मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
३२७ ते ३३७

श्लोक - ३२७ ते ३३७

संत बहेणाबाईचे अभंग

३२७.
गृहस्थाश्रमी तू सुखे नांद पा रे । स्वरूपस्थितीसी बरे राहि पा रे । जेणे ज्ञानवैराग्य ते आंदणी रे । असे वर्म ते बहेणिसी फावले रे ॥

३२८.
मना तू व्यापकापरीस व्यापक । ब्रह्मांड हे देख व्यापियेले ॥१॥
तेथे निजसुख कैचे जीवालागी । म्हणोनी तुजलागी विनवितसे ॥२॥
जेथवरी मना तुझा फिरे वारा । तेथेवरी थारा सुखा नाही ॥३॥
जेथवरी मना तुझा रे पसर । सुखाचा विचार तेथे नाही ॥४॥
तुझी कृपा होये तरीस सुख लाहे । म्हणोनिया पाय धरितसे ॥५॥
बहेणि म्हणे तुवा ठकिले बहुवस । तेणे कासावीस जीव माझा ॥६॥

३२९.
विधात्याएवढा तपोनिधि होता । त्यासी त्या तत्वता ठकियेले ॥१॥
ऐसे तुझे खेळ खेळसी विलगट । भोगविसी कष्ट जीवालागी ॥२॥
विष्णूसी ठकिले नारदा विटंबिले । शंकराचे केले लिंगपतन ॥३॥
बहेणि म्हणे ऐसे सांगता अपार । मना तुझे चार न कळती ॥४॥

३३०.
तुजसाठी मना धरिती धारणा । योगमुद्रा जाणा नानापरी ॥१॥
ऐसे तपोनिधी साधिता साधना । नाकळसी मना काय सांगो ॥२॥
येक प्राणापन निरोधोनी द्वारे । ब्रह्मांडविवरे वायू नेती ॥३॥
उघडे बोडके जटाळ सुडके । होऊनिया मुके हिंडताती ॥४॥
येक भूमीमाजी पुरोनिया घेती । वनी विचरती अन्नेविण ॥५॥
बहेणि म्हणे ऐसी नाना मते सांग । हिंदती वैराग्ये मनासाठी ॥६॥

३३१.
तुज साधावया एकचि कारण । फार जया पुण्य गाठी वसे ॥१॥
तेव्हा निजमन वश पै आपण । जैसे केले जाण तैसे होय ॥२॥
तपाचिया राशी वसे ज्याचे गाठी । तेव्हा मन हाती गवसे पा ॥३॥
बहेणि म्हणे मग मन तेचि तृण । पाहिजे कारण पुण्यप्राप्ती ॥४॥

३३२.
वश मन जाले मग काय उरले । ब्रह्मांड घातले पालथे जेणे ॥१॥
ऐसे पुण्य करा मनासी या वरा । सद्गुरूचे धरा पाय आधी ॥२॥
मन वश होता साधने साधिता । ब्रह्मसायुज्यता रोकडेची ॥३॥
मन जो नाकळे मग केवी कळे । बापाचि सोहळे साधनाचे ॥४॥
मन नाही ठायी सांगे घेउनी कायी । झकवावयाही अज्ञानासी ॥५॥
बहेणि म्हणे येथे केले ते आपण । जेवी त्याची खूण वाढिता जाणे ॥६॥

३३३.
जोहरियापासी न चले खोटे कुडे । तैसे संतांपुढे मन मग ॥१॥
आपणचि कळे भल्याचे लक्षण । नलगे पुसणे येरयेरा ॥२॥
मन मुरोनिया जे जे वर्तणूक । आपणचि देख उमटे आंगी ॥३॥
शांती क्षमा दया डोलती सर्वांगी । नुरे उपभोगी वासना काही ॥४॥
भागलीया ढोरा भेटे पाणी - छाया । मुरकुंडी त्या ठाया मिठी मारी ॥५॥
मरिता ढळेना उठविता उठेना । बहेणि म्हणे जाणा तैसे सुख ॥६॥

३३४.
ज्याचे गाठी फार पुण्याची ही साठ । मन त्याचे विटे विषयभोगी ॥१॥
मग तो दैवाचा सांगाती निजाचा । सखा तो आमुचा प्राणदाता ॥२॥
आत्मसुखालागी सर्वस्व त्यागिले । विरक्तीसी केले साह्य जेणे ॥३॥
संसाराचा त्रास ज्यामनी उपजला । सर्व धनी जाला निजसुहाचा ॥४॥
उरलनि प्रालब्धे आयुष्य घालविती । स्वरूपाची स्थिति अखंडचे ॥५॥
बहेणि म्हणे मना सोडी मज आता । ब्रह्मसायुज्यता सुख देई ॥६॥

३३५.
तुजसाठी मना जाईना येथोनी । राहीन चरणी सद्गुरूचे ॥१॥
मग तुझे काय चाले पाहे तेथे । येता तुज तेथे हाल होती ॥२॥
तुजसाठी मना घेईन देसोटा । धरीन मी निष्ठा गुरूपायी ॥३॥
बहेणि म्हणे मना ब्रह्मांडासगट । भरीन तुझा घोट गुरूकृपे ॥४॥

३३६.
विषयांचा लंपट जरी तू नसतासी । मग मना तुज संबंध काई ॥१॥
मग निजसुख सहज तू आपण । साधनांचा सीण कोणासाठी ॥२॥
सांडोनिया वृत्ति असतासी निवृत्ति । मग भोगप्राप्ती कोणालागी ॥३॥
बहेणि म्हणे मना विषयाचे संगती । एवढी आटाआटी करिसी जीवा ॥४॥

३३७.
सद्गुरूकृपेने साधीन तुझ्या कळा । वासना अबळा दंडीन मना ॥१॥
मग तू कीलवाणे करिसील भुख । तुझे तूचि सुख नेणसी घेऊ ॥२॥
अनाथाची परी होईल तुजलागी । ऐसे वीतरागी करीन झणी ॥३॥
बहेणि म्हणे तुझ्या सांडवीन खोडी । विवेकाची बेडी जडीन पायी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 22, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP