मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
३४५ ते ३४९

भूत - ३४५ ते ३४९

संत बहेणाबाईचे अभंग

३४५.
कैसे एक नवल वर्तले । सांगता न ये ऐसे वो देखिले । मन माझे चकित पै झाले । विवेकासी गूढ वो पडिले ॥धृ०॥
बुद्धीचा पै निश्चयो राहिला । चित्ताचा हेतुचि तुटला । अहंकार हा समूळी निमाला । नवलावो सखिये जहाला ॥१॥
जागृतीच्या जागण्यामाजी वो । जागताचि देखिले चोज वो । नेणो कैची आली हे दूती वो । खुणावुनी खूण हे दावी वो । शब्देविण लक्ष ते लागले । लक्षी लक्ष लागता भेदले । तेणे देह व्याकूळ पडियेले । अंतर्बाह्य स्वरूप कोंदले ॥२॥
रूप त्याचे सांगता अपार । षड्वर्णारहित सुंदर । नखी शोभा कोटी दिनकर । वर्णावया भागला फणिवर । ऐसे रूप न देखे मी डोळा । तिन्ही लोक धुंडिता भूगोळा । देखोनिया अंतरी कळवळा । बोलता हे कुंठित रसाळा ॥३॥
एकाएकी वो पडियेली गाठी । देखोनिया मन हे वो तुटी । अखंडता लागली हे दृष्टी । परमानंदी पडली वो मिठी । निमाल्या वैखणी आदि वाचा । जाला न्यास चतुष्टयदेहाचा । प्रकाश हा थोर उन्मनीचा । काय सांगो महिमा तियेचा ॥४॥
अवस्था हे लागता उन्मनी । ब्रह्मरूप दिसे जनी वनी । येकायेकी जडली नयनी । दुजेपण न दिसे साजणी । झाडिता हा न झडेचि कैसा । पहाता गे सर्व देही ठसा । पृथ्वी आप तेज या आकाशा । व्यापक हा दिसे दाही दिशा ॥५॥
आता काय करू गे साजणी । कैसी याची जाली झडपाणी । भेटे वो ऐसा कोन्ही गुणी । दैवत हे काढील क्षणी । सहा चारी अठरा भगले । काही केल्या सर्वता नुखळे । बहेणि म्हणे अधिकचि ते जडले । कोण भूत लागले न कळे ॥६॥

३४६.
तू माझी माझी माउली मी तुझे बाळक । करितसे कौतुक नामी तुझे ॥१॥
तू माझी माउली मी तुझे वासरू । करितसे हुंकारू नामी तुझे ॥२॥
तू माझी कुरंगी मी तुझे पाडस । करी रात्रंदिवस ध्यान तुझे ॥३॥
तू माझा चंद्रमा मी तुझा चकोर । सदा ( मज ) हरिख स्मरणी तुझे ॥४॥
तू माझा मेघुला मी तुझे चातक । उल्हास हा थोर देखोनिया ॥५॥
तू माझा सज्जन मी तुझी सांगाती । अखंड हे चित्ती ध्यान तुझे ॥६॥
बहेणि म्हणे माझा तैसा प्राणसखा । तुकाराम देखा सर्व धनी ॥७॥

३४७.
निंबोलिया भरे निंबासी भरल्या । सुकाळ जाहला बापयांसी ॥१॥
कावकाव तेणे मदे ओरडती । परी ते नेणती चवी कैसी ॥२॥
तैसे नको मना मातो कामभरे । हित होय बरे तेचि करी ॥३॥
मुक्ताफळे हंस सेवित पक्षिया । हासती ते तया काग कैसे ॥४॥
परी त्याची गोडी नेणती विचार । मुखे अविचार भरले फाटा ॥५॥
जो तेथे रातला तो तेथे मातला । पूर्ण ब्रह्मकळा - चवी नेणे ॥६॥
विष्ठा पै कस्तुरी केवि ते समान । बहेणि म्हणे ज्ञान दुर्लभ हे ॥७॥

३४८.
धन्य त्रिभुवनी वंद्य पतिव्रता । जे आपुल्या निजहिता प्रवर्तली ॥१॥
ऐसियेची भेटी होताचि लवकरी । पापाची बोहरी होय तेणे ॥२॥
आपुला स्वपती जिने वोळखिला चित्ती । धन्य त्रिजगती त्रिभुवनी ॥३॥
श्रवणी तोचि ऐके मननी तोचि देखे । निजध्यासे सुख घेत असे ॥४॥
अणुमात्र वृत्ति नव्हे तिची भिन्न । सदा समाधान स्वामिसुखे ॥५॥
दृश्य या त्रिमिरा सारोनिया मागे । सदा उभी संगे स्वामीसेजी ॥६॥
स्वामीचे बोलणे खुणाचि जाणणे । मौनेचि करणे विहित धर्म ॥७॥
बोलता मौन्य अकारणा शून्य । गुण ना निर्गुण वर्ततसे ॥८॥
जे अद्वैतानिराळे ब्रह्मांडावेगळे । ते सुखसोहळे भोगीतसे ॥९॥
जीवनाचे जीवन असंगी समाधान त्रिपुटी - विलक्षण नांदतसे ॥१०॥
ज्ञेय - ज्ञप्तिज्ञान राहिले संपोन । निजानंदघन होउनी ठेले ॥११॥
होउनी ठेली वृत्ति अवघी पारूषली । तेथे कोण बोली बोलू आता ॥१२॥
ऐसी स्थिति जया स्त्री अथवा पुरूष । धन्य तेचि देखा पतिव्रता ॥१३॥
बहेणि म्हणे धन्य तेचि जन्मा आली । कीर्ती विस्तारली त्रिभुवनी ॥१४॥

३४९.
सत्शास्त्रश्रवण सत्संगसेवन । देव तयाहून आणिक नाही ॥१॥
शिष्टासी सन्मान शास्त्रांचा अभिमान । असे तोचि जाण ब्रह्मनिष्ठ ॥२॥
शांति क्षमा दया उपजे भूतकृपा । तोच एक देखा ब्रह्मनिष्ठ ॥३॥
बहेणि म्हणे कर्मे ब्रह्म जपा माने । तेचि पै जाण ब्रह्मरूप ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 22, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP