मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
८१ ते ९०

भक्तिपर अभंग - ८१ ते ९०

संत बहेणाबाईचे अभंग

८१.
गुणाची वाघुर मांडीलीसे जीवा । सुटेल केधवा केशीराजा । ऐसा अनुताप होईल अंतरी । मोक्ष होय तरी प्राणियासी । कामक्रोधलोभ वैरी हे भोवते । करावी अनंते कृपा आता । बेहणि म्हणे धन्य ते एक संसारी । पूर्ण जयावरी गुरुकृपा ।

८२.
अनुताप हा अग्न लागला अंतरी । आता कृपा करी जगन्नथा । तापत्रये फार पीडिले शरीर । नलगे संसार स्वर्ग तोही । पेटली इंड्रिये धडाडित अंग । आता कृपा करी वेगे पांडुरंगा । बहेणि म्हणे सुख तेचि जाले दुःख । ऐसा हा विवेक संचरला ॥

८३.
पाहे परतोन मी हा येथे कोण । देह तो हे जाण नासिवंत ॥ इंद्रियाचरण होतसे कैसेनी । सृष्टिचा तो धनी कोण येथे ॥ पृथी आप तेज वायो हे गगन । सर्वही निर्माण जाले कोठे बहेणि म्हणे याचा करावया धोस । होउनि सावध विचारिजे ।

८४.
आपुलीये मनी विचारूनी सर्व । पुसावया ठाव पाहतसे ॥१॥
जेथे पुसे तेथे संदेह तुटेना । करी स्थिर मना कोण ऐसा ॥२॥
शास्त्रासी पुसावे थोडे तो आयुष्य । कमी तो आवश्य कर्मी गोवी ॥३॥
बहेणि म्हणे ऐसी चिंता साधकासी । कैशी भवपाशी मुक्त होऊ ॥४॥

८५.
जेथे पुसो जावे तेथे अभिमान । आपुलेचि ज्ञान प्रतिष्ठी तो ॥१॥
जाणोनि अंतरी न सांगती कोणी । कोणाचे वचनी स्थिर राहो ॥२॥
लय हे लक्षण सांगती धारणा । नाना उपासना नाना मंत्र ॥३॥
एक ते संगती पंचमुद्रा जप । एंव खटाटोप आसनाचा ॥४॥
एक ते सांगती तीर्थे तपे व्रत । एक ते अनंत पूजाविधि ॥५॥
बहेणि म्हणे आता नव्हे स्थिर मन । जेथे तेथे गुण अविद्येचा ॥६॥

८६.
कामाचे विकिले क्रोधाचे जिंकले । लोभाचे अंकिले सर्व भावे ॥१॥
तयासी पुसता काय देती सुख । अंतरी विवेक नाही जया ॥२॥
आशेलागी जया आंदन दिधले । ममतेचे जाले सेवक ते ॥३॥
बहेणि म्हणे तेचि ग्रासिले मायेने । आम्हा सोडवणे केवी होती ॥४॥

८७.
दुसरियाचे दुःखे शिणे ज्याचे चित्त । तोचि एक संत वोळखावा ॥१॥
तयासी पुसता हरील तो शीण । दुःख घे हिरोन रोकडेची ॥२॥
परोपकार जया आलासे विभागी । शांती हे सर्वांगी डोलतसे ॥३॥
बहेणि म्हणे नाही आपुले पारिखे । वर्ततो विवेके ज्ञानदृष्टी ॥४॥

८८.
चंदन सर्वांगे झिजोनिया जाय । संतोषवी प्रणिये जेणेपरी ॥१॥
तैसे साधुजन मने वाचे काये । सुख देता नोव्हे उदासीन ॥२॥
उदक जेसे संतोषवी जना । उपकार तो तृणा आदिकरूनी ॥३॥
बहेणि म्हणे सती अवतार घेतले । जनहित केले सर्वपरी ॥४॥

८९.
गर्व जयापासी नाही अणुमात्र । सर्वांगे पवित्र संतवृत्ति ॥१॥
तेचि एक साधु तारितील जन । भ्रांती हे हिरोन ज्ञान देती ॥२॥
अंतर्बाह्य शुद्ध सूर्याचिये परी । ज्ञान कर्म करी बाह्यात्कार ॥३॥
रत्न की कर्पूर शुद्ध अन्तर्बाह्य । मनातील गुह्य सांगे जनी ॥४॥
कृपा जयापासी होउन आन । आनंदी निमग्न सदा काळी ॥५॥
बहेणि म्हणे मनी भूतकृपा पूर्ण । तेचि वोळखण संतजना ॥६॥

९०.
तीर्थे इच्छिताती तया साधुजना । पुध्याची गणना कोण करी ॥१॥
ब्रह्मरूप स्वये तारावया जन । अवतार घेउन येथे आले ॥२॥
ब्रह्मादिक देव इच्छिताती भेटी । अमृताची वृष्टि क्रिया तैसी ॥३॥
बहेणि म्हणे ज्याचे बोलणे सहज । वेदांतिचे बीज हाता वसे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP