मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
१११ ते १२०

भक्तिपर अभंग - १११ ते १२०

संत बहेणाबाईचे अभंग

१११.
होउनी निवांत पाहता एकांत । अवघीचि विश्रांत घडली मना ॥१॥
अद्वैत आपण ब्रह्म परिपूर्ण । स्वानंदघन होउनी सर्व ठेले ॥२॥
निवांत एकांत वास अद्वैताचा । सोहळा सुखाचा संत घेती ॥३॥
बहेणि म्हणे नेणो काय पुण्य केले । सुख हे लाधले गुरूकृपा ॥४॥

११२.
दिवस ना राती प्रकाश ना ज्योती । तेथे निजवस्ती केली जीवे ॥१॥
आनंदी आनंद गोविंदी गोविंद । भोगू परमानंद बाईयांनो ॥२॥
अध ना ऊर्ध्व गति ना विगति । तेथे निजवस्ती केली मने ॥३॥
बहेणि म्हणे सोऽहं हंस यासकट । भरूनी ठेला घोट एकसरा ॥४॥

११३.
जळ ना स्थळ ना कैची भवनदी । वाउगी उपाधि जडली देही ॥१॥
ऐसे जाणोनिया म्या केली तातडी । साधावया गोडी स्वरूपाची ॥२॥
कैची भ्रमरगुंफा कैची शिवपुरी । का भरावे उरी वाउगेची ॥३॥
कैचे ताजे आणि जरठ कमळ । निरंजन कमळ कैचे तेथे ॥४॥
महा कमळावरी आलेखाची मढी । तयावरी गुढी प्रेमज्योती ॥५॥
अवघे कम पाहे ज्या स्वरूपाखालती । बहेणिची निजवस्ती जाली तेथे ॥६॥

११४.
परेचे परते त्याहुनी परते । सारोनीया चौथे पाहे पा रे ॥१॥
तेचि ते होउनी पाहे पा तू कैसा । व्यर्थ दाही दिशा हिंडो नको ॥२॥
सच्चिदानंदाचा खुंटला संवाद । तुटलासे वाद जये ठायी ॥३॥
बहेणि म्हणे वस्ती मोडिली परेची । वार्ता ओंकाराची नाही नाही ॥४॥

११५.
अक्षर ते क्षरले रूपासी ते आले । निर्गुण ते जाले सगुणचि ॥१॥
पैल भीमातीरी उभा विटेवरी । स्वरूपे साजिरी दिव्यमूर्ति ॥२॥
विजातिया कैसे जाले कुळनाम । निःसीमासी सीम नवल मोठे ॥३॥
अशोभ तो शोभा पावलाहे कैसा । बहेणि म्हणे दिशा व्यापूनिया ॥४॥

११६.
माझा दीनानाथ दीनबंधु हरि । नांदे भीमातीरी पंढरीये ॥१॥
विटे नीट उभा समचरण साजिरी । पाऊले गोजिरी सुकुमार ॥२॥
वैजयंती माआळ रूळतसे गळा । कासेसी पिवळा पीतांबर ॥३॥
भाळी ऊर्ध्व पुंड्र कुंडले गोमटी । चंदनाची उटी सर्वांगासी ॥४॥
सिरी टोप साजे रत्नांचा साजिरा । काढियेला तुरा मोतियांचा ॥५॥
जैशा हिर्‍याच्या शोभती दंतपंक्ती । बहेणि तया ध्याती हृदयामाजी ॥६॥

११७.
ब्रह्मांडावेगळी वेदासी निराळी । चोविसा आगळी विठ्ठलमूर्ति ॥१॥
धन्य ते आगळी गेती प्रेमसुख । पाहती श्रीमुख विठ्ठलाचे ॥२॥
सा चौ आठरासी अगम्य चोजवेना । ते हे मूर्ति जाणा पंढरीसी ॥३॥
वैकुंठनिवासे स्वइच्छा निर्मिले । अक्षर ते क्षरले भक्तिसुखा ॥४॥
अनंत ब्रह्मांडे जयाचे उदरी । होती घडामोडी सर्वकाळ ॥५॥
ब्रह्मेणि म्हणे ते हे पंढरीची मूर्ति । ठकारली व्यक्ती विठ्ठालवेषे ॥६॥

११८.
संतकृपा जाली । ईमारत फळा आली ॥१॥
ज्ञानदेवे घातला पाया । उभारिले देवालया ॥२॥
नामा तयाचा किंकर । तेणे रचिले आवार ॥३॥
जनार्दन येकनाथ । खांब दिल्हा भागवत ॥४॥
तुका जालासे कळस । भजन करा सावकास ॥५॥
बहेणि फडकती ध्वजा । निरोपण केले वोजा ॥६॥

११९.
मरण न यो म्हणतो रे नर मरण न यो म्हणतो । स्वानुभविक सुख नाही जयासी विषयी जो रमतो ॥१॥
स्त्री सुत धन दुहिता प्रिय ज्यासी भ्रमर जसा भ्रमतो । आवडि मान प्रतिष्ठा लौकिक यथेची जो रमतो ॥२॥
राज्यसुखी रति आर्त मूर्छना कामी लुब्धक तो । जो व्यसनप्रिय मद्य - परस्त्री - लंपट तामस तो ॥३॥
वांच्छित इंद्रपद प्रमदासुख त्यास्तव याज्ञिक तो । बहेणि म्हणे अरे ये स्थितीचा नर मृत्युभयासी भितो ॥४॥

१२०.
मृत्युभया न बिहे रे ज्ञानी मृत्युभया न बिहे । सिंधुवरी जसे बुद्बुद येती वाते वाते त्या विलय ॥१॥
मायिक सर्व प्रपंचचि मिथ्या कैचा त्या प्रलय । स्वप्न जसे प्रतिभासत मिथ्या देह तदन्वय हे ॥२॥
घृत जैसे थिजले विघुरे मग तेचि पुन्हा घट ये रे । हेमाचे नग आटुनि हेमचि काय तयासी भये रे ॥३॥
बहेणि म्हणे निज अनुभव ज्यासी, द्वैतहि तेथ न ये । देह पडो अथवा न पडो परि । अनुभव ब्रह्मिच त्यासि लयो ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP