मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
२९१ ते ३०१

ज्ञानपर अभंग - २९१ ते ३०१

संत बहेणाबाईचे अभंग

२९१.
चंदनाचा संग जालिया निंबासी । चंदनत्व त्यासी ठसावले ॥१॥
तैसा संतसंग कळला हा जाणिजे । विवेक हा कीजे मनामाजी ॥२॥
पुष्पाचे संगती तंतूचाही मान । तुलसीसंगे जाण मृत्तिका ते ॥३॥
बहेणि म्हणे संग करी रे नेटका । धरूनिया टेका आत्मनिष्ठे ॥४॥

२९२.
संतसंगे शुद्ध होय चित्तवृत्ति । लागेल प्रवृत्ति संतसंगे ॥१॥
यालागी तयांचे करावे दास्यत्व । तेणे निजतत्व सापडेल ॥२॥
संतसंगे दोष नासतील सर्व । संतसंगे गर्व जाईल तो ॥३॥
संतसंगे तुज सापडेल निज । संतसंगे गुज प्रगट दिसे ॥४॥
संतसंगे दृष्टि पडेल स्वरूपी । संतसंगे स्वल्पी मोक्ष जोडे ॥५॥
बहेणि म्हणे संग धरावा निःसंग । साधनाचे अंग कळे तेव्हा ॥६॥

२९३.
संतसंगे होय वैराग्य मनासी । आणील शांतीसी संतसंग ॥१॥
संत हे सर्वांचे शिरोमणि थोर । पाहिजे निर्धार एकनिष्ठा ॥२॥
संतसंगे ज्ञान विज्ञान ठसावे । संतसंगे नव्हे दुःख देही ॥३॥
बहेणि म्हणे संतसंगाचा विचार । जाणती ते सार भक्तिवंत ॥४॥

२९४.
थोरपणा दूरी टाकूनिया जाण । संतांसी शरण जाय वेगी ॥१॥
तुझी सर्व चिंता हरेल चित्ताची । स्थिरता मनाची होय तरी ॥२॥
सर्वभावे शरण रीघ तू संताची । ज्ञानाभिमानासी टाकूनिया ॥३॥
बहेणि म्हणे संत दयानिधी खरे । चित्ताच्या निर्धारे सेवी बापा ॥४॥

२९५.
संत महावैद्य भवरोग फेडिती । सांगे ते गति ऐक त्यांची ॥१॥
अर्धमात्रा रस देउनिया जीव । रोग दूरी सर्व करिताती ॥२॥
विषयाचा त्याग सांगोनिया पथ्य । भाव यथातथ्य सेवविती ॥३॥
बहेणि म्हणे ऐसे जाणोनी अंतर । तैसाची प्रकार प्रेरिताती ॥४॥

२९६.
संत होती खरे भवार्णवी तारू । जाणती उतारू प्राणियाचा ॥१॥
कासे लाविताती निष्ठेचिया बळे । नेती कृपाळ पैलतीरा ॥२॥
नामाची सांगाडी बांधोनी बळकट । दाविताती तट सायुज्याचे ॥३॥
बहेणि म्हणे मागे उतरिले बहुत । येणेपरी संत तारू खरे ॥४॥

२९७.
एका मते संत धन्वंतरी जाण । मंत्रवादी पूर्ण भासताती ॥१॥
वाचविले जीव सर्पदृष्टीपासव । सामर्थ्य अपूर्व वाटतसे ॥२॥
पंचमुखी आहे सर्प ज्या झोंबले । लहरी येती बळे नानाविध ॥३॥
बहेणि म्हणे संत पाहाती जयाकडे । विष त्याचे झडे नवल मोठे ॥४॥

२९८.
संतांपासी असे ज्ञानाची निजशक्ति । अज्ञाननिवृत्ति होय तेणे ॥१॥
यालागी संतासी जावे लोटांगणी । रिघावे शरण मनोभावे ॥२॥
संताचिये कृपे विषयमळा नाश । सापडे अविनाश परब्रह्म ॥३॥
बहेणि म्हणे संत देव हे प्रत्यक्ष । का रे न घ्या साक्ष मनामाजी ॥४॥

२९९.
संतसंगे योग संतसंगे याग । संतसंगे प्रयोग जोडे मना ॥१॥
यालागी आवडी धरावी संतांची । प्रत्यक्ष मोक्षाची वाट हेचि ॥२॥
संतसंगे तीर्थ संतसंगे क्षेत्र । संतसंगे मंत्र सिद्धि जोडे ॥३॥
बहेणि म्हणे संतसंगे जोडे ज्ञान । संतसंगे मन स्थिर होय ॥४॥

३००.
रकारासे दीजे काना । व्यंजनाने उच्चारणा ॥१॥
म्हणे मंत्र बीजयुक्त । जे का शंकराचे उक्त ॥२॥
पुढे काना रकाराने । करू मुखी उच्चारणे ॥३॥
तयावरी मकारासी । देई काना उच्चारासी ॥४॥
याला देऊनी व्यंजन । मग करी उच्चारण ॥५॥
मन उफराटे अंती । साही अक्षरी विश्रांती ॥६॥
बहेणि म्हणे न सांगता । मंत्र सांगितला आता ॥७॥

३०१.
संतसंगतीचा महिमा अद्भुत । होती ज्ञानवंत सत्त्वगुणी ॥१॥
यालागी सेवावे संतांचे चरण । स्थिर होय मन येक क्षणे ॥२॥
संतांचे बोलणे आइकता कानी । ब्रह्मरूप जनी होय सर्व ॥३॥
बहेणि म्हणे संतदर्शनेचि मोक्ष । अनुभव प्रत्यक्ष पाहे याचा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 22, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP