मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
१७१ ते १८०

निर्याणाचे अभंग - १७१ ते १८०

संत बहेणाबाईचे अभंग

१७१.
मन विरक्त विषयी सर्वदा । इंद्रिये गोविंदा समर्पिली ॥१॥
तेचि प्रायश्चित्त घेतले अंतरी । सबाह्याभ्यंतरी एकनिष्ठे ॥२॥
मंत्रज्ञान सदा श्रीरामचिंतन । सद्गुरूभजन सर्वकाळ ॥३॥
दश दाने दशकु परेसी समर्पू । गोदाने संकल्पू वासनेचा ॥४॥
पंचगव्य तेचि जण अर्ध - मात्रा । सोऽहं हे सशब्दा प्राशियेले ॥५॥
ज्ञानगंगे स्नान मनाचे वपन । वृत्ति ह्या निमग्न ब्रह्मरूपी ॥६॥
हेचि जण प्रायश्चित्त सदा सर्वकाळ । मन हे अढळ निश्चयाचे ॥७॥
बहेणि म्हणे ऐसे केले प्रायश्चित्त । शास्त्राचा संकेत शास्त्र जाणे ॥८॥

१७२.
हेच तो प्रमाण जन्मासी कारण । अनुभव खूर हेचि आम्हा ॥१॥
ऐसे जाणूनिया हेत निर्दाळिला । अद्वय तो जाला हेत चित्ता ॥२॥
इंद्रिया जाणोनी दिले प्रायश्चित्त । ज्ञानमहातीर्थ आत्मनिष्ठा ॥३॥
विषयवासना भोगिली बहुकाळ । तयाचे निर्मूळ आजि केले ॥४॥
सद्गुरूवचनी धरूनिया निष्ठा । वासना त्या भ्रष्ट्या शुद्ध केल्या ॥५॥
बहेणि म्हणे मना दिले प्रायश्चित्त । आता जाले मुक्त आत्मबोधे ॥६॥

१७३.
तीन शते आणि वरूषे एकावन्न । आयुष्य निर्माण तेरा जन्मी ॥१॥
घातले स्त्रीरूपे साधने हरीच्या । निमाल्या मनाच्या वृत्ती जव ॥२॥
आता निश्चयाने सांगेन निर्धार । जाले निर्विकार चित्त माझे ॥३॥
बहेणि म्हणे पुढे काही नाही हेत । स्वरूपी निवांत चित्त माझे ॥४॥

१७४.
हा देह जोवरी आहे तुझा जाण । तोवरी तूज्ञान साधिसील ॥१॥
यापुढे तुज जन्म होती श्रेष्ठ । होसी योगभ्रष्ट जन्म नाना ॥२॥
तीन जन्म तुझे काशी - क्षेत्र - वास । वैराग्यमानस होतील ॥३॥
एक तू जन्मसी संन्यासी नेमस्त । चित्त काही स्वस्थ होय तेथे ॥४॥
पाचविये जन्मी अठरा वर्षा तुज । विदेहत्व पूज्य होसी खरा ॥५॥
तयापुढे जन्म घेणे नाही कदा । सांगतसे धंदा नको आता ॥६॥
बहेणि म्हणे तुझे जाणवेल तुज । कृपा करे बुझ गुरू - खुणे ॥७॥

१७५,
आपले आपण देखिले मरण । तो जाला शकुन स्वानंदेसी ॥१॥
उभारिली गुढी मनाच्या सेवटी । जाली मज भेटी आत्मारामी ॥२॥
केला प्राणायाम सोऽहं धारणेसी । मिळाली ज्योतीशी ज्योती तेणे ॥३॥
सरले संचित आयुष्य देहाचे । क्रियामाण अतीचे रामरूप ॥४॥
उठति रात्रंदिवस काम क्रोध माया । म्हणती अहा ! अहा ! यमधर्म ॥५॥
वैराग्याच्या श्रेणी लाविल्या शरीरा । ज्ञानाग्नि लाविला ब्रह्मत्वेसी ॥६॥
जाला प्रेतरूप शरिराचा भाव । लक्षियेला ठाव स्मशानीचा ॥७॥
फिरविला घट फोडिला चरणी । महावाक्यध्वनी बोंब झाली ॥८॥
दिली तिलजुली कुळ नाम रूपासी । शरीर ज्याचे त्यासी समर्पिले ॥९॥
बहेणि म्हणे रक्षा जाली त्रिपुरेची । तुकानामे साची कृपा केली ॥१०॥

१७६.
शेष प्राक्तनाची रक्षा भरूनिया । नेली ते अद्वयानंदतीर्थी ॥१॥
त्रिकोण वेदिका त्रिगुणाचा देह । सिंपोनी विदेह रूप केले ॥२॥
निर्गुणाचें भाव येती जे आठही । गोमूर्त्र ते पाही तयावरी ॥३॥
लाविल्या पताका सात्त्विक भावना । मंत्राची धारणा ब्रह्मनिष्ठा ॥४॥
ऐसा सिंचनविधी संपादिला येथे । पुढे मोक्षपंथ क्रियायोग ॥५॥
बहेणि म्हणे क्रिया करिता स्वदेहाची । माझी मीचि साची होउनि ठेले ॥६॥

१७७.
प्रथमादारम्य आरंभिली क्रिया । पिंडी पिंड पहा निवेदिला ॥१॥
दुसरे दिवशी द्वैत हरपले । अद्वैत बिंबले परब्रह्मी ॥२॥
तिसरे दिवशी त्रिगुणाची शांती । पिंडाची समाप्ती याचपरी ॥३॥
चवथे दिवशी चौदेहातीत । उघडा संकेत वोळखिला ॥४॥
पाचवे दिवशी केले पिंडदान । पाचही ते प्राण बोळविले ॥५॥
सहावे दिवशी षडूमी निमाल्या । वृत्ती स्थिरावल्या आत्मरूपी ॥६॥
सातवे दिवशी सप्तधातू अंत । राहे अखंडत्व अद्वयत्वे ॥७॥
आठवे दिवशी नाश अष्टभावा । अद्वय अनुभवा राहे सुखे ॥८॥
नवमी निवांक भक्ति नवविधा । सरल्या, आत्मबोधामाजी आल्या ॥९॥
दहावे दिवशी इंद्रिये दहाही । बोळवण देही केली त्यांची ॥१०॥
अश्मा ते उत्तरी पंचदा विषय । ज्ञानगंगे पाहे योग त्याचा ॥११॥
अकरावे दिवशी अकरावे मानस । परब्रह्मी त्यास निवेदिले ॥१२॥
वृषोत्सर्ग केला भवविरक्तीचा । विजनी तयाचा वास केला ॥१३॥
होम केला सर्व शेष प्राक्तनाचा । हेत सुतकाचा पुढे नाही ॥१४॥
सपिंडीचे कर्म बाराव्या दिवसात । वासनेचा प्रांत होय तव ॥१५॥
व्हावया निर्वासना बाराव्या दिवशी । अद्वय सरसी परब्रह्म ॥१६॥
माया अविद्येचे जाळिले बिंबले । असि - पदी आले ऐक्य मना ॥१७॥
सच्चिदानंद दृश्य द्रष्टा दर्शन । ध्येय ध्याता ध्यान विसरले ॥१८॥
त्रिपुटीचा नाश तोचि रे बारावा । ब्रह्मत्व या जीवा केले तेणे ॥१९॥
बिंबी प्रतिबिंब हरपले तेचि । बाराव्यासी हेचि साच संज्ञा ॥२०॥
सोऽहं हंस याची केली बोळवण । बारावा तो दिन आजी खरा ॥२१॥
उल्लंघोनी कळा चालले द्वादश । तेचि बारा मास श्राद्ध केले ॥२२॥
चंद्राचिया कळा सोळाचा उपरम । न्यूनाधिक सीमा तेचि आम्हा ॥२३॥
ज्ञान तेचि गंगा सांगे गुरू क्रिया । साक्षात्कार गया तेचि आम्हा ॥२४॥
करू मंगल श्राद्ध गुरूचे वचनी । ब्रह्मचि होऊनी ब्रह्म दावी ॥२५॥
ऐसी जाण क्रिया केली या शरीरे । विवेके निर्धारे आपुलिया ॥२६॥
बहेणि म्हणे आता असो देहभाव । आमुचा दृढभाव हाचि खरा ॥२७॥

१७८.
बोलावा ब्राह्मण मंत्रस्नान करू । दानविधि सारू अंतकाळी ॥१॥
धरावे प्रायश्चित्त वेदाचिया मते । आमुचे दैवत द्विज तुम्ही ॥२॥
दशदाने देऊनी केला नमस्कार । आता कृपा फार असो द्यावी ॥३॥
सात प्रहर शेष उरला अंतकाळा । दिंडीटाळघोळ - कथाभारे ॥४॥
ज्ञानेश्वरी ग्रंथ संपला पर्जन्य । करावे ब्राह्मण सिद्ध उभे ॥५॥
वाद्याचिये ध्वनी वाजती अंबरी । दशनाद भीतरी आइका रे ॥६॥
घालोनी आसन बैसोनी ध्यानस्थ । पाहे मी प्रशस्त गुरू - खुणे ॥७॥
शंख चक्र गदा, तुळसीच्या माळा । ब्राह्मणांच्या गळा शोभताती ॥८॥
सावधान तुम्ही म्हणा ज्ञानेश्वर । विठ्ठल निर्धार नाम जपा ॥९॥
सांगेन ते तुम्ही ऐका रे सर्वही । अंतकाळ देही जवळ आला ॥१०॥
बहेणि म्हणे आता पाचही ते योग । पाहो पा प्रसंग येचि क्षणी ॥११॥

१७९.
आसनी बैसेन उत्तराभिमुख । सहजासन देख अंतकाळी ॥१॥
सूर्योदयापूर्वी घटिका तीन जाण । आसनी बैसेन ध्यानमुद्रे ॥२॥
तेव्हा तुवा पुत्रा बैसोनी पाठीसी । सावध मानसी आत्मनिष्ठे ॥३॥
बाह्य ध्वनि कानी पडती तुज काही । ध्यान ते हृदयी धरी तेथे ॥४॥
करावा गजर नामकीर्तनाचा । दिवस आनंदाचा महा थोर ॥५॥
लावीन रे हात जाण जये स्थळी । जाण तू ते मनी प्राण तेथे ॥६॥
तीन आणि तेरा सोळा घटिका जाण । आसनी बैसोन ध्यान - मुद्रे ॥७॥
नव घटिका नाम न संडी उच्चार । चित्ताचा निर्धार सांगितला ॥८॥
सात घटिका पुढे तयाची वाटणी । इंद्रिये गोठणी सर्व येती ॥९॥
चार घटिका ध्यानी राहेन तटस्थ । तुवा मन स्वस्थ असो द्यावे ॥१०॥
ऐशा वो घटिका तेरा गेलियाने । सद्गुरूस्मरणे वेद जिव्हा ॥११॥
तुकाराम मुखी गंगाधरस्मरण । अठरा वेळ माल करे तेचि ॥१२॥
त्यानंतरे पुढे नासिकाग्री दृष्टी । वळोनिया मुष्टी हात दोन्ही ॥१३॥
माळ तेव्हा कंठी घालेन स्वहस्ते । करूनी प्रशस्त चित्त राहे ॥१४॥
एकाग्रता सर्व वायूंचा उपरम । उदानी संभ्रम योग त्याचा ॥१५॥
हृदयी धरोन नारायण - ध्यान । राहे समरसोन चित्त तेव्हा ॥१६॥
अखंड अद्वय ह्रुदय - व्यापक । स्मरण ते एक अद्वयाचे ॥१७॥
बहेणि म्हणे ऐसी अंतकाळस्थिती । सांगितली गति निश्चयेसी ॥१८॥

१८०.
सद्गुरू वोवाळा वोवाळा । उजळुनी निज - ज्योतिज्वाळा ॥१॥
पिंड हारपला पिंडी । तेज व्यापिले ब्रह्मांडी ॥२॥
शंतिसुखाचे आसन । अद्वय बोधाचे पूजन ॥३॥
चिद्घन चिदानंदगाभा । सच्चिदानंद निजप्रभा ॥४॥
तेज प्रकाशले लोचनी । बहेणि हारपली चिद्घनी ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : February 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP