा तिसरा नयन । पाहे गोपाळा ॥६॥
रूंड माळा गळा । व्याघ्रांबर मेखळा । मस्तकी झुळझुळा । वाहतसे बाळा ॥७॥
कपाळी अर्धचंद्र । कानी मुद्रा सुंदर । न कळे तयाचा पार । ब्रह्मादिकाला ” ॥८॥
इतुके ऐकोनी कानी । बाळ बैसे उठोनी । म्हणे “ माते नयनी । दाखवी त्याला ” ॥९॥
काळाचा जो काळ । व्यापक त्रैलोक्यपाळ । जोग्याचे दावोनी खुळ । नवल गोपाळा ॥१०॥
बहिणी गाई चक्रपाणी । करूनी नाटकवाणी । रामकृष्ण स्मरणी । घेती सोहळा ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : March 06, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP