मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
१४७ ते १६०

निर्याणाचे अभंग - १४७ ते १६०

संत बहेणाबाईचे अभंग

१४७.
बहेणाबाई - रूक्मिणीची केली आम्ही बोळवण । आम्हासी प्रयाण त्याचि मार्गे ॥१॥
पाठवावे पत्र गोदेसी सत्वर । पडेल अंतर पुत्रपणा ॥२॥
टाकोनी सकळ काम धाम धंदा । मरणपर्यादा वाट पाहे ॥३॥
म्हणोनिया पत्र लिहिले तातडी । मरणाची गुढी उभी पुढे ॥४॥
तेराविया दिवसी ब्राह्मणभोजन । करोनि निघणे अति त्वरे ॥५॥
पडेल आक्षेप वाटेसी खोळंबा । टाकोनी विठोबा त्वरे येई ॥६॥
पाच दिवस पुढे देहांतसमये । रोधोनिया पाहे वाट वायु ॥७॥
आश्विनाची शुद्ध जाण प्रतिपदा । मरणमर्यादा सांगितली ॥८॥
बहेणि म्हणे पुत्रपणाचे उत्तीर्ण । होसील म्हणोन त्वरा करी ॥९॥

१४८.
विठ्ठल - बैसलो समस्त शुक्लेश्वरापासी । देखिले पत्रासी अकस्मात ॥१॥
वाचिले सत्वर निघालो तातडी । केली घडामोडी मनामाजी ॥२॥
आणावी जाऊन गोदातीरा माय । ऐसा ये उपाय करू आता ॥३॥
पाहोनिया स्थळ समाधीकारण । आलो मी धावून दर्शनासी ॥४॥

१४९.
बहेणाबाई - ऐकोनिया पत्र आलासी तातडी । घालोनिया उडी पुत्रराया ॥१॥
तेरावा दिवस केला रूक्मिणीचा । सद्गदित वाचा कंठ दाटे ॥२॥
जालासी उत्तीर्ण तूचि रे सर्वांचा । मने काय वाचा सर्वभावे ॥३॥
देखोनिया तुज संतोष वाटला । प्रेमाने दाटला कंठ माझा ॥४॥
मृत्यूचा संकल्प अश्विन शुद्ध प्रतिपदा । ऐक तू प्रसिद्धा सांगितला ॥५॥
खेद तो अंतरी न धरावा कदा । सांगता मर्यादा नुल्लंघावी ॥६॥
पुत्रपण तुझे आजी आले फळा । माझे अंतकाळा पावलासी ॥७॥
बहेणि म्हणे आता विचारी जे बाळा । साशंकता प्रबळा नको ठेवो ॥८॥

१५०.
विठ्ठल - अंतरीची साक्ष जाणिजे अंतरे । माय तू निर्धारे सद्गुरूही ॥१॥
देखियेले स्वप्न कचेश्वरी माये । विमान हे पाहे तुज आले ॥२॥
शंख भेरी नाना वाजताती वाद्ये । गर्जती आनंदे नामघोषे ॥३॥
शंख चक्र गदा अंकित वैडूर्य । करिती उत्छाव नानापरी ॥४॥
मृदंग वाजती टाळघोळ कथा । पताका अनंता गरूडटके ॥५॥
ब्राह्मणांचा थाट पुढे मागे लोक । माळा गळा देख तुळसीच्या ॥६॥
मिरवत विमान देखियेले स्वप्नी । आनंद हा मनी थोर वाटे ॥७॥
उधळती बुका गंधाक्षता हाती । ब्राह्मणांच्या पंक्ती नानापरी ॥८॥
देखियेले जना उत्छाव या मना । थोर झाला स्वप्नामाजी पाहे ॥९॥
उठोनी प्रातःकाळी आली मना साक्ष । स्वप्न हे प्रत्यक्ष नव्हे मिथ्या ॥१०॥
बैसलो समस्त कचेश्वरापासी । देखिले पत्रासी अकस्मात ॥११॥
वाचुनी सत्वर निघालो तातडी । केली घडामोडी मनामाजी ॥१२॥
आणावी जाऊनी गोदातीरा माय । ऐसाची उपाय करू आता ॥१३॥
वंदुनी चरण उभा असे पुढे । मनातील गूढ जाणसी तू ॥१४॥
शुक्लेश्वरापासी मागितले स्थळ । आज्ञा ते केवळ तुझी आता ॥१५॥

१५१.
बहेणाबाई - ऐकियेले तुझे वचन सादर । तुवा जो निर्धार केला असे ॥१॥
मानले माझिया स्थळ जाण चित्ता । परि ऐक आता एक माझे ॥२॥
नाही अवकाश ते स्थळी जावया । मृत्यूच्या सध्यालागी पाहे ॥३॥
प्रतिपदे आम्हा टाकणे शरीर । आजि तो साचार त्रयोदशी ॥४॥
यालागी निश्चय सांगतसे एक । तीर्थ आम्हा देख प्रणिता असे ॥५॥
रावणे रे येथे केले अनुष्ठान । शंकर प्रसन्न येथे जाला ॥६॥
वाहियेली शिरे नवही पुजेसी । सहस्त्र अठ्यायसी ऋषी आले ॥७॥
ब्रह्मादिक देव यज्ञाच्या सन्निध । तीर्थ हे प्रसिद्ध शिवपूर ॥८॥
अवभृथस्थानी वरद तयांचा । समूह तीर्थांचा येथे असे ॥९॥
प्रणिता तीर्थाऐसे तीर्थ भूमंडळी । नाही चंद्रमौळी बोलिलासे ॥१०॥
काशी गया तीर्थ सर्व याची स्थळी । मानुनी सकळी स्थान कीजे ॥११॥
आमुचे मनीचा निर्धार हा खरा । माझिया अंतरा साक्ष आली ॥१२॥
तुवा हे वचन वंदुनी मस्तकी । असावे स्वस्थ की होवोनिया ॥१३॥
बहेणि म्हणे पुत्रा सांगितले मनी । धरूनी वचनी सिद्ध राहे ॥१४॥

१५२.
तीर्थ - देव - यात्रा वर्तता स्वधर्म । तुझे माझे जन्म गेले बारा ॥१॥
तेरावा हा जन्म पुत्रपणे जाला । नाही तुझी तुला आठवण ॥२॥
तेरा जन्म तुझा माझा असे संग । अद्वय अभंग एकनिष्ठ ॥३॥
संभवता तुज मज जाली कृपा । वोळखी ते बापा सांगितली ॥४॥
पतिव्रता धर्म आमुचा सांगाती । बोलता ते गति ग्रंथ वाढे ॥५॥
ज्ञानेश्वरी पूर्ण पहावी हे जाली । आता ते उरली दशा थोडी ॥६॥
बहेणि म्हणे आता नाही जन्म घेणे । उठले धरणे वासनेचे ॥७॥

१५३.
गोदा भागीरथी यमुना सरस्वती । तापी भोगावती सर्व तीर्थे ॥१॥
येती प्रणितेसी माझ्या अंतःकाळी । निश्चळ अंतरी राहे पुत्रा ॥२॥
कृष्णा, तुंगभद्रा, भीमा, फल्गु, रेवा । पुष्कर ही सर्वा पृथिवीची ॥३॥
दैवतेही सर्व येती तये वेळी । मृत्यु हा अनुभवे तुज तेव्हा ॥४॥
ऋषिगण सर्व पांडुरंग उभा । जेव्हा मृत्युसभा येईल ते ॥५॥
बहेणि म्हणे तुज वाटेल असत्य । सांगते ते तथ्य ऐक आता ॥६॥

१५४.
आत्मज्ञाना ऐसे तीर्थ कोण दुजे । ज्ञानिया उमजे पूर्व पुण्ये ॥१॥
जेथे मानस केले असे शुद्ध । तीर्थ हे प्रसिद्ध वेदशास्त्री ॥२॥
तयाच्या मज्जने जन्म गेले बारा । शुद्ध ते अंतरा करावया ॥३॥
तेरावा हा जन्म लाधले साधन । तया तीर्थीं स्नान जन्म नाही ॥४॥
केले वो प्रयास साधनाचे कष्ट । होते योगभ्रष्ट म्हणोनिया ॥५॥
वासना मळिन शुद्ध जाली येथ । ज्ञानियासी तीर्थ तेची खरे ॥६॥
वृत्ति शून्य होय मानस ते ज्ञानी । तीर्थ सर्वांहूनी श्रेष्ठ तेची ॥७॥
विचारोनी बरे पाहे तू अंतरी । बाह्य तीर्थांतरी हेत नाही ॥८॥
बहेणि म्हणे वृवि जालीया निमग्ना । तीर्थाची ते संज्ञा तेची खरी ॥९॥

१५५.
अंतकाळ वेळे होईल निरभ्र । दिशा होती शुभ्र पाहे का रे ॥१॥
घेई याची साक्ष आपुले अंतरी । राहुन निर्धारी आपुलिया ॥२॥
येऊ निघाले तीर्थासी विमान । हेलावे ते जाण तीन येती ॥३॥
दग्ध जालियाने अस्तंगत देहे । पुत्रा तूची पाहे मनामाजी ॥४॥
बहेणि म्हणे तुम्ही धरोनि विश्वास । पहा साक्ष यास तुकाराम ॥५॥

१५६.
विठ्ठल - ऐक एक माते संदेह मानसी । वाटला तयासी कोण फेडी ॥१॥
गणगोत आम्हा मायही सद्गुरू । मनीचा निर्धारू जाणसी तू ॥२॥
‘ बारा जन्म मागे साधलिया ज्ञान । आता माझे मन स्थिरावले ’ ॥३॥
याचे काही मज नकळे सर्वथा । आशंका हे आता फेडी माझी ॥४॥
जाणसी अंतर मनीचा तू हेत । आहेचि ते चित्त साक्ष तुझे ॥५॥
पूर्वानुक्रमे जन्म ते सांगिजे । माते कृपा कीजे येक वेळा ॥६॥

१५७.
बहेणाबाई - ऐक सावधान पुत्रा तू वचन । बोलो नये मौन सांगतसे ॥१॥
न बोलावे कोणा न सांगावे गुज । साक्ष माझी मज आली असे ॥२॥
न सांगता तुज खेद हो वाटेल । हेतही तुटेल अंतरीचा ॥३॥
बहेणि म्हणे कदा न सांगावे जना । ऐकोनिया मना हेत फेडी ॥४॥

१५८.
बेटाऊद तापी - तीरी तेथे वेश्य । सांभवाचा दास केदार होता ॥१॥
त्यासी नाही कन्येचे संतान । केले अनुष्ठान महाउग्र ॥२॥
शंकर प्रसन्न करूनिया तेणे । स्वप्नगत येणे जाले हरा ॥३॥
पुत्र नाही तुज होईल संतान । एक कन्या जाण रूपवती ॥४॥
वारूणी हे नाम ठेवावे तियेसी । वाचेल सायासी वर्षे तेरा ॥५॥
केदार वैश्यासी रूपवंती नाम । स्त्रिया ते उत्तम पतिव्रता ॥६॥
पतीचे वचन तियेसी प्रमाण । शांभवी ते जाण दीक्षा तिची ॥७॥
रूपवंती गर्भ धरी तिये वेळा । जन्म मज दिला महारूद्रे ॥८॥
पूर्वील संस्कार होता काही शुद्ध । जन्मता प्रसिद्ध कळो आला ॥९॥
जन्मलिया मज वर्षाचिया पोटी । पहाताची दृष्टी वदन माझे ॥१०॥
’आणिला सद्गुरू केदारे आपुला । तयाते दाविला भाव माझा ॥११॥
नाही लग्न करू दिधले आपण । माझा सहज गुण वोळखिला ॥१२॥
दिधली ते दीक्षा शंकराचा मंत्र । जपे अहोरात्र खेळताही ॥१३॥
खेळता देऊळी शंकराची मूर्ती । करीतसे भक्ति प्रेमरसे ॥१४॥
नावडेची काही आणिक सर्वथा । अखंडता चित्ता लागलीसे ॥१५॥
ऐसी तेरा वरूषे होताची संपूर्ण । जाले ते दर्शन तुझे येथे ॥१६॥
सद्गुरू आमुचा तेथे तू सेवक । जैसे एक रंग पोटासाठी ॥१७॥
माझे मुखे पुत्र घेतले रे तुज । अंत हा रे मज जाला तेव्हा ॥१८॥
तयापुढे दुसरा जन्म म्या घेतला । ऐक बा वहिला एकचित्ते ॥१९॥
बहेणि म्हणे पहिल्या जन्मांचे हे मूळ । आणिक केवळ सांगतसे ॥२०॥

१५९.
आणिक सांगेन पूर्वील वृत्तांत । सावधान चित्त असो तुझे ॥१॥
तीन जन्म माझे वैश्याचे कुळी । साधनाच्या भेळी भोगियेले ॥२॥
एक जन्म तुज सांगितला आता । पुढिली वेवस्था सांगेन ते ॥३॥
‘ कुमचक्र ’ ग्राम फल्गूचिये तीरी । सात्त्विकाच्या घरी जन्म आम्हा ॥४॥
स्वधर्मी तो वैश्य शंकराचा भक्त । अत्यंत विरक्त आत्मवेत्ता ॥५॥
तयाचा सद्गुरू सुवर्मा ब्राह्मण । आगमीचे पूर्ण ज्ञान तया ॥६॥
मंत्रविद्येमाजी असोनि प्रवीण । आत्मज्ञानी पूर्ण हेत तया ॥७॥
तयाचा तू शिष्य सात्त्विक हा भोळा । पुत्र ते तयाला सात होते ॥८॥
कन्येसाठी थोर उद्विग्न मानसी । सद्गुरूने त्यासी सांगितले ॥९॥
अनुष्ठानविधी मंत्र उपासना । सांगेन ते धारणा वैष्णवीची ॥१०॥
तये वेळी स्वप्न होउनी तात्काळ । कन्या ते सुशील सदैव घेई ॥११॥
तिच्या हाते तुज सापडेल धन । न करूनी लग्न जाईल ते ॥१२॥
अठ्ठावीस वर्षे क्रमील तुजपाशी । आगर भक्तीसी करूनिया ॥१३॥
मग तेथे जन्म घेतला आपण । तुझा संग जाण तेथे होता ॥१४॥
गुरूबंधू मज तेथे जोडलासी । सहवासे अससी निरंतर ॥१५॥
बहेणि म्हणे ऐसा जन्म हा दुसरा । आणिक तिसरा पुढे सांगू ॥१६॥
१६०.
सांगेन ते ऐक जन्मांतर कथा । जेणे तुजचित्ता सुख वाटे ॥१॥
गोदावरी जेथे प्रगट ब्रह्मगिरी । वैश्य क्रमील तुजपाशी ॥२॥
नाम हो तयाचे वर्धमान शेटी । धनवंतात कोटी दानपुरूष ॥३॥
तयाची हे भाज भामिनी सुंदरा । पतिव्रता खरा धर्म तिचा ॥४॥
तीन पुत्र तिसी चौथा तू पाळक । होउनी बाळक अससी तेथे ॥५॥
धन्य धान्य द्रव्य गायींची गोठणे । नसे काही उणे घरी तया ॥६॥
वर्धमान शेटी सर्वांमाजी श्रेष्ठ । जाला स्थानभ्रष्ट एक वेळा ॥७॥
येउनी पांचाळी करी अनुष्ठान । यज्ञ तो संपूर्ण थोर केला ॥८॥
तयाचा हा हेत कन्या व्हावी मज । भामिनी सहज रूपवंती ॥९॥
तियेचे हे पोटी जाले मी निर्माण । माझे नाम जाण हेमकळा ॥१०॥
तयासी संतोष देखोनी वाटला । दानधर्म केला यथाक्रमे ॥११॥
लग्नविवंचना करी वर्धमान । तव जाले स्वप्न भामिनीसी ॥१२॥
लग्न करू नको इये कन्यकेचे । रूप वरक्तीचे हेमवती ॥१३॥
रागकला नाम ब्राह्मणाची सेवा । आठवी केशवा सर्व काळ ॥१४॥
तेथेही संगती जाली तुज मज । आंतरीचे गूज तुज सांगे ॥१५॥
वर्षे ते चोवीस आयुष्यमर्यादा । सारूनी स्वानंदा देह गेला ॥१६॥
ऐसे तीन जन्म वैशाचिये याती । घेवोनी विरक्ती वर्तिन्नले ॥१७॥
बहेणि म्हणे आता चौथा जन्म ऐक । करोनि विवेक सुखे राहे ॥१८॥


N/A

References : N/A
Last Updated : February 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP