मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
३२८ ते ३४४

श्लोक - ३२८ ते ३४४

संत बहेणाबाईचे अभंग

३३८.
गुरूकृपा जरि पूर्ण असे जया । शरण त्या श्रुतिशास्त्रकथा तया ॥ हरिहरादिक किंकर दास हे । म्हणतसे बहेणि कवतूक हे ॥१॥
असे ते गुरू रे मना वोळखावे । अशाचे बरे दास्य भावे करावे ॥ जेणे ज्ञानतत्त्वार्थ साधे स्वभावे । म्हणे बहेणि त्या सद्गुरू शरण जावे ॥२॥
गुरू तो खराजो बरा ज्ञाननिष्ठ । स्वधर्म - क्रिया पाळी जो वेदनिष्ठ ॥ जया ज्ञानतत्त्वार्थ शुद्ध प्रकाशे । म्हणे बहेणि ज्या ब्रह्म सर्वत्र भासे ॥३॥
गुरू गुरू करिताति कलीवरे । विषयसंभरणी बहु आस रे ॥ उकिरडा फिरती जशि सूकरे । म्हणतसे बहेणि त्रिमिरा भरे ॥४॥
जेथे ज्ञानवैराग्य भक्ती ठसावे । क्षमा शांति देही दया हे विसावे ॥ दिसे ब्रह्मचर्य स्व - आंगासि आले । म्हणे बहेणि तो सद्गुरू स्वभावे ॥५॥
निजगुरू निजदाता भेटता कोण चिंता । भवतमशमकर्ता शोकसंतापहर्ता ॥ त्रिभुवनिसुखदानी भक्तदासाभिमानी । म्हणतसे बहेणि तो रामतूका निदानी ॥६॥

३३९.
गुरू गुरू अवघे जाले । उपदेश मांडिले । सद्गुरूकृपेचा न कळे । महिमा कोण ॥१॥
नानापरीचे ज्ञानध्यान । सांगती जपतप अनुष्ठान । परि ते सद्गुरू - लक्षण । अगम्य जाणा ॥२॥
अगमनिगमधार । एक ते जारणाधिकारी । चुकोनिया जाले वैरी । देवाचे कैसे ॥३॥
नाना मंत्र उपासना । सांग यंत्रधारणा । परी ते सद्गुरूचरणा । न पावती कोन्ही ॥४॥
बहेणि म्हणे आता वाया । जन्म का करावा जाया । भजावे श्रीगुरूच्या पाया । सर्वहि सिद्धि रे ॥५॥

३४०.
गुरू ते जाणावे समुद्रासारिखे । कदाकाळी देखे नुचंबळती ॥१॥
ऐसे ते जाणावे सद्गुरू वेव्हारे । कल्पांती न सरे निजधन ॥२॥
संत जे जाणावे धैर्यमेरूपरी । पडता नभ वरी ढळती ना ॥३॥
संत ते जाणावे वैराग्य विरक्ति । तिळ ते ज्ञानघन ॥४॥
संत ते जाणावे पूर्ण वेदमूर्ती । कर्मब्रह्मस्थिति ठसावली ॥५॥
संत ते जाणावे वैराग्य विरक्ति । तिळ ते आसक्ति विषयी नाही ॥६॥
संत ते जाणावे उदासीन वृत्ति । द्वंद्वातीत मूर्ति लीनरूपी ॥७॥
संत ते जाणावे क्षमेचे सागर । दयेचे आगर शांतिवेषे ॥८॥
भूतकृपा वसे ब्रह्म सर्व अस । संत ते मानसे वोळखाव ॥९॥
तीर्थ यात्रा देव करिती उत्छाव । तेचि संत राव कलीमाजी ॥१०॥
आहारी वेव्हारी इंद्रियांचे द्वारे । युक्त जे निर्धारी तेचि संत ॥११॥
बहेणि म्हणे ऐसी गुरूची पारखी । शोधूनिया सुखी होय शिष्य ॥१२॥

३४१.
स्वरूप स्थितीचे ज्ञान । वेगळे ते लक्षण । पहावे पै आत्मज्ञान । स्वरूप - स्थिती ॥१॥
पंचीकरण महावाक्य । पहावे उपनिषदभाग । स्वरूपस्थितीचे पै अंग । कळेल तेव्हा ॥२॥
धरावी हे उपासना । आठवावे नारायणा । न सोडावे गुरूचरणा । साधन हेची ॥३॥
नित्य हे सारावे कर्म । जया जैसा वर्णधर्म । नैमित्य सारावा राम । स्वरूप - स्थिती ॥४॥
बहेणि म्हणे शांती क्षमा । वोळावी भूतकृपा जाणा । दया पाहिजे करूणा । भगवंत तोची ॥५॥

३४२.
वरि वरि वेष संताचा । भीतरी धुमकस इंद्रियांचा ॥१॥
ऐसे संत जाले कली । बोले बोल तो न पाळी ॥२॥
सभा देखोनी धरी मौन । मागे भुंके जैसे श्वान ॥३॥
तोंड देखोनी बरवे बोले । मागे जगझोडीचे चाळे ॥४॥
बहेणि म्हणे हे भांड । अशास कोठे व्याली रांड ॥५॥

३४३.
लटिक्याचे अवंतणे जेविलिया साच । तयाचा विश्वास काय खरा ॥१॥
ऐसे शब्दज्ञान सांगती उदंड । करणीचे लंड मतवादी ॥२॥
खांबसूत्री खोडे राऊत नाचती । काय ते झुंजती रणामाजी ॥३॥
दश अवतारी दाखविती सोंगें । काय होती अंगे रामकृष्ण ॥४॥
बहेणि म्हणे तैसे लटकियाचे जिणे । दिसे लाजिरवाणे बोलताची ॥५॥

३४४.
सद्गुरूचे नाम नाही ज्याचे मुखी । तो जाणावा सुतकी सर्व काळ ॥१॥
ऐसे ते जाणावे गुरूद्रोही अभक्त । केला तो परमार्थ वाया जाय ॥२॥
सद्गुरूचा महिमा न बोले वो वाचे । पूर्वज तयाचे अधोमुख ॥३॥
सद्गुरूपदाचे न करी उच्चाटण । जाणावे ते श्वान जन्मा आले ॥४॥
कुलगुरू कुलदेव विद्या जो शिकवी । त्यासी तो नाठवी तो अन्य - बीज ॥५॥
माता आणि पिता सद्गुरू भयहर्ता । त्यासी नाठविता पातकी तो ॥६॥
जाती पै विजाती गुरू हो का कोन्ही । लोपी जो या जनी हत्या त्यासी ॥७॥
बहेणि म्हणे आम्हा गुरू ‘ तुकाराम ’ । सदा नाचो प्रेमगीती गाता ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : February 22, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP