मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
६५१ ते ६९१

देवाशी भांडण - ६५१ ते ६९१

संत बहेणाबाईचे अभंग

६५१.
कोणे तुशी संबोधिले । काय पुरले त्याचे केले ॥१॥
म्हणितले तुजला देवा । कृपासिंधू कृपार्णवा ॥२॥
काय केली कृपा तुम्ही । सांगा झणी उच्चारोनी ॥३॥
बहिणी म्हणे कळला कावा । तुझा देवा आम्हाते ॥४॥

६५२.
कैसा झाला कृपावंत । भक्त - अंत पाहोनी ॥१॥
काय केली फुकी । सांगा एकी कोणावरी ॥२॥
न देसी घेतल्याविना । कैसी करूणा ऐसी तरी ॥३॥
बहेणि म्हणे वृथा देवा । करूणार्णवा झालासी ॥४॥

६५३.
कोणे दिला उदारपणा । नारायणा तुजलागी ॥१॥
कृपणाहुनी तू कृपण । कृपण पूर्ण करणीचा ॥२॥
काय दिधले भक्तालागी । सांगा वेगी भगवंता ॥३॥
बहिणी म्हणे भक्त - आर्त । नाही पूर्त केले तुवा ॥४॥

६५४.
तुज ऐसा देव लुच्चा । नाही सच्चा पाहियेला ॥१॥
निवृत्ति ज्ञानदेवा । बहुत तुवा शिणवीले ॥२॥
गोर्‍या कुंभाराचे हात । तोडिसी भगवंत करणी ऐसी ॥३॥
भोळा भक्त चोखा मेळा । पाहासी सुळा देऊ तया ॥४॥
बहिणी म्हणे ऐसी करणी । चक्रपाणी उदाराची ॥५॥

६५५.
म्हणती तुला दयाघना । दयाघना परि कोरडी ॥१॥
हरिश्चंद्र तारामती । केली माती संसाराची ॥२॥
गोपीचंद राजा भोळा । वोस केला गाव त्याचा ॥३॥
एकनिष्ठ भक्त बळी । तुवा घातिला पाताळी ॥४॥
बहिणी म्हणे बरे केले । नाही आले अनुभवा ॥५॥

६५६.
काय दिले नावा ऐसे । कोणा कैसे कळेना ॥१॥
संत थोर तुकाराम । घेता नाम छळिले तुवा ॥२॥
ऐसी कैसी तुझी थोरी । न पुरे बोरी भिल्लीची ॥३॥
कैसा तुझा बडिवार । ध्रुवा केले निराधार ॥४॥
बहिणी म्हणे घेऊ जाणे । देऊ जाणे नेणसी तू ॥५॥

६५७.
तुजऐसा नाही देखला उदार । श्रुतिशास्त्री फार वर्णियेला ॥१॥
तोचि का हा देव विटेवरी उभा । चैत्यनाचा गाभा पूर्ण दिसे ॥२॥
मिटोनी लोचन कर कटेवरी । दृष्टि हितावरी ठेवोनिया ॥३॥
बहिणी म्हणे देवा ओळखिले पूर्ण । अंतरीचा वर्ण हाचि असे ॥४॥

६५८.
आलासी कोठेनी अरे मुशाफरा । कोणी तुज थारा दिला येथे ॥१॥
चावोनी चपाट केले भक्त भोळे । अव्यक्त ठेविले निजप्रेम ॥२॥
मोठे घर परी पोकळचि वासा । तैसी हृषीकेशा करणी तुझी ॥३॥
बहिणी म्हणे लुच्चा धरिला वैकुंठीच । आता कैशी वाचा बंद झाली ॥४॥

६५९.
धरिला भोरपियाचा वेश । माया लेशभर नाही ॥१॥
त्यागिलेही लक्ष्मीसी । परी म्हणविसी कृपावंत ॥२॥
म्हणविशी कृपाघन । अंगी अभिमान दाटला ॥३॥
बहिणी म्हणे सोडा देवा । घ्यावी सेवा भावशुद्ध ॥४॥

६६०.
कोठे गुंतलासी कोठे लपालासी । कपटकृती ऐसी तुझी देवा ॥१॥
काय शेषसेजी सुखनिद्रा घेसी । अथवा खेळसी रासक्रीडा ॥२॥
काय गोपाळांया मेळी विहरसी । वेणू वाजविसी वृंदावनी ॥३॥
बहिणी म्हणे तुझ्या बापाचे गाठोडे । वेचे का रोकडे भेटी देता ॥४॥

६६१.
सांडियली लाज, लौकिक व्यवहार । नाही लेशभर तुज देवा ॥१॥
तुला देवपणा आला कोणा काजा । बरे केशिराजा बोल आता ॥२॥
नाही चाड तुला संत - सज्जनांची । थोरवी फुकाची मिरविशी ॥३॥
बडिवार कोण येणे तुझा वाणी । पडसील घाणी अभक्तांच्या ॥४॥
बहिणी म्हणे उगे केले आम्हा वेडे । आपुले पोवाडे गावयाते ॥५॥

६६२.
गणिकेच्या काय देखिले अधिकारा । निजपायी थारा दिला तिशी ॥१॥
जन्मजन्मांतरीचा अजामेळ पापी । तयासी स्वरूपी मेळविले ॥२॥
चांडाळ पातकी वाल्ह्या कोळी चोरा । यशाचा डांगोरा केला त्याच्या ॥३॥
गजेंद्रे आकांती काय केला धावा । तेथे तू केशवा धावलासी ॥४॥
बहिणी म्हणे तुझ्या जरी आले मना । पहाई न गुणा तया दोषा ॥५॥

६६३.
तुज ऐसा देव नाही तीन्ही सृष्टी । तेहतीस कोटी देवांमाजी ॥१॥
भोळ्या भाविकाएसे दिससी भाविक । जैसा योगी बक जलामाजी ॥२॥
काय थोरपण जगा नागवण । काय हे भूषण तुज साजे ॥३॥
तुझे थोरपण तुजलाचि साजे । येरी अनबुजे होय देवा ॥४॥
बहिणी म्हणे बोंब तुझ्या करणीची । वृथा भूषणाची मनी कांक्षा ॥५॥

६६४.
अनंत - नयने म्हणताती तुला । आता का आंधळा जाहलासी ॥१॥
काय माझे हाल न दिसे तव डोळा । होसी बा आंधळा देखोनिया ॥२॥
द्रौपदीची लज्जा जाता देखोनीया । वस्त्रे नेसावया धावलासी ॥३॥
तुकारामवेद बुडता जो देखसी । जली ठाकलासी देखोनिया ॥४॥
बहिणी म्हणे तेव्हा डोळस होतासी । आता सहस्त्राक्षी दिसेना का ॥५॥

६६५.
तुज असता अनंत कर्णे । नये गार्‍हाणे कानी कैसे ॥१॥
काय झाला परिसुनी बधीर । द्रौपदीचा आर्तस्वर ॥२॥
गजेंद्रधावा ऐकू आला । बहिरे झाला काय आजी ॥३॥
कान्होपात्रेची विनवणी । कैसी कानी पडियेली ॥४॥
बहिणी म्हणे घेता सोंग । निद्राभंग नोहे कधी ॥५॥

६६६.
कसी घातीयली उडी । हाक ऐकुनि स्तंभ फोडी ॥१॥
हाक फोडोनी सैराट । दुष्टपोट विदारिले ॥२॥
कैसी करूणा आली तेव्हा । नये देवा का हो आता ॥३॥
काय वाते जडभारी । तुम्हा हरी भेटावया ॥४॥
बहिणी म्हणे वनमाळी । करी न रळी भेटीसाठी ॥५॥

६६७.
थोरली हे तुझी सखी मेहुणी ती । असोनि लक्ष्मीपती दरिद्री का ॥१॥
शंख मेहुणा तो अक्षयी कोरडा । भूषण तव गाढा काय काज ॥२॥
राजाचे सोयीरे भीक मागताती । लज्जा कोणाप्रती सांग त्यांची ॥३॥
बहिणी म्हणे काही असो नसो स्वता । परी परचिंता थोर तोचि ॥४॥

६६८.
तयासीच आम्ही म्हणो थोर जाणा । जयासी करूणा पराविया ॥१॥
छत्रपती राजा स्वये म्हणवितो । सोयरा मागतो भीक त्याचा ॥२॥
जाळावे ते काय त्याचे थोरपण । कृपणासमान कृती ज्याची ॥३॥
बाईल उघडी फिरतसे घरी । भूषण बाहेरी काय त्याचे ॥४॥
बहिणी म्हणे फुका म्हणविसी उदार । परी अनुदार वृत्ति तुझी ॥५॥

६६९.
मागणीचे माझ्या तुज का साकडे । पडले येवढे सांग देवा ॥१॥
मागीतले तरी कायसे अघोर । म्हणोनिया थोर चिंता तुज ॥२॥
भेटी देता भीती तुज काय वाटे । तेणे भये कोठे लपालासी ॥३॥
बहिणी म्हणे भ्याडा, अगा पुरूषोत्तमा । काय ही उपमा तुज साजे ॥४॥

६७०.
काय वेचे सांग भेटि देता तुझे । म्हणोनिया ओझे तुज वाटे ॥१॥
काय तुझे रूप नेईन चोरोनी । भये चक्रपाणि लपालासी ॥२॥
काय तुज तोटा येईल बोलता । अगा दीनानाथा पांडुरंगा ॥३॥
काय काज आम्हा तुझीये वैभवा । आस ही केशवा भेटीची गा ॥४॥
बहिणी म्हणे आम्हा नलगे तुझे काही । भेटीवीण पाही दीनबंधो ॥५॥

६७१.
कोणे संबोधीले तुम्हा । पतीतपावन नारायणा ॥१॥
पावनास्तव आले येथ । न करिसी सत्य जाते घरी ॥२॥
कोणे बांधिला सादर । पायी ब्रीदाचा तोडर ॥३॥
तुज ऐसा त्रिभुवनी । कृपण नाही चक्रपाणी ॥४॥
बहिणी म्हणे खळा केला । बोध, कोणा कामा आला ॥५॥

६७२.
तुज ऐसे करणे होते । तरि का माते जन्म दिला ॥१॥
तुझ्या भेटीची मज आस । हाती निरास केले का बा ? ॥२॥
काय म्हूण आडलासी । दयावंता हृषीकेशी ॥३॥
देई चरणसेवा नुपेक्षी । सर्वसाक्षी नारायणा ॥४॥
बहिणी म्हणे जन्म व्यर्थ । पंढरीनाथ न भेटता ॥५॥

६७३.
ऐसे वाटे जाळो काया । कोण उपाया देव भेटे ॥१॥
गृहा सोडुनि जाऊ वना । नंदराणा पहावया ॥२॥
करू काय न धरवे धीर । शारङ्गधर भेटे न हा ॥३॥
लागे आयुष्या ओहोटी । जगजेठी भेटसी कै ॥४॥
बहिणी म्हणे काही मनी । गुप्त कानी सांगा देवा ॥५॥

६७४.
काय धरू आटाआटी । भेटीसाठी तुझे देवा ॥१॥
बैसलासी कोणे देशी । सांगा मशी येई तेथे ॥२॥
करू कठिण यत्न सोपा । जेणे कृपा करिसी तू ॥३॥
बहिणी म्हणे खंती । वाटे, चित्ती निर्दय झाला ॥४॥

६७५.
वास तुझा कोठे नाही । विश्वी काही ऐसे नसे ॥१॥
बोलू गेले साधुसंत । सर्वाआत अससी तू ॥२॥
भाव ऐसा धरूनिया । शरण पाया आले असे ॥३॥
दासीलागी भेटू कैसा । विचार ऐसा करू नका ॥४॥
बहिणी म्हणे तुझे पाया । जीव काया कुरवंडीन ॥५॥

६७६.
काय तुज वाटे मज भेटी देता । कोण भय चिंता सांग उपजे ॥१॥
काय तुझे स्वरूपा पडे माझी दृष्टी । लपसी जगजेठी तया भेणे ॥२॥
तुझीया गोवळ्या करंट्या कपाळा । सांग माझा डोळा केवी लागे ॥३॥
काळ्या काजळाच्या काळाही सरसा । पांढर्‍या परिसा दृष्टि कै हो ॥४॥
बहिणी म्हणे नको प्रसंगी निर्वाणी । बर्‍या बोला झणी भेटी देई ॥५॥

६७७.
रत्नजडित तव कौस्तुभ । नलगे लाभ मज त्याचा ॥१॥
न लगे तुझी वैजयंती । भेटी चिंती चित्त तुझी ॥२॥
नलगे माणिक मुक्तामाला । भेटी डोळा तुझी पुरे ॥३॥
नलगे मुगुट हार कंठी । सुख वैकुंठीचे नको ॥४॥
बहिणी म्हणे कृपावंता । आस चित्ता भेटीची ॥५॥

६७८.
नलगे तुझी चंदन उटी । व्हावी भेटी एकी हेळा ॥१॥
नलगे बंडि उंची शेला । तुझे बोला इच्छितसे ॥२॥
नलगे तुझे शंख चक्र । छत्र चामर नको तुझे ॥३॥
बहिणी म्हणे सौख्य गाढे । भेटि पुढे तुच्छ तुझ्या ॥४॥

६७९.
सुखे घाली तू वैजयंती । मज खंती नसे त्याची ॥१॥
माणिक मोती घाली गळा । तुळसीमाळा पुरे आम्हा ॥२॥
केशरकस्तुरीचा तुला टिळा । आम्हा भाळा नाममुद्रा ॥३॥
थोर आयुधे तुझे हाती । आम्हा हाती टाळ दिंडी ॥४॥
बहिणी म्हणे एणे आम्हा । सौख्यप्रेमा वाटतसे ॥५॥

६८०.
शिरापुरी तू खा लाडू । भेटी गोडू आम्हासी ॥१॥
नलगे काही तुमचे आन । भेटीवीण विठो एका ॥२॥
पुरवा भेटीची गा आस । दुजे तुम्हास न मागे काही ॥३॥
बहिणी म्हणे लवलाहे । भेटी द्या हे दासीसी ॥४॥

६८१.
भेटी देता मज समाधान होये । तुझे काय जाये तयामाजी ॥१॥
देखवे न का तुज माझे समाधान । न देसी म्हणोन भेटी मज ॥२॥
भेटीचीही आस न ये पुरविता । ऐसा कैसा दाता विठ्ठला तू ॥३॥
रीती उदाराची ऐसीच का असे । कल्याण जगाचे देखवेना ॥४॥
बहिणी म्हणे तोंड कृपणाचे पुढे । वेंगाडिता कोडे पुरे काय ॥५॥

६८२.
पुंड्यालागी कैसा आलासी धावोनी । काय भक्ति पाहुनी भुललासी ॥१॥
काय केली ऐसी तये थोर भक्ती । मानली श्रीपती तुम्हालागी ॥२॥
ब्रह्मरू तया दाखविले डोळा । ऐसा काय भोळा होता पुंड्या ॥३॥
बहेणि म्हणे तुझ्या पाहोन ब्रह्मरूपा । विटेवरी देखा उभे केले ॥४॥

६८३.
केली संसाराची माती । भेटीसाठी तुझ्या देवा ॥१॥
हिंडतए रानी वनी । नये ध्यानी हे का तुझे ॥२॥
तव रूपी लागली गोडी । भाव - जोडी मेळविली ॥३॥
बहिणी म्हणे झाले वेडे । माझे कोडे पुरवी गा ॥४॥

६८४.
तुझे यश गाता शेष स्तब्ध झाला । परी नाही कळला पार तया ॥१॥
तेथ माझा पाड काय वर्णी गुण । अवघाचि शीण होईल पै ॥२॥
इंद्रादि सुरगण वंदिती जयाला । तो हरी सापडला पुंडलीका ॥३॥
बहिणी म्हणे रूपे ते देखलिया डोळा । धाक कळिकाळादिका पडे ॥४॥

६८५.
अजुनी का न ये तुमचिये ध्यानी । किती विनवणी करू देवा ॥१॥
कृपाळूपणाची मेळविली ख्याती । म्हणोन का श्रीपती कंटाळला ॥२॥
भक्त झाले फार आला का कंटाळा । द्रौपदीवेल्हाळा सांगा तरी ॥३॥
बहिणी म्हणे कीर्त्ति आयकीयेली कानी । चालत चरणी आले येथे ॥४॥

६८६.
गोपगोपीसंगे खेळलासी भारी । थकलासी हरी काय आता ॥१॥
स्वर्गीय देवांनी केले का भांडण । पुंडलिका लागून आला येथे ॥२॥
काय असे वर्म सांगा आम्हा । वारंवार तुम्हा विनवीतसे ॥३॥
बहिणी म्हणे जरी सत्य ना सांगाल । तरी मग बोल तुम्हावरी ॥४॥

६८७.
तुमचे गुण गाता नावडती तुम्हा । काय ठावे आम्हा ऐसे आहे ॥१॥
गोडी स्वरूपाची लागलीसे फार । वरी प्रेमभर पडियेला ॥२॥
म्हणोनी जाहाले मन आजी वेडे । तुम्हासी सांकडे घातीयेले ॥३॥
बहिणी म्हणे तरी न करा उपेक्षा । पुरवा अपेक्षा भेटीची गा ॥४॥

६८८.
मूर्खपणे तुम्हा छळियेले भारी । तरी तू श्रीहरि माय माझी ॥१॥
लेकुरे बोलिले काय त्याचा खेद । जननी आल्हाद मानी त्याचा ॥२॥
अपराधाची क्षमा मागता मातेसी । प्रेमपान्हा तिजसी काय नुपजे ॥३॥
बहिणी म्हणे ऐसी गोठी नायकीली । विठाई माउली तैसी मज तू ॥४॥

६८९.
कल्पतरूखाली बैसला भुकेला । तरी नाही धाला काय ऐसे ॥१॥
सापडला किंवा परीस जयाला । दारिद्र्याची त्याला पीडा उरे ॥२॥
घरी कामधेनू असताही बाधी । पोटाची उपाधी जयालागी ॥३॥
होय परी ऐसे माझिया मनाते । लाज आणिकाते काय देवा ॥४॥
बहिणी म्हणे येथे बोलावे ते कोणा । तुज नारायणा वाचोनिया ॥५॥

६९०.
धरियेले तुझे पाय । आता सोय करी बापा ॥१॥
नको लावू लोटोनीया । पंढरीराया कृपावंता ॥२॥
लोखंड लागता परिसा । सुवर्ण कैसा न होय बा ॥३॥
जरी झाले ऐसे तरी । उरे केवी थोरी परिसाची ॥४॥
बहेणि म्हणे कोण थोर । तुजहुनी पामर हा उद्धराया ॥५॥

६९१.
सर्व देवांचा तू देव । तुजहुनी देव थोर कोण ॥१॥
तुज सांडुनि नारायणा । वंदू चरणा कोणाचिये ॥२॥
निवारील माझी चिंता । ऐसा कोण दाता तुजवीण ॥३॥
तुझी होता अवकृपा । कोण कृपा करू धजे ॥४॥
बहिणी म्हणे पायी राखा । माजे न देखा गुणदोषा ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 06, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP