मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
२५१ ते २६०

ज्ञानपर अभंग - २५१ ते २६०

संत बहेणाबाईचे अभंग

२५१.
ब्राह्मणाची आज्ञा देव वंदी शिरी । मुक्ती आज्ञाधारी जयापासी ॥१॥
यालागी ब्राह्मण तारक कलियुगी । धन्य तेचि जगी सेविती ते ॥२॥
ब्राह्मणाचे देही प्रत्यक्ष भगवान । वेद तो आपण मुखी जया ॥३॥
बहेणि म्हणे त्याचे काय वर्णू एक । शरीर विवेकरूप त्याचे ॥४॥

२५२.
चहू वर्णांमाजी वरिष्ठ ब्राह्मण । समीपता जाण मुक्ती त्यासी ॥१॥
ब्रह्मची ब्राह्मण बोलताती श्रुती । वचनासी वंदिती लोकत्रय ॥२॥
ब्राह्मण जालिया नाही अधोगति । देव सर्व ध्याती ब्राह्मणासी ॥३॥
बहेणि म्हणे जे हे गायत्रीचे स्थळ । राहावया केवळ देह ज्याचे ॥४॥

२५३.
कोणासी म्हणावे निश्चित । पहावाहा अर्थ विचारूनी ॥१॥
मग ते वंदावे भजानवे सप्रेमे । मोक्षदानी नेमे वेदवाक्य ॥२॥
जीव, देह, जाति, वर्ण, कर्म, धर्म । पहावे हे वर्म शोधूनिया ॥३॥
बहेणि म्हणे ज्ञान पांडित्य ब्राह्मण । विवेके करोनी पहा आधी ॥४॥

२५४.
जीव हा ब्राह्मण म्हणावे इत्यर्थ । तरी येथे अर्थ सापडेना ॥१॥
सर्वाठायी जीव सारिखाचि एक । पशु पक्षी देख चांडाळादी ॥२॥
पुढे जीव होती मागे बहु जाले । ब्राह्मणत्व आले नाही तया ॥३॥
बहेणि म्हणे जीव प्राणिमात्री एक । ब्राह्मणत देख म्हणो नये ॥४॥

२५५.
देहचि ब्राह्मण म्हणो जरी आता । न घडे तत्त्वता विवेकदृष्टी ॥१॥
विचारूनी आधी ब्राह्मण तो कोण । मग तू भजोन राहे सुखे ॥२॥
देह हे सर्वांचे एकचि जाणिजे । पंचभूते सहजे सर्वाठायी ॥३॥
तारूण्य वार्धक्य बालत्व देहासी । जाणावे जीवासी स्थान तेचि ॥४॥
देह तेथे जीव जीव तेथे देह । ब्राह्मण तो काय म्हणो तया ॥५॥
बहेणि म्हणे सर्व योनींसी शरीरे । सारिखीचि बा रे विवंचिता ॥६॥

२५६.
जरा मृत्यू भय सर्वांसी समान । तरी ते ब्राह्मण केवी म्हणे ॥१॥
यालागी विवेक धरोनी मानसी । ‘ ब्राह्मण ’ पदासी वोळखावे ॥२॥
मातापितृव्याचे जाळिले शरीरा । ब्राह्महत्या नरा केवी नोव्हे ॥३॥
बहेणि म्हणे देह ब्राह्मण तो नव्हे । विवेक - वैभवे विचारिता ॥४॥

२५७.
आता वर्ण हाची ब्राह्मण म्हणावा । तरी तो अनुभवा नये काही ॥१॥
ब्राह्मण वेगळा वर्णाही अतीत । पाहता निश्चित भासतसे ॥२॥
श्वेत तो ब्राह्मण क्षेत्री तो आरक्त । वैश्य वर्ण पीत नाही ऐसे ॥३॥
कृष्णवर्ण शूद्र नाही ऐसा भेद । आयुष्याचा नाद सारिखाची ॥४॥
बहेणि म्हणे वर्ण ब्राह्मण तो नव्हे । विवंचूनि पाहे मनामाजी ॥५॥

२५८.
आता ‘ याती ’ लागी म्हणावे ब्राह्मण । तरी ते निर्वाण नये चित्ता ॥१॥
निरसूनी सर्वही विचारा वेदाते । उरे ते आइते वोळखावे ॥२॥
ऋषी श्रृंगी झाला मृगाचिये पोटी । गौतम शेवटी कुशास्तरणी ॥३॥
जंबुक ऋषि तो जन्मला जांभुळी । वाल्मीकीची कुळी वारूळी ते ॥४॥
कैवर्तकी - पोटी व्यास तो जन्मला । विश्वामित्र जाला क्षेत्रणीचा ॥५॥
वसिष्ठाचा जन्म उर्वशी - उदरी । अगस्ति निर्धारी कलशोद्भव ॥६॥
नारद प्रसिद्ध ठाउका सर्वांसी । दासी ते तयासी प्रसवली ॥७॥
बहेणि म्हणे जाति नव्हेचि ब्राह्मण । ब्राह्मण्याची खूण वेगळीच ॥८॥

२५९.
आता म्हणो जरी ब्राह्मण पंडिता । न माने तत्त्वता मना तेही ॥१॥
जाणता विवेक निवडी तो बरा । ब्राह्मण तो खरा ज्ञानवंत ॥२॥
क्षेत्री वैश्य शूद्र ब्राह्मणादि सर्व । पांडित्य अपूर्व करिती अवघे ॥३॥
पद - पदार्थांचे करिती विवरण । सर्व वर्ण जाणे काव्यअर्थ ॥४॥
अविंधादिक ही करिती पांडित्य । ब्राह्मण या तथ्य कोण म्हणे ॥५॥
बहेणि म्हणे ऐसे वोळखावे जनी । ब्राह्मण निर्वाणी कोण ऐसे ॥६॥

२६०.
आता म्हणो जरी कर्म ते ब्राह्मण । चहू वर्णी जाण कर्म असे ॥१॥
म्हणोनी म्हणावे कर्मिक ब्राह्मण । आहे तेचि खूण वेगळीच ॥२॥
आपुल्याचि कर्मी वर्तताती वर्ण । तयासी ब्राह्मण म्हणो नये ॥३॥
बहेणि म्हणे कर्म विचारिता पाहे । ब्राह्मणत्व नोव्हे कर्मासी ते ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 22, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP