मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
२२१ ते २३०

ज्ञानपर अभंग - २२१ ते २३०

संत बहेणाबाईचे अभंग

२२१.
चंचळ मानस चुकले, चिद्रूप । चढले प्रताप जियेचा हा ॥१॥
तेचि चंद्रभागा तेथे करी वास । पुंडलीका ध्यास अखंडत्वे ॥२॥
द्रवोनिया चित्त दृश्य हारपले । चिद्रूप संचले चिदाकाशी ॥३॥
भागली संचिते भाग होता शरीरी । भाविली पंढरी भाव - बळे ॥४॥
गाइले हे वेदी पुराणे गर्जती । गौरव वर्णिती श्रुती जिचा ॥५॥
बहेणि म्हणे ऐसी चंद्रभागा जाण । तेथे अनुष्ठान भक्त करी ॥६॥

२२२.
‘ वैद्याचा देह ’ व्यापियेला रोगे । मात्रा मागे, त्यागे, मूर्ख तोची ॥१॥
यालागी पारखी करोनिया जाण । होईल कल्याण सर्व तुझे ॥२॥
आपणचि बुडे कासे लावी जना । तयाच्या वचना मूर्ख मानी ॥३॥
धरीच उपवासी आमंत्री लोक । सत्य मानी एक तोही मूर्ख ॥४॥
बहेणि म्हणे अंगी जयासी सामर्थ्य । सर्वही पदार्थ सिद्ध तेथे ॥५॥

२२३.
कल्पतरूपासी मागता कल्पिले । सामर्थ्य ते भले तया अंगी ॥१॥
कासयासी शीण करिसी तू मने । क्रिया ते निर्वाण पाववील ॥२॥
चिंतामणीपासी मागता चिंतिले । भावना ते फळे  सर्व तुझी ॥३॥
कामधेनूपासी होती पूर्ण काम । परिसी उत्तम होय काळे ॥४॥
अमृताचे पासी मागता अमरत्व । ज्ञानेचि पूर्णत्व पावसील ॥५॥
बहेणि म्हणे अंगी क्रिया ज्या समर्थ । सर्वही पदार्थ सिद्ध तेथे ॥६॥

२२४.
धन्य मानी मन विठ्ठलाचे जयाचे । चित्त निश्चयाचे स्वस्वरूपी ॥१॥
तयाचे संगती होय चित्तशुद्धि । अंतरी हा बोध प्रगट दिसे ॥२॥
निंदा आणि स्तुती जयासी समान । देही अभिमान नाही जया ॥३॥
बहेणि म्हणे जया नाही द्वैतभाव । तोचि जाणा ठाव आत्मयाचा ॥४॥

२२५.
तोचि रे भवरोग फेडील अंगीचा । जयासी शांतीचा भाव देही ॥१॥
इतर ते व्यर्थ दांभिक कासया । पाडिती संशयामाजी लोका ॥२॥
तोचि रे निरसील भावपाश सर्वही । जया बोध देही सर्वकाळ ॥३॥
तोचि रे दवडील माया अंधकार । जयासी विकार नाही स्वप्नी ॥४॥
तोचि रे उतरील विषयविष पाहे । भूतकृपा राहे जयामाजी ॥५॥
बहेणि म्हणे ऐसी करावी परीक्षा । पावसी अपेक्षा सहजगुणे ॥६॥

२२६.
सूर्य अभ्रामाजी सापडला तरी । काय तेज तरी उणे होय ॥१॥
तैसा जाण साधू दिस प्रपंचात । परि तो अतीत सर्व कर्मी ॥२॥
सुवर्ण पुरिले जरी पृथ्वीआत । आक ते हारपत तयेमाजी ॥३॥
सूर्य उदकात बिंबला आपण । तोय त्यालागून काय बाधे ॥४॥
वदन आरशात बिंबले दिसत । आरशाचे तेथ काय लागे ॥५॥
बहेणि म्हणे रंगी ठेविला स्फटिक । रंग त्या बाधक होईल काय ॥६॥

२२७.
सर्पाचे सारिखा दोर आहे जरी । देखिलियावरी सर्प जाला ॥१॥
तोचि निश्चयाने पाहिलियावरी । वस्तु तेचि खरी वस्तुरूपे ॥२॥
शिंपीची झगमगी रूपेचि वाटते । मृगजळे भरते भूमंडळ ॥३॥
स्तंभ हा पुरूष नये निश्चयासी । खोटी मुद्रा जैसी खरी वाटे ॥४॥
करणिचे रत्न देखियेले डोळा । सारविला निआळ काच भूमी ॥५॥
बहेणि म्हणे ऐसा ज्ञानेचि हाराश । साधन ते त्यास विवेकाचे ॥६॥

२२८.
पय आणि तक्र वर्णही सारिखे । शुभ्र गार दिसे परिसही ॥१॥
परी त्यांचे गुण जाणते जाणती । मूर्ख ते मानिती समान हो ॥२॥
सुवर्ण पितळ दिसे पीतवर्ण । गंगाजळ अन्य सारिखेची ॥३॥
बहेणि म्हणे येथे परीक्षक जाणे । येर ते शहाणे काय करू ॥४॥

२२९.
कावळा आकाशी करितसे गती । गरूडपक्षा रीती तेचि असे ॥१॥
काय ते मानावे समान सज्जनी । आपुलाल्या गुणी वोळखावे ॥२॥
सूर्याचिया तेजे वर्ततसे जन । दीपही धरून तेज वर्ते ॥३॥
गाईगाढवीचे सारिखेचि दूध । परद्वारे निंद्य पतिव्रता ॥४॥
तुळसीचा वृक्ष आणि तो धोतरा । फणस - इंद्रावना सम पाहे ॥५॥
बहेणि म्हणे ज्ञान पाहिजे अंतरी । वस्तु ते निर्धारी कळे तया ॥६॥

२३०.
सुरतरू म्हणोनि बाभूळ मानिली । व्यर्थचि ते गेली भावना हो ॥१॥
यालागी वोळखी असावी नेटकी । येईल परिपाकी गुण तया ॥२॥
साखरेचा खडा गार ते एकवर्ण । हंस पक्षी जाण सारिखेची ॥३॥
बहेणि म्हणे पाहे विचारूनी मनी । ज्ञानी सर्वाहूनी श्रेष्ठ असे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 22, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP