मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
५९६ ते ६०७

वासुदेव - ५९६ ते ६०७

संत बहेणाबाईचे अभंग

५९६.
हरी वासुदेव द्वारासी आला । कोणी तरी भिक्षा त्यासी घाला गा ॥धृ०॥
कर्म करूनि फळ अल्पवी । अहंभावासी येवू न द्यावे । मूळ नासता ते ऋणी त्याचे । सर्व संचित पायी लावा गा ॥१॥
फावे लक्षअलक्ष याही वेगळे । ध्याये ध्यनाहुनी निराळे । दृश्य द्रष्टा दर्शन येथे गेले । तेचि दाता दिले पाहिजे गा ॥२॥
बहिणी म्हणे सरले द्वैत । सच्चिद्घने आनंद भरित । जेथे वेदाचा न कळे प्रांत । तया दानाचे आम्ही अंकित गा ॥३॥

५९७.
एका खांबावरी दुखांबाची माडी । तयावरी तीखण आहे । तया पाच उभविली घरे । तया नवद्वारे पाहे रे ॥१॥
सांगे खेळिया याचे नाव कायी । हे कोणी रचिले माझा भाई । कोठून झाले कोण यासी व्याले । याचा धनी आहे कवण्या ठायी रे ॥धृ०॥
पंचवीस खांब त्यासी बहात्तर कोठड्या । बावन्न खिळे पाही । पंधराजण त्यामधी निघ निघ करिती । चौघे राखिती ठाई ठाई रे ॥२॥
सातही बाजारी दिसती हरी । तेथे घडामोड होते नानापरी । साधूनिया चौक चांवडी । त्याचे सहा कारभारी ॥३॥
अठरा कोतवाल फिरती दिनराती । अहं ब्रह्मास्मि ऐसे जागविती । बहिणी म्हणे तेथे ओंकार ध्वनी । उठोनी कोठे सामावते ॥४॥

५९८.
मेरूचे शिखरी पडियेली खाण । तेथे लोभ्याने काढिली धावण । एकी बोंबे त्रिभुवन गाजले । तेणे डगमगिले शेषासन ॥१॥
सांग रे खेळिया अनुभव याचा । हा तुझा तुजपासी आहे । न कळे तरी हा तिचे । गुरूमुखे बा रे पाहे ॥धृ०॥
अंधे थोटे पांगळे बहिरे । येणे काढिले धांवणे । एकापुढे एक घेताती लाग । ते पायाविण चालती गगन ॥२॥
आंधळा मार्ग काढीत चालला । त्याचा पांगुळे घेतला लाग । थोट्याने धरिता शस्त्र । ते चोरांसी मारिती कैसा गा ॥३॥
वेद पंडित महानुभावी योगी । हा तयांचा अनुभव आहे \ बहिणी म्हणे हा अगम्य सर्वा । गुरूकृपेविण न कळे पाहे ॥४॥

५९९.
त्रिकुट शिखरी नांदे एक नार । त्रिभुवन तिचे उदरी । नातू पणतू हरिहर ब्रह्मादिक । ते पुरूषेविण नांदे घरी ॥१॥
नवल सांगता नये । ते दादुल्यासी म्हणे बाप माये । शेखी बापासीच माळ घालून तिने । प्रपंच रचिला आहे ॥धृ०॥
वांझीच ते व्याली बाळ । तियेपासून तिन्ही बाळ । उत्पत्तिस्थितिप्रळयसमयी । आपली आपण खाय बाळ ॥२॥
पाहता शेंडा ना मूळ । परि तिचेच येवढे खेळ । एकाचे पंचवीस करून । तिने रचिले ब्रह्मांड गोळ ॥३॥
बापाची लेकीच नवल । व्याली कैसे जगी । ऐसे जाणून खेळू खेळे । कैसा तोचि एक जाणिजे भोगी ( योगी ) ॥४॥
ऐसी ते नारी वर्ते एक चराचरी । कळे तियेची थोरी । बहिणी म्हणे ते अगम्य सर्वा । आहे तुम्हा आम्हा माझा हरी ॥५॥

६००.
डोहो रे कान्हा डोहो ॥धृ०॥
निजभाव धरी डोहो । भक्ती अंगिकारी डोहो । होई निर्विकारी डोहो । कल्पना वारी डोहो ॥१॥
श्रवण करी डोहो । मनन करी डोहो । निजध्यानी विवर डोहो । तोचि धरी हे साक्षात्कारी डोहो ॥२॥
डोहो डोहो डोहो डोहो । डोहो घालिता जडाला भावो । बहिणीसी फावला प्रेमभावो । तुकाराम स्मरण हाचि लाहो ॥३॥

६०१.
कुडपियला देस आता नका करू बळ । झाले रामराज्य तुमचे वोसरले बोल ॥धृ०॥
धरा बाई लाज काही म्हणा रामराम । साहेबाचे देणे तेणे झाले पूर्णकाम ॥१॥
साहेबाचे देणे तेणे मोकळे केले आम्हा । गुरूकृपा जाणती संत काय कळे तुम्हा ॥२॥
रूक्यासाठी फोडू डोई हिजडी नाम आम्हा । निजभावाचा घेउनि डौर हिंडू चारीधामा ॥३॥
जाति कर्म कूळ नाही सौरियेच्या वेषा । बहिणी म्हणे निःशंकपणे हिंडो दाही दिशा ॥४॥

६०२.
काजळकुंकू धरा तेलफणी करा । उगवला दिनराज वाण आले चौबारा ॥धृ०॥
चला झदकरी नाचू प्रेमभरी । बुडेल दिनराज मग मरो येरझारी ॥१॥
नर नव्हे नारी, नारी नव्हे सौरी । असे नव्हे तसे नव्हे डौर आम्हा केरी ॥२॥
एकावरी एक पुढे त्याही वरी एक । भरले दिवाण टक्कासाहेब माझा देख ॥३॥
बहिणी घाली साद अवघा तोडुनि वेवाद । सौरीयाच्या वेषे नाचे सारूनि भेदाभेद ॥४॥

६०३.
देव आठवा संसार आटवा । पांग फिटवा तेव्हा सद्गुरूकृपा ॥१॥
ज्ञान करावे वैराग्य धरावे । स्वरूपा वरावे तेव्हा सद्गुरूकृपा ॥२॥
वृत्ती सोडावी निजवृत्ती जडावी । अखंडता घडावी तेव्हा सद्गुरूकृपा ॥३॥
मनासी दंडावे मायेसी भंडावे । द्वैतासी खंडावे तेव्हा सद्गुरूकृपा ॥४॥
भक्ति करावी समता धरावी । जाणीव सारावी तेव्हा सद्गुरूकृपा ॥५॥
असत्य त्यजावे सत्यासी भजावे । संतांसी पुजावे तेव्हा सद्गुरूकृपा ॥६॥
बहिणी म्हणे ऐशा निर्धारा करणे । तरीच वरणे सद्गुरूकृपा ॥७॥

६०४.
मुढा तोचि मुंडा अवघा लुंडा करी इंद्रियांचा । मन जिंकोन करील त्याग अवघा वासनेचा ॥१॥
तरीच बरोबरी होईल समसरी । नाही तरी जाय अधोमुख करी ॥२॥
मनपणी मना कोठे घेऊनिया वाव । पूर्णपणी पाही अवघा आत्मदेव ॥३॥
सुखस्थिती अनुभव विज्ञानेसी लाहे । बहिणी तोचि मुंढा अंतर्बाह्य पाहे ॥४॥

६०५.
बडा शेख शिर मुंडाया कफनी गलेमें है । वस्तादकी खूण पाया तोवरी किया क्या है ॥धृ०॥
आपकु पछान । देख दाई मकान । पकड रहिमान । क्यो हुआ है हैरान ॥१॥
पटपटकर क्या किया । जिकीर नहीं प्यारी । वस्ताद तुझे क्या करे । किये पेटकी कामगिरी ॥२॥
पाच बखत निमाज करत हैं । किस पुकारता है ? कहा अल्ला किधर गया । ऊपर देखता क्या ॥३॥
बहिनी कहे नहीं करार । दिलमें पडी चुकी । वस्ताद तुझे क्या करे ? । पेटमें वासना भूखी ॥४॥

६०६.
मुंडा मुंडा सब कहते । दिलका नहीं कोयी । ऊपर तलखी चौघी भूजो । आप पछाने ओही ॥धृ०॥
कायकु लीया भेख । अल्लाकू फिर देख । मनसा मुंढी न फिरे तो । गांडमें मारू मेख ॥१॥
बगलम्याने तबल लेकर । फिरते दारोदार । पेटके खातिर काटते मासा । दिलकी नहीं खबर ॥२॥
छूटी माया तेरी । काहेकू पकडे उसके साथ । ढुंगसे ढुंग घसना । मुंढे क्या कीया शाहामत ॥३॥
बहिनी कहे मर बे । मुंढे झूटा तेरा सोंग । वासना मुंडी नहीं काफीर । तो काहेकू नाडते जग ॥४॥

६०७.
श्रोत्याविण जे गायन । गात्याविण श्रोता जाण । त्याची सांगेन ते खूण । आइकावी ॥१॥
अन्न सुरस निपजले । नेउनी रोग्या वोगरिले । तैसे व्यर्थ गाणे केले । श्रोत्याविणे ॥२॥
गाणे होतसे सुस्वर । श्रुती लावून मधुर । राजा श्रवणी बधिर । तरी ते व्यर्थ ॥३॥
अति सुंदर पद्मिनी । रंभा मृगनयनी । पती नपुंसक गौणी । तरी ते व्यर्थ ॥४॥
अश्व सुंदर नाचत । नाना कलाही दावित । बैसणार नाही तेथ । तरी ते व्यर्थ ॥५॥
देह सुंदर चांगले । परी प्राणची ओसरले । जीव स्वर्गग्रामी गेले । तरी ते व्यर्थ ॥६॥
विप्र सुंदर नेटका । परी कोड मुखी देखा । तरी तो जाणावा आवांका । सर्व व्यर्थ ॥७॥
कर्म करी द्विज सांग । परी गायत्रीचे नेणे अंग । तरी ते सर्व सांगोपांग । अवघेचि व्यर्थ ॥८॥
भागीरथी गंगाजळ । उत्तम हे सुशीतळ । परी ते अमंगळ स्थळ । तरी ते व्यर्थ ॥९॥
तैसे श्रोतेविण गाणे । ते तव लाजिरवाणे । म्हणून सावध ऐकणे । हरिकथा ॥१०॥
तुम्ही श्रोते आम्हा कैसे । राया परीक्षिती ऐसे । बहिणी म्हणे त्या मानेसे । नाम गावे ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : March 06, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP