मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
७१ ते ८०

भक्तिपर अभंग - ७१ ते ८०

संत बहेणाबाईचे अभंग

७१.
सूर्याचिये घरी राहाणे जयासी । अंधकार त्यासी स्वप्नी नाही ॥१॥
तैसे स्वानुभवी न देखे तो माया । ब्रम तो अद्वयानंद अंगे ॥२॥
परिस तो जाणे काय सोने लोह । निर्ममते मोह कदा नाही ॥३॥
बहेणि म्हणे नलगे तृषा ते जीवना । पूर्वत्वे भावना भावशुद्धी ॥४॥

७२.
सूर्याचिये अंगी भासले मृगजळ । सूर्य तो केवळ नेणे तया ॥१॥
तैसी जाण माया ब्रह्मीच आभासे । परी स्पर्श नसे ब्रह्मत्वासी ॥२॥
चुंबकासन्निध लोहासी भ्रमण । सूर्य - सत्ते जन वर्ततसे ॥३॥
बहेणि म्हणे ऐसा अनुभव पाहिजे । स्वसुखी राहिजे निरंतर ॥४॥

७३.
दृश्य आणि द्रष्टा दर्शने समवेत । ब्रह्म सदोदित सर्वकाळ ॥१॥
काय घेऊ काय सांडू कोणीकडे । अनंत ब्रह्मांडे रोमरंध्री ॥२॥
ध्येय ध्याता ध्यान ज्ञेय ज्ञप्ति ज्ञान । साध्य तो साधन आपण जाला ॥३॥
बहेणि म्हणे द्वैत स्वप्नामाजी नसे । अवघाची प्रकाशे राम माझा ॥४॥

७४.
कैची माया आणि अविद्या कल्पना । कैची हे वासना पाहतोसी ॥१॥
जगदाकार ब्रह्म अखंडित सर्व । पाहे हा अनुभव निश्चयाचा ॥२॥
कैचे मन बुद्धि कैचा रे अभिमान । सर्व नारायण अंतर्बाह्य ॥३॥
बहेणि म्हणे अवघे गुणाचे विकार । ब्रह्म निर्विकार स्वतःसिद्ध ॥४॥

७५.
त्रिगुणे हे सर्व व्यापिलेसे जग । यामाजी श्रीरंग वेगळाची ॥१॥
विश्वाकार तोचि पहाता अनुभव । येथील गौरव सद्गुरु जाणे ॥२॥
उफराटी दृष्टी पाहिलियावरी । सौख्य हे अंतरी होय तेव्हा ॥३॥
बहेणि म्हणे गुण मायेचे अंकुर । ब्रह्म परात्पर अद्वयत्वे ॥४॥

७६.
सत्त्वगुण साधी ज्ञानाचिये सिद्धी । स्थिर होय बुद्धि आत्मारूप ॥१॥
कासया रज तम जगी दिसे अंगी । वाढविसी संगी पापरूप ॥२॥
काय एक नाही सत्त्वगुणापासी । पाहे तू मानसी आपुलिये ॥३॥
सत्त्वगुणे स्वर्ग साधले मोक्षही । विचारूनी देही पाहे का रे ॥४॥
सत्त्वगुण आणि संतांची संगती । कर्माची निवृत्ति होय तेणे ॥५॥
बहेणि म्हणे सत्त्व मोक्षाचे कारण पाहिजे ते ज्ञान शुद्ध अंगी ॥६॥

७७.
स्नान संध्या जप नित्य अनुष्ठान करी सावधान आत्मनिष्ठे ॥१॥
फळाशा सांडोनी अहं कर्तव्यता । मोक्ष तो आइता तेथे असे ॥२॥
स्वधर्माचरण आपुलाले वर्ण । यज्ञ आणि दान करी सर्व ॥३॥
बहेणि म्हणे ऐसा साधील तो जरी । सत्त्व तो अंतरी प्रवेशला ॥४॥

७८.
दुधाचिये चाडे गायीचे सेवन । आंब्योच पाळण फळालागी ॥१॥
तैसे कर्म करी फळाशा धरून । रजोगुणी जाण वोळखावा ॥२॥
द्राक्षाचिया मुळा दुधाची घागरी । समार्थाचे घरी आमंत्रणे ॥३॥
बहणि म्हणे ऐसी क्रिया जयपासी । ज्ञान तयापासी न ये कदा ॥४॥

७९.
वेदशास्त्र जया नाहीची प्रमाण । अशुची तो जाण अंतर्बाह्य ॥१॥
तामसी तो खरा वोळखावा नर । तपासी अघोर कल्पकोटी ॥२॥
वेदाचे प्रमाण ते ते अप्रमाण । भल्यासीही मान नाही जेथे ॥३॥
बहेणि म्हणे ऐसे अंगेचि दुर्जन । त्यासी संभाषण करू नये ॥४॥

८०.
जन्मजन्मांतरी वासनेचा भ्रष्ट । मोक्ष हा वरिष्ट केवी साधे ॥१॥
जैसा तो काउळा अमंगळी प्रितीं । राजहंसपंगति कैची तया ॥२॥
कुकर्म आवडे अधर्मप्रवृत्ती । अंधतम मूखीं घेत असे ॥३॥
बहेणि म्हणे त्याचे तोंड पाहू नये । नरकाचा ठाय तोचि येक ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP