मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
११ ते २०

संत बहेणाबाईचे अभंग - ११ ते २०

संत बहेणाबाईचे अभंग

११.
रहेमतपुरी सर्व जाउनी राहिलो । आवघीच लागलो भिक्षा करू ॥१॥
भ्रतार तो थोर स्नानसंध्या करी । देव तयावरी कृपावंत ॥२॥
तेथील उपाध्या ग्रामीचा ग्रामस्थ । जावया उदित वाराणसी ॥३॥
ग्रामीचा वेवहार चालावयालागी । भ्रतार विभागी गेला तेणे ॥४॥
आपण काशीस जाऊनी तुम्हासेसे । उपाध्या ज्योतिषी रत्नाकर ॥५॥
देखोनी नेटका शहाणा विद्यावंत । सर्वही गृहस्थ तया पुसे ॥६॥
तेही केले मान्य मग मग तेथे राहो । वरुषाचा निर्वाहो येथे जाला ॥७॥
त्यावरी तो जाण आलीया ग्रामासी । रक्षिले आम्हासी वर्ष येक ॥८॥
ऐसे वरुष अकरा जालीया मजलागी । वाटे संतसंगी असावेसे ॥९॥
कथा आइकावी पुराण - श्रवणी । ब्राह्मणपूजनी चित्त रिझे ॥१०॥
तेथुनी प्राक्तने वोढोनिया जाण । तेत स्थळ त्यागून चालियेलो ॥११॥
उदास आंतर नावडेचि काही । प्रक्तनासी नाही उपाय तो ॥१२॥
बहेणि म्हणे पुढे कोल्हापूर क्षेत्र । जे अति पवित्र तेथे गेलो ॥१३॥

१२.
हिरभंट एक ब्राह्मण वेदांती । दोही शास्त्री गती यजुर्वेदी ॥१॥
थोर भाग्यवंत पवित्र अग्निहोत्र । विद्यार्थी सर्वत्र पठन करिती ॥२॥
तयाचिये गृही पाहोनिया स्थळ । राहोनी निश्चळ श्रवण होय ॥३॥
“ जयराम गोसावी ” त्याची हरिकथा । नित्य भागवता श्रवण करू ॥४॥
बहेणि म्हणे तेथे करोनिया बास । सदा निजध्यास आत्मचर्चा ॥५॥

१३.
कोण्हि येक वेळे आठराव्या वरुषात । सोमवारी व्रत थोर आले ॥१॥
हिरभंट यासी गोदान दिधले । द्विमुखी पाहिले यजमाने ॥२॥
काली ते कपिला काळे तिचे वस्त्र ( वच्छ ) । प्रदक्षणे पुच्छ निवेदिली ॥३॥
सुवर्णाची शृंगे रुपियाचे खूर । वर पीतांबर पांघुरिला ॥४॥
सर्व उपचारे गोदान दिधले । पाहावया आले सर्व जन ॥५॥
उपजोनिया वत्स गाय नेली घरा । वत्स पीत क्षीरा दोहाचिया ॥६॥
जाले दिवस दहा अकराव्या दिनी । हिरंभटा - स्वप्नी द्विज बोले ॥७॥
ब्राह्मण हा तुझे आहे वोसरीस । कपिला तयास निवेदिजे ॥८॥
स्वप्न परी साचे केले हिरंभटे । भ्रतारासी निष्ठे गाय दिल्ही ॥९॥
आनंदले मन सर्वाचेही जाण । गाई - सुश्रूषण घडे आम्हा ॥१०॥
नित्य मायबाप जाती तृणालागी । पाळिती प्रयोगी जाण तोषे ॥११॥
गाईचे ते वत्स तेही पै कपिला । माझ्या ठाई तिला हेत बहु ॥१२॥
मीच सोडी तरी वत्स रिघे दोहा । करिता दोहावा सवे माझी ॥१३॥
मीच पाणी पाजी तृण घाली मीच । मजविण कांची मनी वाहे ॥१४॥
मी जाय पाणिया वोरडे ते वत्स । गाय वाय पुच्छ सवे चाले ॥१५॥
करुनीया लोक नवलची राहाती । उगेच पाहाती कंस गाई ॥१६॥
मोकळेचि वत्स असोनिया जाण । न वचे आपण गाईपाशी ॥१७॥
तृण घाली तरी भक्षिनी आपण । पाजिल्या जीवन तेव्हा पिती ॥१८॥
रात्रीच्या अवसरी वत्स निजे सेजे । पुराणी ते फुंजे श्रवणकाळि ॥१९॥
कथेपासी जाय सवे तेहि येत । उभेची निवांत कथा ऐके ॥२०॥
गाय गोठा गह्री आपण कथेसी । जता मी स्नानासी सवे चाले ॥२१॥
करिती अपूर्व हे तुझे समंधी । लोक नाना शब्दी बोलताती ॥२२॥
कोण्ही म्हणे आहे योगभ्रष्ट वत्स । कोणी म्हणती नष्ट सवे इची ॥२३॥
कोण्ही म्हणती जन रिणादत इचे । रीण फिटे तिचे तैच सुटे ॥२४॥
ऐसे नानापरी वत्स ते न सोडी । मजही ते आवडू तयापासी ॥२५॥
न देखता वत्स हितु तळमळी । उदकेवीण मासोळी तैसे वाटे ॥२६॥
दळिता कांडिता वाहताही पाणी । वत्सेविण जनी नावडे हो ॥२७॥
भ्रतार रागीट नावडे की तया । परी त्यासी माया मनी आली ॥२८॥
म्हणे ‘ असो तुज नाही मूलबाळ । हाचि तुझा खेळ जाण मनी ॥२९॥
तुजही आवडी कथा - पुराणाची । संगती फुकाची तुज जाली ’ ॥३०॥
तव तये वेळे जयराम गोसावी । तेथे तो स्वभावी सहज आले ॥३१॥
कथा घरोघरी ब्राह्मणाची पूजा । संतर्पणे द्विजा आरंभिली ॥३२॥
रात्री कथा हेती दिवसाही करिती । मायबापे प्रीती पाहाती ते ॥३३॥
तेथे तया संगे मीही जाय कथे । वत्सही ते तेथे सवे चाले ॥३४॥
जेथे बैसे माय तेथे मी आपण । वत्सही धावोन सवे उभे ॥३५॥
हागेना ते मुते उभेचि श्रवणे । आइके कीर्तन नामघोष ॥३६॥
आरती जालिया नमस्कार होती । आपणही क्षिती ठेवी डोके ॥३७॥
देखोनिया जन हासती सकळ । परि ते प्रेमळ आल्हादची ॥३८॥
म्हणती योगभ्रष्ट पूर्वील हरिभक्त । गोवेषे विरक्त पहा कैसे ॥३९॥
तव येके दिवसी मोरोपंते कथा । करावया भक्ता पाचारिले ॥४०॥
दिवस येकादशी प्रहरा दो हरिकथा । मांडीली तत्त्वता महानंदे ॥४१॥
जयराम गोसावी शिष्य - समुदायेसी । बैसला सभेसी आसनी ते ॥४२॥
टाळ मृदंगेसी होतसे गायन । मिळाले जन सर्व तेथे ॥४३॥
तेथे आपणही मायबाप बंधू । कथा परमानंदू पाहातसे ॥४४॥
समागमे वत्स मजपासी बैसले । लोकी त्यासी नेले दारवंटा ॥४५॥
म्हणती स्थळ नाही बैसवया जना । पशू हे श्रवणा काय योग्य ॥४६॥
मी रडो लागले वत्सलागी तेथे । तव झाले श्रुत गोसाविया ॥४७॥
वोरडता वत्स मज येथे रडता । सांगती अवस्था स्वामीवासी ॥४८॥
म्हणती ‘ येक मुली हिरंभटघरी । ते आली श्रीहरी - कीर्तनासी ॥४९॥
तिजसवे येक वत्स असे त्यासी । सांगाते तयासी हिंडविते ॥५०॥
ते वत्स बाहेरी घातिले अडचणी । त्यालागी ते रुसुनी रडत असे ॥५१॥
ते वत्स आरडत बाहेरी तिष्ठते । रडत हे येथे गलबला ॥५२॥
साक्ष अंतरीचा तो स्वामी जयराम । वत्सआंतर्याम वोळखिले ॥५३॥
म्हणे “ आणा त्यासी वत्साचे आंतरी । काय नाही हरी आत्मवेत्ता ॥५४॥
कथेलागी होतो जीव कासावीस । पशू की तयास म्हणो नये ” ॥५५॥
आणविले वत्स बैसविले आसनी । पाहोनी नयनी तोष वाटे ॥५६॥
मजही कृपावंत कृपेचिये शब्दे । बोलावी प्रारब्धे पूर्व - पुण्ये ॥५७॥
कुर्वाळोनी दोघा पाहे पूर्ण दृष्टी । न मानेचि गोष्टी जनालागी ॥५८॥
कथा होत असे गजर महाथोर । चित्त हे निर्भर वैष्णवाचे ॥५९॥
जयराम गोसावी याचे मनोगत । पुण्यसीळ सत्य उभयवर्गे ॥६०॥
कथेमाजी वत्स उभेचि तिष्ठत । रूपी सर्व चित्त आणुनिया ॥६१॥
हे मुली लहान वय इचे थोडे । श्रवण हे आवडे नवल मोठे ॥६२॥
म्हणे इचे कोण्ही आहे ये कथेसी । मायबाप तिसी सांगितला ॥६३॥
भ्रतारही इचा आहे बहु योग्य । परि इचे वैराग्य थोर दिसे ॥६४॥
मायबापासवे येतसे पुराणी । वत्सही घेउनी समागमे ॥६५॥
मग म्या आपुले आपण पाहिले । चरणी घातले लोटांगण ॥६६॥
वत्सही तैसेची पायावरी पडे । अपूर्वता घडे सर्व जना ॥६७॥
वाम सव्य दोन्ही होतो दोघे जण । वत्सा मज तेणे उठविले ॥६८॥
कथा संपलिया लोक गेले सर्व । परि हे अपूर्व म्हणती जन ॥६९॥
हिरंभट आणि आणिकही जन । म्हणती हे चिन्ह कोण कळा ॥७०॥
बहेणि म्हणे ऐसे कोल्हापुरी होये । पुढीलहि सोय तुम्हा सांगो ॥७१॥

१४.
पिता - माता - बंधू - समवेत बिर्‍हाडी । पावले ते घडी वत्सयुक्त ॥१॥
दोन घटिका रात्री होती ते समई । वत्स तये गाई पाजियेले ॥२॥
हिरंभटी स्नान केले अग्नीसेवे । कार्तिकाचे दिवे आकाशात ॥३॥
सडे संमार्जन केले स्नान तेथे । गौचे शृंग होते कर्वाळिले ॥४॥
भ्रताराने स्नान केले आपुलिया । दक्षिणेची गया कोल्हापूर ॥५॥
तव कोण्ही एक निराबाई होती । तिने कथास्थिती सांगितली ॥६॥
भ्रताराचे कानी कथेतील सर्व । सांगाया अपूर्व म्हणोनिया ॥७॥
वत्साचे वृत्तांत माझेही रुदन । भ्रताराचे कान तृप्त केले ॥८॥
जयराम गोसावी विदेही अवस्था । तेणे हात माथा ठेवियेला ॥९॥
थोर याचे भाग्य तो यासी बोलिला । आसीर्वाद दिल्हा योग तेणे ॥१०॥
जातीचा भिक्षुक आला बहुत राग । धावला सवेग गृहाप्रती ॥११॥
धरूनिया वेणि मारिले यथेष्ट । हिरंभटा कष्ट फार जाले ॥१२॥
नावरे मारिता गायही वोरडे । वत्सही ते रडे कासाविस ॥१३॥
आठराव्या वरुषात मज होते तेथे । काय मी की सेवा आंतरले ॥१४॥
मायबाप बंधू न बोलती काही । भ्रतारे क्रोधही आवरिला ॥१५॥
शांत जालियाने पुसती तयास । स्त्रियेवरी त्रास कासयाचा ॥१६॥
येरु म्हणे रात्री कथेत प्रतिष्ठा । काय यांची निष्ठा देखियेली ॥१७॥
कैचे हे पुराण कैची हरिकथा । मारीन अन्यथा नव्हे येथ ॥१८॥
इतुके बोलोनिया भ्रतार पुनरपि । क्रोध तो नाटोपी अग्निऐसा ॥१९॥
बहेणि म्हणे तेव्हा देह संकल्पिले । प्राक्तनाचे केले कोण वारी ॥२०॥

१५.
आले मना तव मारिले बळकट । बांधोनिया मोट टाकियेली ॥१॥
हिरंभट म्हणे व्हा तुम्ही बाहेरी । हा दिसे हत्यारी चांडाळ की ॥२॥
मग मातापिता हिरंभटालागी । प्रार्थुनिया वेगी स्थिर केले ॥३॥
म्हणती कृपा करा आजि दिसभरी । प्रातःकाळि दुरी ठाव पाहो ॥४॥
तयावरी वत्स गाय दोघे जण । न खाती की तृण जळेसहित ॥५॥
देखोनी वत्सासी गाईची वृत्तांत । मोट तो सोडित तये वेळी ॥६॥
आणिले जवळि गाई वत्सापासी । हुंबरली जैसी पुत्र माता ॥७॥
आपण देखिले वत्स आणि गाय । म्हणे प्राण जाय तरी बरा ॥८॥
बहेणि म्हणे तया तृण पाणी पाजी । न घेती ते माझी थोर माया ॥९॥

१६.
न खाती ते तृण न घेती जीवन । आपणही अन्न टाकियेले ॥१॥
नुठती सर्वथा स्वस्थळापासुन । येती सर्वजन पाहावया ॥२॥
जयराम स्वामीस सांगितले जनी । पाहावया निर्वाणी तेही आले ॥३॥
भ्रतारे तयासी केला नमस्कार । आपुले अंतर एकनिष्ठ ॥४॥
घातले आसन जयराम स्वामीस । हिरंभटी त्यास पूजियेले ॥५॥
मिळोनिया लोक पाहाती लोचनी । स्वामीही ते क्षणी आनंदले ॥६॥
म्हणती “ ब्राह्मण तू इचा भ्रतार । सांगतो निर्धार ऐक चित्ते ॥७॥
योगभ्रष्ट इची साधने बळकट । तू रे ईस कष्ट करू नको ॥८॥
स्वधर्मेची तुझी करील हे सेवा । उद्धरील जीव आपुलिया ॥९॥
तुझे काही पदरी पूर्वील सुकृत । तेणे हा सांगता प्राप्त जाला ॥१०॥
गाई आणि वत्स हे इचे सांगती । अनुष्ठानी होती ऐक्यभावे ॥११॥
इचा हेच गुरु हे इचे साधन । तोडील बंधन आपुले हे ॥१२॥
इच्या समागमे करिती जे वास । तेही भक्तिरस घेती सुखे ॥१३॥
आइकसी तरी बरे होय तुझे । येथे काय माझे बळ आहे ” ॥१४॥
बहेणि म्हणे ऐसे बोलोनी जयराम । पाहे मनोरम सर्व चिन्हे ॥१५॥

१७.
स्वस्थाना आपण चालिले जयराम । शिष्यांचा संभ्रम फार होता ॥१॥
म्हणती जयराम “ आनुष्ठानी तिघे । पूर्विल्या प्रसंगे येकनिष्ठ ॥२॥
आंतराय काही आनुष्ठानी राहिल्या । गाई या जन्मल्या पुण्यवेषे ॥३॥
हे मुली संपूर्ण आहे आनुष्ठान । चित्तशुद्धि जाण ईस आहे ” ॥४॥
ऐसे परस्परे बोलती उत्तरे । हे कानी सादरे आईकिली ॥५॥
बहेणि म्हणे गेले स्वामी स्वस्थानासी । मागील वृत्तांतासी जाण सांगो ॥६॥

१८.
द्वादशी क्रमोनी त्रयोदशी आत । वत्सासी देहान्त - समय आला ॥१॥
तेथे हिरंभट बोलियेला श्लोक । सहज स्वाभाविक ‘ मूकं करोति ’ ॥२॥
पूर्वार्ध श्लोकाचा सरताचि जाण । बोलिले आपण वत्स तेव्हा ॥३॥
‘ यत्कृपा तमहं वंदे ’ बोले शब्द । श्लोक - उत्तरार्ध वत्स बोले ॥४॥
आइकिला सर्व लोकी तो श्लोकार्ध । करिती संवाद परस्परे ॥५॥
तव त्या वत्साने टाकियेला प्राण । आले मी धावोन तयापासी ॥६॥
प्राणासवे प्राण जाऊ पाहे माझा । प्राक्तनासी दुजा प्रयत्न नाही ॥७॥
गाय हुंबरडे दोहीवरी मान । टाकी परी जाण शब्द कैचा ॥८॥
बहेणि देह प्राक्तने राखिले । पुढे काय जाले कोण जाणे ॥९॥

१९.
जयराम स्वामीस कळला वृत्तांत । वत्सासी त्या अंतकाळ जाला ॥१॥
श्लोकार्ध म्हणोनि प्राण वत्स त्यजी । योग लाजला जी तयापुढे ॥२॥
मग सर्व श्रेष्ठ संत साधुजन । करीत कीर्तन वत्स नेले ॥३॥
दिंडी पताकाने मिरविले वत्स । गाय सवे तुज्च्छ मानी देह ॥४॥
हुंबरडा हाणोनी चाले मागे मागे । गाय अंतरंगे महादुःखी ॥४॥
 पुरूनिया वत्स आले सर्व जन । करूनिया स्नान गृहा गेले ॥५॥
गाय वत्सापासी जाउनी हुंबरे । मागुती ते फिरे गृहासी ये ॥७॥
मज अवलोकिता मी तो अचेतन । माझा देही प्राण आढळेना ॥८॥
ऐसे दिवस चारी लोटलियावरी । प्रतिपदेमाझारी मध्यरात्री ॥९॥
बोलिला ब्राह्मण येऊनी सन्मुख । “ सावध विवेक धरी बाई ॥१०॥
सावध सावध सावध तू मनी । ऐकोनी श्रवणी देह कापे ॥११॥
तव गाय नाही वत्स ना ते लोक । माय ते सन्मुख बैसलीसे ॥१२॥
बंधू पिता आणि भ्रतार बैसला । सोज्वळ लागला दीप असे ॥१३॥
तेथुनिया मन करोनी सावध । स्मरणी स्वतःसिद्ध चित्त केले ॥१४॥
बहेणि म्हणे देह सर्वही विकळ । परि ते निश्चळ चित्त माझे ॥१५॥

२०.
नवल जानासी वाटले म्हणोनी । येती ते धावोनी पाहावया ॥१॥
भ्रतार हा माझा देखोनी तयासी । माझिया देहासी पीडा करी ॥२॥
न देखवे तया द्वेषी जनाप्रती । क्षणाक्षण चित्ती द्वेशवोढ ॥३॥
म्हणे ही बाईल मरे तरी बरी । ईस का पामरे भेटाताती ॥४॥
काय आता घुमे येईल आंगासी । देव इचे पोसी पोट कैसे ॥५॥
बहेणि म्हणे ऐसी भ्रतारासी चिंता । जाणोनी अनंता कळो आले ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : February 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP