मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
३६३ ते ३६४

भैरव ( जोगी ) - ३६३ ते ३६४

संत बहेणाबाईचे अभंग

३६३.
विवेक जालारे बहिरव । हाती घेउनी डौर भाव ॥१॥
फेरा घालितो या नगरा । क्षेत्र काया - कासीपुरा ॥२॥
गाय सोनारीचा राजा । जया अनंत पादभुजा ॥३॥
महा स्मशानीचा वास । अखंड उन्मनीचा ध्यास ॥४॥
हाती ‘ डमरू ’ निजबोधाचा । त्रिशूळ भक्तिज्ञान वैराग्याचा ॥५॥
शांति विभूतीचे लेणे । बरवे दावी सुदर्शने ॥६॥
कानी योग तेची मुद्रा । भाळी शोभे अर्धचंद्रा ॥७॥
माथा केयूराचा भार । निजवृत्ति निर्विकार ॥८॥
अनुहात सिंगी वाजे । तेणे विधिगोळ हा गाजे ॥९॥
नकळे योगीयाची लीळा । अंगी नवखंड मेखळा ॥१०॥
काखे ब्रह्मांडाची झोळी । पृथ्वीपात्र करतळी ॥११॥
अष्टभैरवांचा राव । देही आत्मा सदाशिव ॥१२॥
डमरे बोध करी जना । त्रिशुळे गुण छेदी जाणा ॥१३॥
ऐसा योगी भक्तराव । पुसी अभक्तांचा ठाव ॥१४॥
जिकडे घाली भावे फेरा । मोडी पातकांचा थारा ॥१५॥
नाम जगजोगी गाये । हिंडोनी जनी भाव पाहे ॥१६॥
जेथे देखे भाव मनी । तेथे करी सिंगी - ध्वनी ॥१७॥
सिंगी महावाक्य जाणा । तेणे सावध करी जना ॥१८॥
मी तव सांगे जगजोगी । देव आहे तुमचे संगी ॥१९॥
का रे वोळखाना देवा । देही आत्मा सदाशिवा ॥२०॥
नका घालू वेरझारा । हा तो शेवटीचा फेरा ॥२१॥
काही करा कोन्ही दान । उभे केले का अझुन ॥२२॥
लक्ष चौर्‍यांशीचे फेरे । का रे घालितसा घेरे ॥२३॥
नका घेऊ भार माथा । भावे अर्पा भगवंता ॥२४॥
विवेक बहेणि सांगे लोका । सद्गुरू माझा रामतुक ॥२५॥
जागा जागविले तेणे । आता नाही येणे जाणे ॥२६॥
बहेणि गाय जगजोगी । अखंड निजसुख भोगी ॥२७॥

३६४.
विषय ब्रह्मरूप तेव्हा सत्य होती । जै लाभे आत्मस्थिति स्वस्वरूपी ॥१॥
तेव्हा तो जाणावा ब्रह्मनिष्ठ खरा । नातळे विकारा देहबुद्धि ॥२॥
इच्छा मावळेल अहंता गळेल । वासना विरेल स्वस्वरूपी ॥३॥
जिव्हा उपस्थाचा पडे ज्या विसरू । इंद्रियव्यापारू पारूषेल ॥४॥
बहेणि म्हणे वृत्ति जै पावेल निवृत्ति । विषय तेव्हा होती ब्रह्मरूप ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : February 22, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP