मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
५४७ ते ५६०

अभंग - ५४७ ते ५६०

संत बहेणाबाईचे अभंग

५४७.
लोकांचिया मुली खेळती बोळकी । वाटे घ्यावे मुखी मज नाम ॥१॥
आणिक नावडे खेळ तो बालिश । नेणे तो विश्वास प्रगटला ॥२॥
नावडे फुगडी टिपरियांचा खेळ । असावे निश्चळ वाटे मना ॥३॥
बहिणी म्हणे पूर्वी होते जे पदरी । तेची या संसारी प्रगटले ॥४॥

५४८.
मातापितयाने लग्न संपादिले । कन्यादान केले गौतमगोत्री ॥१॥
झाला चार दिस लग्नाचा सोहळा । न कळे देवाचा हेत आन ॥२॥
मायबापे माझी दरिद्री पीडिली । उपद्व्यापे जाली कासावीस ॥३॥
देशत्याग झाला मिरासीच्या भये । तव गंगा जाय दोही थड्या ॥४॥
सांगाते घेतले माझिया स्वामीस । आले परदेशास महादेवी ॥५॥
मायबाप बंधू भ्रतारासहित । बहिणी म्हणे तेथ स्थिर जाले ॥६॥

५४९.
चालले पंढरी महादेवाहूनी । संतांचे दरूषणी सुख वाटे ॥१॥
संतसमागम जीवाहुनी गोड । परी भय दृढ भ्रताराचे ॥२॥
जमदग्नीचा क्रोध ऐकियला कानी । भ्रतार तो जनी तेचि रूप ॥३॥
बहिणी म्हणे झाले वरूचे एकादश । क्षणही जीवास सुख नाही ॥४॥

५५०.
वैदिक व्यवहार स्वामी उदरार्थ । करितसे तेथ देव कैचा ॥१॥
वेदपाठकाही नावडेचि भक्ति । पराधीन युक्ती न चले माझी ॥२॥
वय तो लहान लौकिक तो वेडा । वेदाचिया भिडा उभी राहे ॥३॥
बहिणी म्हणे माझे चित्त कासावीस । संसाराचा त्रास बहु झाला ॥४॥

५५१.
नामाचा विटाळ आमुचिये घरी । गीताशास्त्र वैरी कुळी आम्हा ॥१॥
देव तीर्थयात्रा नागडती हरी । ऐसीयांचे घरी संग दिला ॥२॥
संतसमागम राघवाची भक्ती । नावडती श्रुती शास्त्र कथा ॥३॥
बहिणी म्हणे माझ्या पापाचा संग्रहो । तुटोनीया राहो चित्त स्थिर ॥४॥

५५२.
वेद हाका देती पुराणे गर्जती । स्त्रियेच्या संगती हित नोहे ॥१॥
मी तो सहज स्त्रियेचाचि देह । परमार्थाची सोय आता कैची ॥२॥
मूर्खत्व ममता मोहन मायिक । संगची घातक स्त्रियेचा तो ॥३॥
बहिणी म्हणे ऐसा स्त्रीदेह घातकी । परमार्थ या लोकी केवी साधे ॥४॥

५५३.
स्त्रियेचे शरीर पराधीन देह । न चाले उपाव विरक्तीचा ॥१॥
पडिले अंतर विवेकाचे बळे । काय निर्मियेले राघोबाने ॥२॥
तापले शरीर तिविध तापाने । वाटतसे मने प्राण द्यावा ॥३॥
न घडे हरिची भक्ती अणुमात्र । शत्रु इष्टमित्र संसाराचे ॥४॥
शरीराचे भोग वाटताती वैरी । माझी कोण करी चिंता आता ॥५॥
बहिणी म्हणे जैसा वोकियला वोक । तैसे हे मायिक वाटे मना ॥६॥

५५४.
काय पाप केले पूर्वील ये जन्मी । आता पुरूषोत्तमी अंतरले ॥१॥
लाधले नरदेह स्त्रियेचेनि रूपे । असंख्यात पापे फळा आली ॥२॥
अधिकार नाही वेदार्थश्रवणी । गायत्री ब्राह्मणी गुप्त केली ॥३॥
करू नये मुखे प्रणवाचा उच्चार । बीजाचा संचार ऐको नये ॥४॥
बोलो नये बोल पराचिया संगे । भ्रतार तो अंगे जमदग्नी ॥५॥
बहेणि म्हणे होतो जीव कासावीस । न ये देवाजीस करूणा माझी ॥६॥

५५५.
सोसियेले क्लेश जीवे बहु फार । जाली हे अपार दीन सख्या ॥१॥
चित्ती समाधान केले असे एक । प्रारब्धे हे दुःख आले भागा ॥२॥
भोगणे न चुके ब्रह्मादिका दुःख । इतर हे रंक कोण तेथे ॥३॥
बहिणी म्हणे माझ्या देहाचे प्रारब्ध । ऐसिया गोविंद काय करी ॥४॥

५५६.
देहाचिया माथां सुखदुःख आले । पाहिजे भोगिले आवश्यक ॥१॥
परिहार माझा होतसे पापाचा । लाभ हाचि साचा मानियला ॥२॥
अंतरीचा हेत नामसंकीर्तनी । शरीर पीडेने पीडियले ॥३॥
बहिणी म्हणे माझ्या संचिती जे आहे । तव पीडा पाहे कवण वारी ॥४॥

५५७.
प्रारब्धाची गती न संडी सर्वथा । व्यर्थ आता चिंता कोण वाहे ॥१॥
निश्चय निर्धारी धरियला मनी । आता चक्रपाणी पांडुरंग ॥२॥
शरीराचे क्लेश निवारे न कोणा । अगा नारायणा कळो आले ॥३॥
बहिणी म्हणे आता केशवा शरण । नको माझे मन पाहू हरी ॥४॥

५५८.
मातापिता बंदु प्रपंचाचे सखे । होती महादुःखे माझ्या संगे ॥१॥
देवासी सांगता जाणसी अंतर । सांगावया थार नाही मज ॥२॥
सांगती न कोणी स्वहितविचार । नाही तो शेजार सज्जनाचा ॥३॥
एकली एकट पडियले वनी । क्षुधा तृषा मनी आठवेना ॥४॥
बोलावे न ऐसे वाटे कोणासवे । विचार केशवे करावा हा ॥५॥
बहिणी म्हणे नाम तुझे जाणे एक । कोणासी आणिक सांगू हरी ॥६॥

५५९.
सखा सहोदर तूंची एक हरी । दीनांचा कैवारी पांडुरंग ॥१॥
तुझी भक्ती घडे पतिव्रताधर्म । ऐसे मेघश्याम, विचारावे ॥२॥
वेदासी विरूद्ध नव्हे तो परमार्थ । म्हणोनी हा अर्थ विचारावे ॥३॥  

५६०.
विरक्तीचे मूळ प्रपंचाचा त्याग । पाहतांची एक गृहशैल ॥१॥
संकट मांडिले धाव तू झडकरी । विवेक - उत्तरी बोधी चित्त ॥२॥
भ्रतार त्यागिता वेदासी विरूद्ध । परमार्थ तो शुद्ध सापडेना ॥३॥
द्वाराशी भुजंग प्रहजळे अंगी । जीव त्या प्रसंगी केवी राहे ॥४॥
वेदाचे वचन त्यागू नये धर्म । माझे तव प्रेम हरिभक्ती ॥५॥
बहिणी म्हणे ऐशी संकटे दाटती । क्लेश ते वाढती काय सांगू ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : March 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP