मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
४४६ ते ४५५

ज्ञानपर अभंग - ४४६ ते ४५५

संत बहेणाबाईचे अभंग

४४६.
गीतार्थ पाहोनी असत्य त्यजावे । सत्यासी भजावे आदरेचि ॥१॥
मग तू सहज पावसील सुख । संवसारीचे दुःख सर्व नासे ॥२॥
माया अविद्येचा नाश विवेकाने । करी तू निर्वाण पावसील ॥३॥
बहेणि म्हणे देही विरक्ति ठसावे । तरीच मुसावे परब्रह्म ॥४॥

४४७.
सकळ विषय जैसे वाटती वीष तैसे । परधनपरदारा त्याग त्यांचा विशेष ॥ श्रवणमनन साधूसंगती नित्य कीजे । म्हणत बहेणि येणे आत्मयाथे वरीजे ॥

४४८.
वर्णाश्रमसेवा या वेदाचेनि मते । कर्म करी त्याते मोक्ष साधे ॥१॥
चित्तशुद्धि होय विरक्ति सबळ । ज्ञानेचि प्रबळ नाश त्याचा ॥२॥
यथोचित कर्म, फळाचा तो त्याग । कर्तृत्व - विभाग अहंत्यागे ॥३॥
बहेणि म्हणे कर्मत्याग नाही कदा । करावे मर्यादा नुल्लंघोनी ॥४॥

४४९.
वेदे प्रतिपाद्य केले असे कर्म । मोक्षाचे हे वर्म पाहोनिया ॥१॥
परी ते नाणती करिता चुकले । तेणेचि पावले जन्म - मृत्यु ॥२॥
ब्रह्मचर्य आणि गृहस्थ वानप्रस्थ । आणिक संन्यास वेदमते ॥३॥
बहेणि म्हणे वेद बोलिला नेटके । क्रियेपाशी सुखे दुःखे येती ॥४॥

४५०.
वेदां ऐसी नाही माउली आणिक । प्राणिया विवेक सांगितला ॥१॥
परी ते नेणती वेदार्थीचे वर्म । चुकोनिया कर्म आचरती ॥२॥
वेदा ऐसा कैचा बाप या जगासी । कर्मेचि मोक्षासी पाववितो ॥३॥
बहेणि म्हणे वेद मोक्षाचे कारण । परी क्रिया जाण पाहिजे ते ॥४॥

४५१.
वेदार्थ हा पाहुनि वर्तती जे । वर्णाश्रमी आश्रम त्यासि साजे ॥ मोक्षासि हा कारण प्राणियासी । बहेणि म्हणे वेद मना उपासी ॥१॥

४५२.
ब्रह्मचर्यी जया जाली निर्वासना । तेथोनिच जाणा मोक्ष तया ॥१॥
निर्वासना मूळ असावी नेटकी । आश्रमी विवेकी वेद बोले ॥२॥
गृहस्थ - आश्रमी हेत नेमालिया । तेथुनीच तया मोक्ष पाहे ॥३॥
वानप्रस्थी विषयवासना निरसली । मुक्ति हे साधली तेथे तया ॥४॥
संन्यास घ्यावया मूळ विषय - त्याग । येर्‍हवी प्रसंग नाही खरा ॥५॥
बहेणि म्हणे वेद प्रमाण तो खरा । आश्रमी निर्धारा मोक्ष व्हावा ॥६॥

४५३.
वेदाचाआधार सर्वहीआश्रमा । वेदासी उपमा नाही खरी ॥१॥
यालागी प्रमाण सर्वाअंसी हा वेद । आश्रमासी वंद्य महावाक्य ॥२॥
वेद तेचि ज्ञान वेद तेचि ध्यान । वेद करी पावन वर्णमात्रा ॥३॥
वेत तोचि जप वेद तेचि तप । वेद तो स्वरूप आत्मयाचे ॥४॥
वेद तेचि तीर्थ वेद अनुष्ठान । वेद तो निर्वाण योगनिष्ठ ॥५॥
वेद तोचि योग वेद तोचि याग । वेद तो संयोग जीवात्मया ॥६॥
वेद तोचि भाव वेद तोचि देव । वेद तोचि ठाव सर्वज्ञते ॥७॥
बहेणि म्हणे वेद अमान्य जयासी । तया रौरवासी घडे जाणे ॥८॥

४५४.
वेदाचा अर्थ घेई तदुपरि दुसरे त्याच मार्गे प्रवाही । जाणे वस्तूसि देही निरखुनी मग मही हिंड तू सर्व पाही ॥ भावार्थे नाम गाई गुरूपद हृदयी सर्वदा त्यासि ध्याई । नाही ते वस्तु ठायी बहेणि म्हणतसे सौरसे तेथ जाई ॥१॥

४५५.
वेदार्थ - विचारे आत्मा दुरी नाही । सर्वांतरी पाही वोतप्रोत ॥१॥
परी ते नेणती कल्पनेचे योग । इंद्रियांच्या संगे भ्रांत झाले ॥२॥
आकाश व्यापक जैसे असे सर्वा । आत्मत्व अनुभवा तयापरी ॥३॥
बहेणि म्हणे जसे अलंकारी सोने । आत्मा तेचि खुणे वोळखावा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP